मोहन गोखले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोहन वसंत गोखले (जन्म : पुणे, ७ नोव्हेंबर १९५३; - मद्रास, २९ एप्रिल १९९९) हे मराठी अभिनेते-दिग्दर्शक होते. त्यांनी मराठी नाटके आणि मराठी तसेच हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या होत्या. अभिनेत्री शुभांगी गोखले (माहेरच्या शुभांगी संगवई) या त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सखी गोखले ही त्यांची मुलगी आहे.

मोहन गोखले हे शाळेत असल्यापासूनच नाट्यवाचनात भाग घेऊ लागले. पुढे पुण्यातील सर परशुराम आणि फर्ग्युसन कॉलेजात ते अभिनेते म्हणून गाजले. पुण्यातली अत्यंत प्रतिष्ठेची पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा त्यांनी 'ती येते', 'कैद' अशा एकांकिकांनी अक्षरशः गाजवली.

व्यावसायिक रंगभूमी[संपादन]

१९७२ साली मोहन गोखले यांना 'घाशिराम कोतवाल' या नाटकात एक छोटी भूमिका मिळाली. नाटकातली त्यांची 'दिव्य करायला जाणाऱ्या ब्राम्हणा'ची भूमिका अविस्मरणीय ठरली. त्यानंतर त्यांनी सतीश आळेकर यांचे 'महापूर' हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेसाठी दिग्दर्शित केले. आळेकरांचेच 'मिकी आणि मेमसाब', सतीश तांबे यांचे 'बीज' ही त्यांची पुण्यात असतानाची महत्त्वाची नाटके होती.

गोखले पुढे व्यावसायिक नाटकांसाठी मुंबईत आले. कानेटकरांच्या 'कस्तुरीमृग' आणि 'सूर्याची पिल्ले' मधल्या त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. त्यानंतर त्यांची 'बेबी', 'डॉक्टर तुम्हीसुद्धा' , 'नरु आणि जान्हवी' ही नाटकेही गाजली.

चित्रपट[संपादन]

राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या 'हेच माझे माहेर', 'माफीचा साक्षीदार' आणि 'आज झाले मुक्त मी' या चित्रपटांत मोहन गोखले यांनी भूमिका केल्या. गोविंद कुलकर्णींच्या 'बन्या बापू' या चित्रपटातील बन्याची भूमिका प्रेक्षकांना आवडली. हा त्यांचा पहिला चित्रपट होता.

समांतर सिनेमांमधेही त्यांनी लक्षणीय कामगिरी बजावली. केतन मेहतांच्या 'भवनी भवाई' या गाजलेल्या गुजराती चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका होती. मेहतांचाच 'मिर्च मसाला', सई परांजपेंचा 'स्पर्श', सईद मिर्झा यांचा 'मोहन जोशी हाजिर हो', कुंदन शाह यांचा 'जाने भी दो यारों, मीरा नायरचा 'मिसिसिपी मसाला' या चित्रपटांतील भूमिकाही चोखंदळ प्रेक्षकांना आवडल्या.

जब्बार पटेल यांच्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' चित्रपटामधे ते महात्मा गांधी बनले होते. मद्रासमध्ये निधन झाले तेव्हा मोहन गोखले अवघे ४६ वर्षांचे होते. 'हे राम' मध्ये त्यांनी गांधींची भूमिका साकारली होती. थोडेफार शूटिंग उरले होते. त्यादरम्यानच हार्ट ॲटॅकने त्यांचा मृत्यू ओढवला. अमोल पालेकरांचा 'कैरी' हा चित्रपट त्यांच्या निधनानंतर आला.

दूरचित्रवाणी मालिका[संपादन]

  • अल्पविराम
  • आशीर्वाद
  • जंजीरे
  • भंवर (दिल्लीत रंगा-बिल्ला यांनी शाळकरी मुलीचे अपहरण केलेल्या घटनेनंतरच्या कोर्ट-सुनावणीवर आधारित हिंदी मालिका)
  • मिस्टर योगी (या मालिकेतल्या भारतीय वधू शोधणाऱ्या फॉरेन रिटर्न तरुणाची धमाल त्यांनी अप्रतिम सादर केली होती. त्यातून ते घराघरांत पोहोचले.)
  • लेखू (हिंदी मालिका, या मालिकेत मोहन गोखले यांची फिजिक्सच्या प्रोफेसरची प्रमुख भूमिका होती.)

संदर्भ[संपादन]