Jump to content

जपानची मलेशिया मोहीम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दुसऱ्या महायुद्धात ८ डिसेंबर १९४१ ते १५ फेब्रुवारी १९४२ या दरम्यान तत्कालीन ब्रिटिश मलय प्रांत जिंकण्यासाठी जपानने केलेल्या स्वारीला मलेशिया मोहीम [१] असे नाव आहे. यात जपानचा विजय होउन त्यांनी ब्रिटिश मलय प्रांतातून ब्रिटिशांना हाकलून दिले.

या युद्धात जपानी आरमारवायुसेना यांचे पहिल्यापासून वर्चस्व राहिले. या शिवाय जपानी सैन्याने सायकलींचा परिणामकारक वापर करून [२] मलेशियातील घनदाट जंगलात अत्यंत वेगाने प्रवास करून युद्ध जिंकले. ब्रिटिश सैन्यामध्ये, ब्रिटिश, भारतीय व मलय सैनिकांचा समावेश होता. या सैन्याने माघार घेत असताना, वाटेवरील अनेक पूल उद्ध्वस्त केले, परंतु जपानी चढाईचा वेग रोखण्यात ते यशस्वी ठरले नाही. या चढाईचा शेवट जपानच्या सिंगापूर वरील विजयाने झाला.

पार्श्वभूमी

[संपादन]

जपान

[संपादन]

१९४१ पूर्वी ३ ते ४ वर्ष चीनला आपल्या आधिपत्याखाली आणण्यासाठी जपानचे चीनशी युद्ध चालू होते [३]. या युद्धासाठी लागणाऱ्या इंधन व इतर सामुग्री साठी जपान अमेरिकायुनायटेड किंग्डम वर अवलंबून होता. जपानची चीनवरील चढाई रोखण्यासाठी, अमेरिका व युनायटेड किंग्डम ने जपानवर व्यापारी बहिष्कार घातला [४]. चीनमधून माघार घेण्याची नामुष्की पत्करण्यापेक्षा जपानने अमेरिका व युनायटेड किंग्डम ला काटशह देण्यासाठी त्यावेळी ब्रिटनच्या ताब्यात असलेल्या मलय द्वीपकल्पावर हल्ला करण्याचे ठरविले. १९४१ मध्ये फ्रेंच इंडो चायनाचा भाग असलेल्या हैनाना बेटावर [५] जपानने सैन्याची जमवाजमव केली. ही सैन्याची जमवाजमव चीनमधील युद्धासाठी आहे अशी मित्र राष्ट्रांची समजूत झाली.

जपान कडील युद्धसामुग्री मध्ये, २०० रणगाडे सामिल होते. यात टाइप ९५ हा-गो हलके [६], टाइप ९७ ची-हा [७], टाइप ८९ आय-गो मध्यम [८] आणि टाइप ९७ टे-के रणगाड्यांचा [९] समावेश होता. या व्यतिरिक्त जपानी वायुसेनेने ८०० लढाऊ विमाने येथे तैनात केली. मित्र राष्ट्रांकडे लॅंकेस्टर ६x४ चिलखती गाड्या [१०], मरमॉन-हॅरिंग्टन चिलखती गाड्या [११], सर्वसमावेशक मालवाहू गाड्या [१२] व जुने/ कालबाह्य झालेले, भारतीय सैन्याच्या १००व्या लाइट टॅंक स्क्वॉड्रनमधील एकूण २३, एमके-६बी रणगाडे [१३] होते. या शिवाय, फक्त २५० लढाऊ विमाने येथे होती, त्यातील बरीचशी युद्धाच्या सुरुवातीलाच कामी आली.

ब्रिटिश साम्राज्य

[संपादन]

दोन महायुद्धांमधल्या काळात ब्रिटिशांकडून पूर्व आशियाच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष झाले होते. दुसऱ्या महायुद्धाआधी १९३७ साली मेजर जनरल विल्यम डॉबी [१४] यांनी मलयाच्या संरक्षणाचा आढावा घेतला. त्यांनी असे निष्कर्ष काढला की कोणत्याही वर्षी साधारण ऑक्टोबर ते मार्च च्या दरम्यान शत्रू पूर्व किनारपट्टीवर सयामच्या (थायलंडच्या) सोंखला [१५] व पटनी [१६] येथे व मलयाच्या कोटा भारू [१७] येथे) हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताबडतोब सैन्य व शस्त्रे यांची कुमक पाठवावी. त्यांचा अंदाज बरोबर ठरला परंतु ब्रिटिश राजवटीकडून पुरेशी कुमक पाठविली गेली नाही. ब्रिटिशांची सर्व मदार आर्थर पर्सिव्हाल [१८] यांच्या नेतृत्वाखालील, सिंगापूर मधील भक्कम आरमारी कुमकेवर [१९] होती. तसेच वेळ पडल्यास अमेरिकी सैन्य मदतीला येईल अशी अपेक्षा होती.

जपानी हेरगिरी

[संपादन]

हल्ला करण्याच्या पूर्वी, जपानच्या हेरखात्याने मलयाची बित्तंबातमी काढली होती. जपानी वकिलाती मधील अधिकारी, मलयातील बंडखोर गट, तसेच जपानी व्यापारी, पर्यटक यांच्या सहाय्याने जपानने इत्यंभूत माहिती गोळा केली होती. काही ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून (कॅप्टन पॅट्रिक स्टॅनली व्हॉगन हिना [२०] []) फितुरीने सुद्धा त्यांना माहिती मिळाली होती.

मलयाच्या स्वातंत्र्यासाठी काम करणारी ‘केसातुआन मेलायू मुडा’ (Kesatuan Melayu Muda) [२१] व भारतीय स्वातंत्र्यासाठी काम करणारी इंडियन इंडिपेंडेंस लीग [२२] या संघटनांनी सुद्धा जपानी सैन्याला माहिती मिळवायला मदत केली.

या प्रयत्नातून युद्धापूर्वी जपानकडे, कॉमनवेल्थ सैन्याची बलस्थाने व कमजोरी या विषयी माहिती, तसेच या भागाचे नकाशे उपलब्ध होते.

जपानचे मलयावर आक्रमण

[संपादन]
जपानचे मलेशिया वरील आक्रमण (१९४१-४२)

ब्रिटिश सैन्याला, नोव्हेंबर १९४१ मध्ये फ्रेंच इंडो चायना येथे मोठ्या प्रमाणात जपानी सैन्याची जमवाजमव लक्षात आली. मलेशिया व थायलंड वर हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन, त्याला शह देण्यासाठी 'ऑपरेशन मॅटॅडोर' [२३] योजले गेले. परंतु काही कारणांनी ते रहित केले.

८ डिसेंबर १९४१ रोजी, कोटा भारू येथे [२४], जपानच्या ट्वेंटी फिफ्थ आर्मीने [२५], लेफ्टनंट जनरल टोमोयुकि यामशिता [२६] यांच्या नेतृत्वाखाली मलेशियावर हल्ला केला व मलेशियाच्या पूर्व किनारपट्टीने ते सैन्य दक्षिणेकडे चाल करून आले.  तसेच फिफ्थ डिवीजन ने थायलंडच्या सोंखला व पटनी येथे आक्रमण केले [२७] व तेथून ते दक्षिणेला निघाले. त्याच दिवशी १७ जपानी लढाऊ विमानांनी सिंगापूरवर बॉम्ब वर्षाव केला. [२८]

भारतीय सैन्याच्या थर्ड कॉर्प [२९] ने व ब्रिटिश सैन्याच्या काही बटलीयन्स नी प्रतिकार केला. जपानी सैन्य सर्वाथाने जास्त तयारीत होते व त्यांच्यापुढे हा प्रतिकार टिकू शकला नाही. जपानी सैन्याने हलके रणगाडे व सायकलींचा परिणामकारक वापर करून, मलेशियाच्या घनदाट जंगलातून वेगाने हालचाली केल्या. मलेशियाच्या अंतर्गत रस्त्यांची त्यांना माहिती होती व माहीतगार वाटाड्यांना त्यांनी आधीपासूनच हेरून ठेवले होते. येताना त्यांनी सायकली बरोबर आणल्या नव्हत्या, परंतु स्थानिक मदतीने व काही बळाने त्यांनी त्या सैन्याला उपलब्ध करून दिल्या.

जपानी आक्रमणाला रोखण्यासाठी युद्ध सुरू होण्या आधी ब्रिटिश नौसेनेची फोर्स झी (Force z ) [३०] दाखल झाला होता. यात २ युद्धनौका- एच्. एम्. एस्. प्रिंन्स ऑफ वेल्स [३१] व एच्. एम्. एस्. रिपल्स [३२], आणि ४ विनाशिका (डिस्ट्रॉयर्स) [३३] यांचा समावेश होता. परंतु १० डिसेंबरला, जपानी लढाऊ विमानांनी, दोन्ही युद्धनौकांना (एच्. एम्. एस्. प्रिंन्स ऑफ वेल्स व बॅटल क्रुजर एच्. एम्. एस्. रिपल्स यांना) जलसमाधी दिली [३४]. मलेशियाचा पूर्व किनारा त्यामुळे जपानला सहज जिंकता आला. जपानचे हवाई सामर्थ्य, मित्र राष्ट्रांच्या हवाई सामर्थ्यापेक्षा अधिक होते, व जपानी आक्रमणात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यावरून जपानी सैन्याने वेगाने हालचाल करून मलेशियावर आक्रमण केले. १० ते १३ डिसेंबर मध्ये, मलेशियातील जित्रा येथे ब्रिटिश अधिपत्याखालील भारतीय सैन्याला, जपानी सैन्याने हरविले व जित्रा काबिज केले. [३५]

८ डिसेंबर पासूनच, जपानी हवाई दलाने मलेशियातील पेनांग बेटावर [३६] हल्ले करायला सुरुवात केली व १७ डिसेंबरला जपानी सैन्याने पेनांग बेटावर कब्जा मिळविला. पेनांग मधील युरोपियन रहिवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले, तर इतर रहिवाशांना जपानी सैन्याच्या मर्जीवर सोडण्यात आले. ब्रिटिश शासनाच्या या कृतीमुळे स्थानिक लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. अनेकदा असे म्हणले जाते की, 'ब्रिटिश सत्तेने दक्षिण आशियावर राज्य करण्याचा नैतिक अधिकार, सिंगापूरच्या पाडावापेक्षा, पेनांग मध्ये घालवला.' पेनांग मधून घाईघाईने बाहेर पडल्यामुळे, तेथील शस्त्र साठा, बोटी, इतर सामुग्री व रेडियो स्टेशन जपानच्या ताब्यात गेले.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्या पर्यंत, संपूर्ण उत्तर मलेशिया जपानी वर्चस्वाखाली आले. तर थायलंडच्या राजाने, जपानशी मैत्रीचा तह केला.

भारतीय सैन्याच्या इलेवन्थ डिवीजन [३७] ने, कांपार [३८] येथे जपानी आगेकूच रोखून धरली. परंतु त्यांचा फार काळ टिकाव लागला नाही. तेथून माघार घेऊन, स्लिम नदीपाशी त्यांनी मोर्चे बांधणी केली. स्लिम नदीच्या लढाई [३९] मध्ये दोन भारतीय सैन्याच्या बटालियनचे अतोनात नुकसान झाले. त्यानंतर लवकरच, ११ जानेवारी १९४२ ला जपानी सेनेने क्वाला लंपूर [४०] ताब्यात घेतले.

१४ जानेवारीला जपानी सैन्य जोहोर [४१] वर चाल करून आले. जोहोरच्या रक्षणासाठी ऑस्ट्रेलियाच्या सैन्यातील एट्थ डिवीजन [४२] ची नेमणूक मेजर जनरल गॉर्डन बेनेट [४३] यांच्या नेतृत्वाखाली केली होती. अत्यंत घनघोर व रक्तरंजित लढाई नंतर, २७ जानेवारीला उरलेल्या सैन्याने जोहोर मधून माघार घेऊन, सिंगापूर मध्ये आश्रय घेतला.

अशाप्रकारे दोन महिन्याच्या आत जपानी सैन्याने, कॉमनवेल्थ च्या सैन्याचा पराभव करून मलय द्वीपकल्प जिंकून घेतले. जवळ जवळ ५०,००० सैनिक मारले अथवा पकडले गेले.

७ फेब्रुवारी रोजी जपानी सैन्याने सिंगापूरवर आक्रमण [४४] केले व १५ फेब्रुवारीला ब्रिटिश सैन्याने शरणागती पत्करली. ८०००० सैनिक युद्धबंदी करण्यात आले.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ जानेवारी १९४२ च्या अखेरीस कॅप्टन हिना यांना जपानी सैन्यासाठी हेरगिरी केल्याबद्दल पकडण्यात आले व १३ फेब्रुवारीस त्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली.