सिंगापूरची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सिंगापूरची लढाई किंवा सिंगापूरचा पाडाव ही दुसऱ्या महायुद्धात ८ ते १५ फेब्रुवारी १९४२ दरम्यान झालेली लढाई होती. यात सिंगापूरमधील ब्रिटिश सैन्याचा पूर्णपणे पराभव झाला आणि हे अतिशय महत्वाचे ठाणे आणि आग्नेय आशियातील मोठे व्यापारकेंद्र जपानच्या हातात गेले. ही लढाई ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात मोठा लष्करी पराभव समजली जाते.[१]

जपानी जनरल टोमोयुकी यामाशिता[१] ह्यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३०,००० जपानी सैनिक, मलेशियातील घनदाट जंगलातून, सिंगापूरच्या उत्तरेकडून चाल करून आले. मलेशिया द्वीपकल्पातील घनदाट जंगलातून हल्ला होणे शक्य नाही; या कल्पनेतून ब्रिटिश सैन्याकडून उत्तरेची ही बाजू लष्करी दृष्टीने कमकूवत राहिली होती. त्यामुळे, जपानच्या मलेशिया मोहिमेत, उत्तरेकडून कमालीच्या वेगाने प्रवास करून जपानी सैन्य सिंगापूरच्या दिशेने आल्यावर मित्र राष्ट्रांचे सैन्य त्याचा यशस्वी प्रतिकार करु शकले नाही. सिंगापूर मध्ये, आर्थर परसिव्हेल [२]- (२६ डिसेंबर १८८७ ते ३१ जानेवारी १९६६)- हे ब्रिटिश सैन्यातील वरिष्ठ अधिकारी होते. पहिल्या महायुद्धात व दोन महायुद्धांमधील काळात त्यांची कारकीर्द बहरली. दुसऱ्या महायुद्धामध्ये सिंगापूरच्या युद्धात, त्यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश मित्र राष्ट्रांच्या सैन्याने जपानी सैन्यासमोर त्यांनी शरणागती पत्करली. सिंगापूरचा पाडाव हा ब्रिटिश साम्राज्यातील सर्वात नामुष्कीचा व साम्राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळविणारा ठरला.

यांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार, अननुभवी सैन्य व तुटपुंजी सामुग्री ही सिंगापूरच्या पराभवाची प्रमुख करणे होती. परसिव्हेल यांच्या नेतृत्वगुणांची कमतरता हे या पराभवामागचे कारण नव्हते.[३] यांच्या नेतृत्वाखाली मित्र राष्ट्रांचे ८५,००० सैनिक होते.

सिंगापूर हे पाण्यासाठी मलेशिया द्वीपकल्पावर अवलंबून होते. परंतु उत्तरेकडून हल्ला होण्याची शक्यता लक्षात येताच, सिंगापूर व मलेशियाला जोडणारा पूल मित्र राष्ट्र सैन्याने उद्ध्वस्त केला. जोहार सामुद्रधुनी [४] ओलांडण्यासाठी जपानी सैन्याला वेगळा मार्ग शोधावा लागला. ब्रिटिशांसाठी सिंगापूर इतके महत्वाचे होते की, पंतप्रधान चर्चील [५] यांनी, 'अखेरच्या सैनिकपर्यंत लढत रहा' असा आदेश आर्थर परसिव्हेल यांना दिला.

दिनांक ८ फेब्रुवारी १९४२ रोजी जपानी सैन्य सिंगापूरच्या समुद्रकिनारी दाखल झाले. मित्र राष्ट्र सैन्याला त्याचा मुकाबला करता आला नाही. जपानी सैन्याची आगेकूच होत राहिली आणि जपानी वैमानिकांनी सिंगापूरची पाणीपुरवठा यंत्रणा व इतर कुमक खंडित करण्याच्या उद्देशाने बॉम्ब वर्षाव केला.

१५ फेब्रुवारी रोजी, जनरल टोमोयुकी यामाशिता यांनी मित्र राष्ट्र सैन्याला शरण येण्याचे आवाहन केले आणि सर्व उपाय संपल्याचे लक्षात येताच आर्थर परसिव्हेल यांनी शरणागती पत्करली. ब्रिटिश, भारतीय, ऑस्ट्रेलियन व सिंगापुरी असे ८०,००० सैनिक युद्धबंदी झाले.

शरणागती पत्करल्यानंतर तीन दिवसांनी (१८ फेब्रुवारी ते ४ मार्च १९४२) जपानी सैन्याने विद्रोही असलेल्या हजारो लोकांची कत्तल केली. या घटनेला सूक चिंग- चिनी लोकांची कत्तल [६]असे म्हणतात. यात प्रामुख्याने, सिंगापूर मधील चिनी वंशाच्या नागरिकांची हत्या केली गेली. १९३७ पासून चालू असलेल्या दुसऱ्या जपान-चीन युद्धामुळे, सरसकट सर्व चिनी वंशाच्या नागरिकांना, ‘जपानी सम्राज्यासाठी धोकादायक’, असे मानण्यात आले व अनेक नागरिकांची हत्या करण्यात आली.

युद्ध समाप्ती नंतर जपानी सैन्याने या कत्तलीची कबुली दिली. या कत्तलीत सुमारे ६००० नागरिक मारले गेले असे जपानी बाजूचे म्हणणे आहे. तर सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली क्वान यु [७], यांच्या माहितीनुसार सुमारे ७०,००० नागरिक मारले गेले. ते स्वतः या कत्तली मध्ये जवळ जवळ सापडले होते.

१९६३ मध्ये या कत्तली मध्ये मारल्या गेलेल्या नागरिकांच्या सन्मानार्थ एक स्मारक उभारण्यात आले. सिंगापूरच्या नागरिकांकडून या कत्तली बद्दल जपान कडून माफीची व आर्थिक नुकसान भरपाईची मागणी केली गेली आहे.[६]

दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान चिनी वंशाव्यतिरिक्त, इतर नागरिकांची सुद्धा, मोठ्या प्रमाणावर सिंगापूर, मलेशिया, ब्रह्मदेश येथे, जपानी सैन्याकडून हत्या झाली. यात १,५०,००० तमिळ व ९०,००० ब्रह्मदेशी व थाई नागरिकांचा समावेश आहे. यातील बहुतेक मृत्यू सयाम- ब्रह्मदेश रेल्वे मार्गाच्या बांधकामामध्ये झालेले आहेत. त्यामुळेच या रेल्वे मार्गाला ‘मृत्यू मार्ग’ म्हटले जाते.

दुसरे महायुद्ध संपेपर्यंत सिंगापूर हे जपानी सैन्याच्या अधीन राहिले. युद्धबंद्यांपैकी जवळ जवळ ४०,००० भारतीय युद्धबंदी ‘इंडियन नॅशनल आर्मी’ मध्ये सामील झाले व जपानी सैन्याबरोबर त्यांनी ब्रह्मदेशातील युद्धात भाग घेतला.

१९४२ मधील सिंगापूर युद्धातील पराभवामुळे ब्रिटिश साम्राज्याची प्रतिष्ठा धुळीला मिळाली.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Tomoyuki Yamashita". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2023-10-22.
  2. ^ "Arthur Percival". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2023-11-02.
  3. ^ "Arthur Percival". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2023-11-02.
  4. ^ "Straits of Johor". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2023-08-18.
  5. ^ "Winston Churchill". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2023-11-01.
  6. ^ a b "Sook Ching". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2023-10-23.
  7. ^ "Lee Kuan Yew". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2023-11-03.