चौथे इंग्रज-मैसूर युद्ध
दिनांक | इ.स. १७९८ ते इ.स. १७९९ |
---|---|
स्थान | भारत |
परिणती | टिपू सुलतानचा मृत्यू ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा विजय |
युद्धमान पक्ष | |
---|---|
मैसूर संस्थान | ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मराठा साम्राज्य हैदराबादचा निजाम त्रावणकोर सन १८७१ |
सेनापती | |
टिपू सुलतान मिर गोलाम हुसेन मोहम्मद हुलेन मिर मिरान उमादत उल उम्र गुलाम मोहम्मद खान मिर सादीक (फितुर) |
जनरल जॉर्ज हॅरीस मेजर जनरल डेविड बेअर्ड कर्नल आर्थर वेलेस्ली
|
चौथे इंग्रज-मैसूर युद्ध (मराठी नामभेद: चौथे ब्रिटिश-मैसूर युद्ध ; इंग्रजी: Fourth Anglo-Mysore War, फोर्थ ॲंग्लो-मायसोर वॉर) हे इ.स. १७९९ साली म्हैसूरच्या राज्याचा शासक टिपू सुलतान आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेले युद्ध होते. इंग्रज-मैसूर युद्धमालिकेतील हे शेवटचे व निर्णायक युद्ध ठरले. या निर्णायक युद्धात टिपू सुलतानचा मृत्यू झाला.
पार्श्वभूमी
[संपादन]तिसऱ्या इंग्रज-मैसूर युद्धामुळे टिपूला त्याच्याजवळचा अर्धा प्रदेश गमवावा लागला होता. त्यामुळे त्याच्या उत्पन्नाचे मार्गही कमी झाले होते. श्रीरंगपट्टणमच्या तहाने त्याच्यावर लादलेली युद्धखंडणीची प्रचंड रक्कम त्याने प्रामाणिकपणे व नियमितपणे चुकती केली होती.
त्याच्या ताब्यात जो प्रदेश शिल्लक उरला होता त्याच्या सरासरी वार्षिक महसूल उत्पन्नाच्या जवळजवळ तीनपट रक्कम खंडणी म्हणून त्याच्यावर लादण्यात आली होती. टिपूला देता येऊ नये इतकी मोठी ही रक्कम होती, तरीही ही देणी टिपूने फेडली. ही रक्कम वसूल करण्यासाठी टिपूला त्याच्या प्रजेची अक्षरशः पिळवणूक करावी लागली. त्याला त्याच्या प्रजेवर १.६० कोटी रुपयांची लेव्ही (जबरदस्तीने वसूल करण्यात येणारा कर) लादावी लागली. उर्वरीत रक्कम त्याला त्याच्या तिजोरीतून (१.१० कोटी रुपये) आणि सैन्याकडून (०.६० कोटी रुपये) जबरदस्तीने वसूल करण्यात आलेल्या भेटवस्तू व नजराण्यातून भरावी लागली. टिपूने ज्या असुरी वृत्तीने ही रक्कम गोळा केली त्याला ब्रिटिशांनी त्याच्यावर लादलेली जबरदस्त खंडणी कारणीभूत होती.[१]
तहाच्या अटी पूर्ण केल्यानंतर आणि स्वतःच्या दोन्ही अल्पवयीन मुलांची सुटका केल्यानंतर टिपूने संपूर्णपणे तटस्थतेच्या धोरणाचा अंगिकार केला. त्याने त्याची सगळी शक्ती युद्धामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याकरीता वापरण्यास सुरुवात केली. टिपूने त्याच्या पायदळात नवीन सैनिकांना सामील करून त्यांना शिस्त व लष्करी प्रशिक्षणाचे धडे देण्यासाठी फ्रेंच लष्कराधिकारी नियुक्त केले. याच कालावधीत त्याने श्रीरंगपट्टणम या त्याच्या राजधानीला तटबंदी करण्यास प्रारंभ केला.
इ.स. १७९६ साली टिपूच्या कैदेत असलेल्या म्हैसूरच्या नामधारी हिंदुराजाचे निधन झाल्यावर टिपूने त्याच्या मुलाला नामधारी राजेपदही नाकारले; परंतु राज्याचा कैदी म्हणून त्याचे निवृत्तीवेतन मात्र सुरू ठेवले. ब्रिटिशांच्या सामर्थ्यशाली सत्तेशी एकट्याने लढा देऊन त्यांना देशातून हुसकावून लावणे शक्य नसल्याचे ध्यानात आल्यावर टिपूने ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी मित्रपक्षांच्या शोधासाठी इ.स. १७९६ मध्ये आपले दूत अरेबिया, कॉन्स्टॅन्टिनोपल आणि काबूल येथे पाठविले आणि मराठे व ब्रिटिश यांच्याविरूद्धच्या लढ्यासाठी त्यांची मदत मिळावी म्हणून प्रयत्न केले.
फ्रेंच मदत
[संपादन]टिपूने फ्रेंचांशी मैत्रीपूर्ण संबंध राखलेले होते. त्याचे फ्रेंचांशी संबंध असले तरी टिपूने स्वतःच्या राज्यात त्यांना व्यापार करण्याची परवानगी दिलेली नव्हती मात्र स्वतःच्या सैन्यात भाडोत्री सैनिक म्हणून त्यांना भरती करून घेतलेले होते. फ्रान्समध्ये सप्टेंबर, इ.स. १७९२ साली राजेशाहीचा शेवट झाल्यानंतर फ्रेच-इंग्रज वैर अधिकच उफाळून आले. फ्रेंचही इंग्रजांच्या विरोधात मित्रांच्या शोधात असल्याने टिपू सुलतानही ब्रिटिशांविरुद्ध आघाडी उघडण्यासाठी त्यांना मदत करण्यास तयार होता पण त्यापूर्वी फ्रेंचांनी दहा हजार सैनिकांची फौज दक्षिणेत उतरवावी ही टिपूची अट होती. इ.स. १७९६ साली टिपूने त्याचा एक दूत मॉरीशसचा फ्रेंच गव्हर्नर जनरल मॅलार्टिककडे पाठवला. टिपूने त्याच्या लष्करातील भाडोत्री फ्रेंच सैनिकांना खूष करण्यासाठी १५ मे, इ.स. १७९७ रोजी श्रीरंगपट्टणम येथे जॅकोबिन क्लबची स्थापना केली. फ्रेंच गणराज्याचा ध्वजही फडकविण्यात आला व २३०० तोफांची सलामी देण्यात आली.
फ्रेंचांचा जाहीरनामा
[संपादन]३० जानेवारी, इ.स. १७९८ रोजी फ्रेंच गव्हर्नरने एक जाहिरनामा प्रस्तुत केला.
टिपू सुलतान फ्रेंचांसोबत एक आक्रमक आणि संरक्षणात्मक करार करू इच्छितो. त्यासाठी तो आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन देतो. तो घोषित करतो की, येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणींना तोंड देण्याची त्याने जय्यत तयारी केली आहे. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास तो अशा क्षणाची वाट पाहत आहे की, फ्रेंच त्याच्या मदतीला येतील व इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारतील. भारतातून इंग्रजांना हुसकावून लावण्यास तो अतिशय उत्सुक आहे.[२]
त्यावेळी लष्करी जबाबदारी स्विकारण्याची फ्रेंच सरकारची तयारी नव्हती तरीही मॅलार्टिकच्या जाहिरनाम्याला प्रतिसाद म्हणून टिपूच्या ब्रिटिशविरोधी अभियानासाठी ९९ लढाऊ फ्रेंच सैनिकांची एक तुकडी मंगळूरला रवाना करण्यात आली.
युद्धपूर्व घडामोडी
[संपादन]वेलस्लीची नीती
[संपादन]फ्रेंचांची टिपू सुलतानाला मदत ही ब्रिटिशांच्या दृष्टीने गंभीर बाब होती त्यामुळे मे, इ.स. १७९८ मध्ये लॉर्ड वेलस्ली तातडीने कोलकाता येथे आला व त्याने टिपूला कायमचा धडा शिकविण्याचे ठरविले. युद्धाची तयारी म्हणून प्रथम वेलस्लीने हैदराबादच्या निजामाला इ.स. १७९८ च्या सप्टेंबर महिन्यात तैनाती फौजेच्या जाळ्यात ओढले व ब्रिटिश फौजेची एक सशस्त्र तुकडी हैदराबादकडे रवाना केली. इंग्रजांच्या आलेल्या तैनाती फौजेमुळे हैदराबाद येथील सगळे फ्रेंच अधिकारी भयभीत झाले व त्यांनी ब्रिटिशांच्या काही अटी मान्य करून त्यांची शरणागती पत्करण्याचे ठरविले. मराठ्यांनी टिपूविरुद्धच्या मोहिमेत ब्रिटिशांची साथ द्यावी यासाठीही वेल्स्लीने प्रयत्न केले. मराठ्यांनी जर ब्रिटिशांना साहाय्य केले तर त्यांचा कसा फायदा होईल याची प्रलोभने दाखविण्यात आली. टिपूच्या नष्ट होण्याने होणाऱ्या फायद्यात भागीदारी देण्याचेही प्रलोभन देण्यात आले पण पेशव्याने टिपूविरुद्ध लढण्यासाठी ब्रिटिशांच्या मदतीला मराठी फौज पाठविण्यास नकार दिला परंतु ब्रिटिश टिपूविरुद्ध जी कारवाई करणार आहेत त्याबाबत तटस्थता पाळण्याचे आश्वासन दिले.
अंतिम व्यूहरचना
[संपादन]टिपूच्या संभाव्य भारतीय मित्रांना शांत करण्याचे वेल्स्लीचे प्रयत्न संपल्यानंतर वेलस्लीने टिपू सुलतानाला ८ नोव्हेंबर, इ.स. १७९८ रोजी अत्यंत कडक शब्दात एक पत्र लिहिले. त्याने ब्रिटिशांचे कट्टर शत्रू असलेल्या फ्रेंचांशी टिपूची जी गुप्त खलबते चालू आहेत त्याबद्दल त्याला जाब विचारला. टिपूने त्याचे फ्रेंचांशी असलेले सर्व संबंध तोडावेत व त्याच्या लष्करातील भाडोत्री फ्रेंच अधिकाऱ्यांना व विदेशी लोकांना रजा द्यावी तसेच हैदराबादच्या निजामाप्रमाणे कंपनीशी तैनाती फौजेचा करार करावा असेही टिपूला कळविण्यात आले. टिपूची फ्रेंचांशी चालू असलेली गुप्त खलबते म्हणजे त्याने कंपनीशी केलेल्या तहाचा भंग असून ते ब्रिटिशविरोधी प्रतारणेचे प्रतीक आहे असेही वेलस्लीने टिपूला पत्रातून खडसावून सांगितले. टिपूने फ्रेंचांशी असलेले संबंध तोडल्याचा पुरावा म्हणून त्याने त्याचा समुद्रकिनाऱ्यालगतचा भूप्रदेश कंपनीच्या हवाली करावा अशी गळ घालून त्यासाठी बोलणी करण्यासाठी वेलस्लीने मेजर जॉन डोव्हेटनला स्वतःचा दूत म्हणून नियुक्त केले.
या पत्राला टिपूकडून कोणतेही उत्तर येण्याच्या आतच गव्हर्नर जनरल असलेल्या वेलस्लीने टिपूच्या प्रदेशावर हल्ला करण्यासाठी ब्रिटिश नौसेनाला सज्ज राहण्यास सांगितले व टिपूविरुद्धच्या मोहिमेचे मार्गदर्शन करण्यासाठी तो स्वतः कोलकात्याहून मद्रासला आला. तिथे आल्यावर दिनांक ३१ डिसेंबर, इ.स. १७९८ रोजी त्याला टिपूचे पत्र मिळाले. टिपूने वेलस्लीला पाठविलेल्या या पत्रात उडवाउडवीची उत्तरे दिलेली होती. ९ जानेवारी, इ.स. १७९९ रोजी वेलस्लीने टिपूला पुन्हा एक सविस्तर पत्र लिहिले व पत्र मिळताच २४ तासाच्या आत त्याच्या संपूर्ण शरणागतीची मागणी केली. अर्थात हे पत्र म्हणजे युद्धाचीच धमकी असल्याने टिपू त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत पडला नाही.
युद्धातील मुख्य घटना
[संपादन]सुरुवात
[संपादन]इंग्रज आपल्यावर हल्ला करतील हे कळून चुकल्यावर टिपूने हल्ल्याविषयी आडाखे बांधण्यास व हल्ल्याचा प्रतिकार करण्याची तयारी सुरू केली. इंग्रज मद्रासहून हल्ला करतील असा टिपूचा अंदाज होता त्यामुळे त्याने प्रतिकाराची तयारी म्हणून त्याच्या ताब्यातील उत्तरेकडील हिरवागार प्रदेश प्रथम जाळून उद्ध्वस्त केला ज्यायोगे त्या भागातून येणाऱ्या इंग्रज फौजेला गवताची काडीही मिळू नये असा टिपूचा उद्देश होता. हा प्रदेश उद्ध्वस्त करण्यात टिपूने दोन आठवडे घातले. ब्रिटिशांनी सुरुवातीलाच टिपूचा हा डाव हाणून पाडला. ब्रिटिशांनी मद्रासच्या बाजूने आक्रमण न करता टिपूच्या प्रदेशाच्या दक्षिणेकडील बाजूने दोन भिन्न मार्गांनी लॉर्ड वेलस्लीने टिपूविरुद्ध सैन्याच्या दोन तुकड्या पाठवून आक्रमण केले. एका मुख्य तुकडीचे नेतृत्व जनरल हॅरीसकडे तर दुसऱ्या तुकडीचे नेतृत्व जनरल स्टुअर्टकडे होते. ब्रिटिशांची मुख्य फौज जिचे नेतृत्व जनरल हॅरीसकडे होते ती ११ फेब्रुवारी, इ.स. १७९९ रोजी वेल्लोरहून निघाली व तिने पूर्वेकडून म्हैसूरवर आक्रमण केले. ब्रिटिशांची दुसरी फौज जनरल स्टुअर्टच्या नेतृत्वाखाली मुंबईहून २१ फेब्रुवारी, इ.स. १७९९ला निघून कन्नूर मार्गे पुढे सरकली. हैदराबादच्या निजामाची दहा हजारची सेना गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्लीचा घाकटा भाऊ ऑर्थर वेलस्लीच्या नेतृत्वाखाली जनरल हॅरीसच्या मुख्य सेनेला टिपूच्या मुलुखात प्रवेश करण्यापूर्वी दिनांक ५ मार्च, इ.स. १७९९ रोजी येऊन मिळाली.
सडासीरची लढाई
[संपादन]सुरुवातीला टिपूची गाठ श्रीरंगपट्टणमच्या पश्चिमेला सडासीर येथे मुंबईहून येणाऱ्या फौजेशी पडली. तिथे टिपूने जनरल स्टुअर्टच्या फौजेवर हल्ला केला. स्टुअर्टने टिपूचा हा हल्ला परतवून लावला पण या हल्ल्यावेळी टिपूचे एक हजार सैनिक मृत पावले वा जखमी झाले.
मालावलीची लढाई
[संपादन]पूर्वेक़डून येणारी हॅरीसची फौज स्टुअर्टच्या फौजेला येऊन मिळण्यापूर्वी तिला रोखण्यासाठी टिपूने आपला मोर्चा पूर्वेकडे वळवला. परंतु श्रीरंगपट्टणमपासून तीस किलोमीटरवर असलेल्या मालावली याठिकाणी त्याचा पराभव झाला.
श्रीरंगपट्टणमची मुख्य लढाई
[संपादन]यानंतर टिपू त्याच्या भक्कम तटबंदी असलेल्या श्रीरंगपट्टणम येथील किल्ल्यात आश्रयासाठी गेला. त्याचा माग काढत ब्रिटिश सेना ५ एप्रिल, इ.स. १७९९ रोजी श्रीरंगपट्टणमपासून तीन किलोमीटर अंतरावर पोहोचली. या सेनेला नंतर जनरल स्टुअर्टचीही फौज येऊन मिळाली. यानंतर जवळपास महिनाभर श्रीरंगपट्टणम किल्ल्याला वेढा घालण्यात आला. ४ मे, इ.स. १७९९ रोजी ब्रिटिश फौजांनी श्रीरंगपट्टणम किल्ल्यावर अंतिम हल्ला केला. किल्ल्याच्या एका भिंतिजवळ ब्रिटिश तोफखाना उभारण्यात आला होता. ४ मेच्या पहाटे ब्रिटिश सैनिक खंदकात दडून बसले व दिवस वर येईपर्यंत वाट पाहत राहिले आणि सूर्य मध्यान्ही आला असताना त्यांनी अचानक किल्ल्ल्यावर हल्ला केला. दिवस मावळताना हल्ला होईल ही टिपूची अपेक्षा असल्याने टिपूचे सैन्य दुपारचे भोजन करण्यात आणि विश्रांती घेण्याच्या तयारीत असल्याने ते या हल्ल्यासाठी पुरेसे तयार नव्हते.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खंदकात दडून बसलेल्या ब्रिटिश सैनिकांनी खंदकाच्या बाहेर येऊन तोफखान्याच्या संरक्षणाखाली कावेरीचे खडकाळ पात्र पार करून श्रीरंगपट्टणम किल्ल्याच्या समोरचा खंदक पार करून हल्ला चढवला. टिपूच्या राजवाड्यातून काही काळ प्रतिकार चालू राहिला पण लवकरच किल्ल्यातील दारूगोळा संपल्याने प्रतिकार थंडावला. दुपारी अडिच वाजण्याच्या सुमारास इंग्रजांचा निर्णायक विजय झाला. यावेळी टिपू सुलतान मारला गेला. बंदुकीच्या गोळ्यांनी त्याच्या शरीराची चाळण झाली होती. टिपूचा मृतदेह किल्ल्याच्या पाणदरवाज्यात प्रेतांच्या ढिगार्यात आढळला. त्याचे बहुतेक सेनानी किल्ल्याचे संरक्षण करीत असताना मारले गेले. किल्ल्यात जे जिवंत आढळले त्यांना क्रूरपणे मारण्यात आले. श्रीरंगपट्टणम शहर विजयी सेनेने लुटले. दुसऱ्या दिवशी टिपूच्या कुटुंबियांनी त्याचे शव ओळखले त्या शवाचे लष्करी इतमामाने दफन करण्यात आले. टिपू हा मृत झाला आहे हे सर्वांना कळावे या हेतूनेच इंग्रजांनी टिपूच्या शवाला सन्मान दिला. टिपूच्या दोन्ही अल्पवयीन मुलांना कैद करण्यात आले परंतु कत्तल केलेल्या त्याच्या सेनाधिकाऱ्याच्या कुटुंबांना सौजन्याची वागणूक देण्यात आली. टिपूचा संपूर्ण खजिना आणि किल्ल्यातील त्याची मालमत्ता विजेत्या सैनिकांमध्ये वाटण्यात आली.
परिणाम
[संपादन]टिपूच्या पाडावाबरोबरच म्हैसूर येथील टिपूची तेहतीस वर्षांची राजवट संपुष्टात आली. टिपूच्या ताब्यात असलेल्या प्रदेशाचे चार भाग करण्यात आले. यातील मोठा वाटा इंग्रजांनी घेतला. त्यांनी पश्चिमेकडील कनारा, दक्षिण-पश्चिमेकडील वायनाड आणि पूर्वेचे दोन जिल्हे शिवाय कोईमतूर आणि दारापोरम हे दोन जिल्हे, श्रीरंगपट्टणम हे शहर आणि बेटवजा श्रीरंगपट्टणमचा किल्ला आपल्या ताब्यात घेतले. निजामाला त्याच्या राज्याजवळ गुट्टी व गरमकोंडा हे जिल्हे मिळाले. चितळगुर्गचा किल्ला सोडता संपूर्ण चितळदुर्ग जिल्हा निजामाला देण्यात आला. तटस्थता पाळणाऱ्या पेशव्याला हरपनहल्ली आणि स्कोंडा हे दोन जिल्हे वेलस्लीने देऊ केले पण पेशव्याने ते स्विकारण्यास नकार दिला. त्यांचे वाटप ब्रिटिश व निजाम यांच्यात करण्यात आले. टिपूच्या राज्याचा चौथा भाग ज्यात म्हैसूर या शहराचा आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या प्रदेशाचा समावेश होता त्यातून त्याच म्हैसूर नावाने एका हिंदू राज्याची निर्मिती करण्यात आली व तिथे दिवंगत राजाच्या अल्पवयीन मुलाला गादीवर बसविण्यात आले. त्याच्याशी तैनाती फौजेचा करार करण्यात येऊन त्याला ब्रिटिश संरक्षण प्रदान करण्यात आले. नवनिर्मित म्हैसूर राज्य उत्तर बाजू सोडता ब्रिटिश प्रदेशाने घेरले गेले. पुढे इ.स. १८०० म्ये तैनाती फौजेच्या वाढीव खर्चासाठी निजामाला दिलेला प्रदेशही त्याच्याकडून काढून घेण्यात आला. अशा रितीने म्हैसूरचे संपूर्ण राज्य ब्रिटिश प्रदेशाने घेरले गेले.
ब्रिटिश सेनेला बक्षिसे
[संपादन]वेलस्लीच्या यशाचे इंग्लंडमध्ये कौतुक करण्यात आले आणि त्याला आयर्लंडच्या परंपरेतील मार्क्विस या उपाधीने सन्मानित करण्यात आले. त्याला ईस्ट इंडीजमधील संपूर्ण ब्रिटिश फौजेचा सरसेनानीही करण्यात आले. जनरल हॅरिसला बॅरन या उपाधीने सन्मानित करण्यात आले. या लष्करी मोहिमेत सहभागी झालेल्या सगळ्याच लष्करी व्यक्तींना रोख पारितोषिके, नोकरीत पदोन्नती, आणि राजकीय उपाधी यांनी गौरविण्यात आले. आर्थर वेलस्लीला सात हजार पाउंड रोख, शिवाय बाराशे पाउंड किंमतीचे जवाहिर मिळाले. लॉर्ड वेलस्लीला रोख एक लाख पाउंड देण्यात आले परंतु त्याने ते नम्रपणे नाकारल्याने त्याला वार्षिक पाच हजार पाउंड असे वीस वर्षे देण्यात यावेत असा निर्णय घेण्यात आला.
चित्रदालन
[संपादन]-
डेविड बेअर्ड टिपू सुलतानचे शव न्याहाळताना
-
ब्रिटिश सेना टिपूचे शव शोधताना
-
हेन्री सेंगलटन याने काढलेले चित्र
-
ब्रिटिश लायब्ररीत असलेले चौथ्या इंग्रज-मैसूर युद्धाचे चित्र
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ हबीब, इरफान. रेझिस्टन्स अँड मॉडर्नायझेशन अंडर हैदर अली अँड टिपू सुलतान. p. ३९.
- ^ जेम्स, विल्यम मिलबोर्न. ब्रिटिश रुल इन इंडिया. p. ९९.
अधिक वाचनासाठी
[संपादन]- घोलम, मोहम्मद. द हिस्ट्री ऑफ हैदर शाह अलाइस हैदरअली खान बहादुर (इंग्रजी भाषेत). २४ नोव्हेंबर, २०१२ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ब्राऊन, चार्ल्स फिलीप. मेमरीज ऑफ हैदर अँड टिपू, रूलर्स ऑफ श्रीरंगपट्टम (इंग्रजी भाषेत). २४ नोव्हेंबर, २०१२ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - एडवर्ड मूर. "अ नेरेटीव्ह ऑफ द ऑपरेशन्स ऑफ कॅप्टन लिटल्स डिटॅचमेंट अँड ऑफ द मराठा आर्मी कमांडेड बाय परशुरामभाऊ ड्युरींग द लेट कॉन्फेडर्सी इन इंडिया अगेन्स्ट द नवाब टिपू सुलतान बहादूर" (इंग्रजी भाषेत). २४ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
बाह्य दुवे
[संपादन]- द ब्रिटिश एम्पायर:१०३ मराठा लाइट इन्फन्ट्री
- श्रीरंगपट्टणम इ.स. १७९९ लेटर: मेजर लाचलन मेकरीचे दिनांक १५ मार्च, इ.स. १७९९ रोजीचे पत्र Archived 2008-10-13 at the Wayback Machine.
- श्रीरंगपट्टणम इ.स. १७९९ लेटर: जनरल स्टुअर्टने ८ मार्च, इ.स. १७९९ रोजी लॉर्ड मॉर्निंगटनला लिहिलेले पत्र Archived 2008-11-20 at the Wayback Machine.
- द बॅटल ऑनर्स ऑफ द रेजिमेंट: सडासीर इ.स. १७९९ फस्ट अँड सेकंड बटालियन Archived 2011-07-26 at the Wayback Machine.