चांगुनारायण मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चांगुनारायन मंदिर
चाँगुनारायण मंदिर
चांगुनारायन मंदिर
चांगुनारायन मंदिर
पर्यायी नकाशा
पर्यायी नकाशा
चांगुनारायन मंदिर
नेपाळ मधील मंदिराचे स्थान
नाव
संस्कृत चांगुनारायण मन्दिरम्
मराठी चांगुनारायण मंदिर
भूगोल
गुणक 27°42′58.6″N 85°25′40.4″E / 27.716278°N 85.427889°E / 27.716278; 85.427889गुणक: 27°42′58.6″N 85°25′40.4″E / 27.716278°N 85.427889°E / 27.716278; 85.427889
देश नेपाळ
राज्य/प्रांत काठमांडू
जिल्हा भक्तपुर
स्थानिक नाव चाँगुनारायण मंदिर
संस्कृती
मूळ आराध्यदैवत विष्णू
महत्त्वाचे उत्सव तीज, प्रबोधिनी एकादशी, नागपंचमी
स्थापत्य
स्थापत्यशैली पॅगोडा
इतिहास व प्रशासन
निर्माणकर्ता हरिदत्त बर्मा

चांगुनारायण मंदिर हे नेपाळ मधील भक्तपुर जिल्ह्यातील चांगुनारायन गावात वसलेले प्राचीन हिंदू मंदिर आहे. हे मंदिर एका उंच टेकडीवर वसलेले आहे, ज्याला चांगू किंवा डोलागिरी असेही म्हणतात. या मंदिराच्या भोवती चंपक वृक्षाचे जंगल आहे. ही टेकडी काठमांडूच्या पूर्वेस ७ मैल म्हणजेच अंदाजे १२ किमी अंतरावर आणि भक्तपूरच्या उत्तरेस काही मैलांवर आहे. डोंगराच्या शेजारी मनोहरा नदी वाहते. हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित असून ऐतिहासिक, कलात्मक आणि धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणूनही महत्त्वाचे आहे. तसेच हे मंदिर नेपाळच्या इतिहासातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराचा इ.स. १९७९ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. तसेच हे युनेस्कोच्या नेपाळ मधील जागतिक वारसा असलेलया काठमांडू व्हॅलीच्या सात स्मारकांपैकी एक आहे.[१]

तेलकोट भांज्यांग-तेलकोट दांडा-चांगू हा मार्ग खोऱ्यातील ट्रेकिंगचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो. हे क्षेत्र नगरकोटच्या ट्रेकिंगसाठी आणि काठमांडू व्हॅलीच्या दृश्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. काश्मिरी राजाने आपली मुलगी चंपक हिचा विवाह भक्तपूरच्या राजपुत्राशी केला. चांगू नारायण मंदिर हे तिच्या नावावर आहे.[२]

इतिहास[संपादन]

चांगुनारायणाला चंपकनारायण, गरुडनारायण इत्यादी नावानेही ओळखले जाते. तर लिच्छवी काळात या मंदिराचे नाव डोलशिखर स्वामी होते. चांगुनारायण मंदिरातील टेकडीचे नाव डोलागिरी आहे आणि त्याच्या शिखराचा स्वामी म्हणून त्याला डोलशिखर स्वामी म्हणतात. मल्लकाच्या काळात त्यांचे 'चंगुनारायण' हे नाव नेपाळी भाषेत लोकप्रिय झाले. याच चंगुनारायण नावाचे नंतर अपभ्रंश होऊन चाँगुनारायण असे झाले. संस्कृतमध्ये त्यांना चंपकनारायण म्हणतात.[३][२]

चांगुनारायण मंदिर लिच्छवी काळात राजा हरिदत्त बर्माने बांधले असले तरी, राजा मानदेव-२ याने इस पूर्व ५२१ मध्ये चांगुनारायण मंदिरात गरुडाची मूर्ती उभारली होती. त्याच वेळी राजा मांडदेव यांनी चांगुनारायण मंदिरालगतची जमीन देऊ केली. राजा मानदेवने चांगुनारायण मंदिरात त्याची स्वतःची आणि त्याच्या पत्नीच्या मूर्ती स्थापित केल्या.

बांधकाम शैली[संपादन]

हे मंदिर नेपाळच्या मूळ पॅगोडा सदृश शैलीतील वास्तुकलेचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. लिच्छवी स्थापत्यकलेचे ते उदाहरण आहे. त्याचे वेळोवेळी नूतनीकरण करण्यात आले आहे. मध्ययुगात राजा शिव सिंहची राणी गंगाराणी आणि १८व्या शतकाच्या सुरुवातीला कांतिपूरचा शासक भास्कर मल्ल यांच्या कारकिर्दीत. अलीकडेच काही दशकांपूर्वी त्याचे नूतनीकरण करण्यात आले.[२][४]

समृद्ध नक्षीकाम असलेल्या नेपाळी मंदिर वास्तुकलेतील हा एक मैलाचा दगड आहे. दुमजली छताचे मंदिर दगडाच्या उंच टेकडीवर उभे आहे. हे मंदिर शिखर शैलीचे किंवा पॅगोडा शैलीचे नाही. त्याची एक स्थापत्य शैली आहे ज्याचे वर्णन पारंपारिक नेपाळी मंदिर म्हणून करू शकतो. गोकर्ण महादेव येथे अशीच अनेक वैशिष्ट्ये आढळतात. हे मंदिर भगवान विष्णूशी संबंधित शिल्पे आणि कलकृतींनी वेढलेले आहे. तसेच, मुख्य मंदिराच्या प्रांगणात आपल्याला भगवान शिव, अष्ट मातृका, छिन्नमस्तक, किलेश्वर आणि कृष्णाची मंदिरे आढळतात. मंदिराला चार प्रवेशद्वार आहेत आणि प्रवेशद्वारांच्या प्रत्येक बाजूला सिंह, सरभ, ग्रिफिन्स आणि हत्ती यांसारख्या प्राण्यांच्या आकाराच्या जोडीने हे दरवाजे पहारा देतात. भगवान विष्णूचे दशावतार आणि इतर मूर्ती छताला आधार देणाऱ्या स्ट्रट्समध्ये कोरलेल्या आहेत. प्रवेशद्वारावर नाग प्रतिमा कोरलेल्या आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर (म्हणजे पश्चिमेकडील प्रवेशद्वारावर) चक्र, शंख, कमल आणि खड्ग हे सर्व दगडी स्तंभाच्या शीर्षस्थानी आढळतात. या दगडी खांबांवर संस्कृतमध्ये शिलालेख आहे. हा शिलालेख नेपाळमधील सर्वात जुना शिलालेख मानला जातो आणि दगडी शिलालेख स्तंभ लिच्छवी राजा मानदेव यांनी ४६४ मध्ये उभारला होता.[२][५][४]

या मंदिराच्या बांधकामात लाकूड आणि विटा जास्त आणि दगड आणि धातूचा कमी वापर झाला आहे. मुख्य दरवाजा, तोरण आणि गेटमध्ये धातूचा वापर करण्यात आला आहे.[५]

मुर्त्या आणि शिल्प [२][संपादन]

 • स्तंभ ४६४ मध्ये मानदेव यांनी उभारलेला ऐतिहासिक स्तंभ
 • गरुड :- भगवान विष्णूचे उडणारे वाहन ज्याला मानवी चेहरा आहे आणि तो विष्णूचा भक्त आहे.
 • चंदा नारायण (गरुड नारायण):- गरुडावर स्वार झालेले विष्णूचे ७व्या शतकातील दगडी शिल्प. नेपाळ राष्ट्र बँकेने जारी केलेल्या १० रुपयांच्या नोटेमध्ये हे शिल्प चित्रित करण्यात आले आहे.
 • श्रीधर विष्णू :- ९व्या शतकातील विष्णू, लक्ष्मी आणि गरूड यांचे दगडी शिल्प जे विविध आकृतिबंधांच्या पायावर उभे आहे.
 • वैकुंठ विष्णू  :- ललितासन स्थितीवर विष्णूच्या मांडीवर विराजमान सहा शस्त्रधारी गरुड आणि लक्ष्मी बसलेले विष्णूचे १६व्या शतकातील शिल्प.
 • छिन्नमस्ता :- छिन्नमस्ता देवीला समर्पित मंदिर, ज्याने स्वतःचा शिरच्छेद केला, तिने भुकेल्या डाकिनी आणि वर्णिणीला खाण्यासाठी स्वतःचे रक्त अर्पण केले.
 • विश्वरूप :- ७व्या शतकातील दगडी शिल्प- भागवत गीतेतील दृश्याचे चित्रण करणारे सुंदर कोरीवकाम, ज्यामध्ये भगवान कृष्ण आपल्या भक्त अर्जुनला आपले वैश्विक रूप प्रकट करतात.
 • विष्णू विक्रांत :- त्रिविक्रम विष्णूचे ७व्या शतकातील शिल्प जे भगवान विष्णू आणि त्यांचा प्रिय बळी राजा यांच्या लोकप्रिय हिंदू पौराणिक कथांचे दृश्य दर्शवते.
 • नृसिंह  :- भगवान विष्णूचा अवतार असलेल्या नृसिंहाचे ७ व्या शतकातील शिल्प, ज्याने आपल्या प्रिय भक्त प्रल्हादला वाचवण्यासाठी राक्षस राजा हिरण्यकश्यपाचा वध केला.
 • किलेश्वर :- टेकडीच्या रक्षणासाठी या ठिकाणी प्रकट झालेल्या शंकराची छोटी दुमजली मंदिरे.

गर्भगृहातील मुख्य प्रतिमेची हिंदू लोक गरुड नारायण म्हणून पूजा करतात आणि बौद्ध लोक हरिहरीहरी वाहन लोकेश्वर म्हणून पूजा करतात.[४]

चित्र दालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "SAARC tourism". Archived from the original on २२ जुलै २०१०. ७ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
 2. ^ a b c d e "CHANGU NARAYAN TEMPLE" (इंग्रजी भाषेत). templepurohit.com.
 3. ^ प्रेम खत्री, पेशल दहल. नेपाळची कला आणि पुरातत्व. 2051, मी. के. प्रकाशक आणि वितरक, भोटाहिटी, काठमांडू.
 4. ^ a b c "CHANGU NARAYAN" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2015-12-24. २१ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
 5. ^ a b "नेपाल के 15 प्रसिद्ध धार्मिक स्थल". hindi.webdunia.com (हिंदी भाषेत). Archived from the original on 2021-05-23. २१ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.