चर्चा:आजीबाई बनारसे
खालील मजकूर निष्पक्षपाती दृष्टिकोनातून लिहून मुख्य लेखात हलवावा.
अभय नातू (चर्चा) ००:२४, २६ मे २०१६ (IST)
लंडनच्या आजीबाई (जन्म : विदर्भ-महाराष्ट्र, इ.स. १९१०; मृत्यू : लंडन, इ.स. १९८३) म्हणजे १९५०-६०-७० च्या दशकांत इंग्लंडमध्ये शिक्षण तसेच नोकरीधंद्यासाठी गेलेल्या अनेक भारतीयांवर मायेची पाखर धरणार्या बनारसे आजी.
राधा डहाके नावाची एक मुलगी विदर्भातील सावतेली समाजात, यवतमाळ जिल्ह्यातील एका आडबाजूच्या खेडेगावात जन्माला आली. ही एक अशिक्षित, अडाणी स्त्री. लग्नानंतर पाच मुली झाल्यावर या बाईचा नवरा अकाली गेला आणि ऐन पस्तिशीत ती विधवा झाली. पण तोवर तिच्या तीन मुलींची लग्ने झाली होती. उरलेल्या दोन मुली पदरात होत्या. नवर्यापश्चात सासरची मंडळी आणि परिस्थितीने असहकार पुकारलेला असताना लंडनचे आबाजी बनारसे हे विधुर गृहस्थ आपल्या गावी आले, त्यांनी या विधवेशी लग्न केले आणि साधी गावची सीमाही न ओलांडलेली ही स्त्री चक्क लंडनला जाण्यासाठी आगबोटीवर चढली.
लंडनमध्ये गेल्यावर
[संपादन]लंडनमध्ये आबाजींच्या विठ्ठल आणि पांडुरंग या विवाहित मुलांना वडलांचे हे दुसरे लग्न पसंत नसल्यानं राधाबाईंचे लंडनमध्ये थंडे स्वागत झाले. घरात राबायला एक गुलाम मिळाला, यापलीकडे त्यांना कुणी गृहीत धरले नव्हते. आबाजींची मुले तिथं लॉजिंग-बोर्डिग चालवत होती. भारतातून शिक्षण व नोकरीसाठी लंडनला आलेल्या भारतीयांना निवारा आणि त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था ते करीत असत. सावत्र नातवंडे राधाबाईंना ‘आजी’ म्हणून हाक मारीत. साहजिकच इतरही लोक त्यांना ‘आजी’ म्हणू लागले. एकीकडे घरात गुलामासारखे राब राब राबत असताना आजीबाई हळूहळू तिथली भाषा, संस्कृती, माणसे यांच्याशी परिचित होत गेल्या. त्यांच्या हाताला चव होती. त्यामुळे त्यांच्या खाणावळीला बरकत येत गेली. परंतु अचानक आबाजी गेले आणि बनारसे आजी पुन्हा रस्त्यावर आल्या. सावत्र मुलांनी त्यांना घराबाहेर काढले.
शून्यातून सुरुवात
[संपादन]बमारसे आजींनी आपल्या कला आणि कमळा या मुलींना भारतातून बोलवून घेतले आणि त्यांच्या साहाय्याने त्यांनी शून्यातून सुरुवात केली. कर्ज काढून डोक्यावर छप्पर मिळवले. त्यांच्या हातचे चवदार खाण्याची सवय झालेल्या विद्यार्थ्यांनीही त्यांना याबाबतीत मदत केली. अहोरात्र कष्ट करत आजीबाईंनी खाणावळीत जम बसवला. हळूहळू त्यांचा लौकिक सर्वदूर पसरू लागला. त्याकाळी भारतातून येणारी कला क्षेत्रातील मंडळी, यशवंतराव चव्हाण व इंदिरा गांधींसारखे नेते आजीबाईंच्या या कर्तबगारीने प्रभावित झाले होते. आजीबाईंच्या अविश्रांत कष्टांना यश येऊन त्यांना स्थैर्य, पैसा, प्रसिद्धी, नावलौकिक प्राप्त होत गेला. त्यांच्या मालकीच्या अनेक इमारती लंडनमध्ये उभ्या राहिल्या. लंडनमध्ये मंदिर बांधून भारतीयांना एकत्र येण्यासाठी त्यांनी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. लंडनच्या महाराष्ट्र मंडळाच्या पायाभरणीत आणि तिथल्या सांस्कृतिक उपक्रमांना आकार देण्यातही आजीबाईंचा मोलाचा वाटा आहे. ‘भारतीयांचा लंडनमधील आधारवड’ ही त्यांची ओळख त्यातून दृढ होत गेली. आजही त्यांच्या मृत्यूनंतर लंडनमधील भारतीयांच्या मनात अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना अढळ स्थान आहे.
पुस्तक आणि नाटक
[संपादन]- सरोजिनी वैद्य यांनी बनारसे आजींच्या जीवनावर ‘कहाणी लंडनच्या आजीबाईंची’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा १९९६-९७ सालचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे.
- राजीव जोशी यांनी लिहिलेले ‘लंडनच्या आजीबाई’ नावाचे नाटक कलामंदिर संस्थेने रंगभूमीवर आणले. संतोष वेरुळकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात बनारसे आजींची भूमिका उषा नाडकर्णी यांनी केली आहे.
- लंडनच्या आजी बाई (लेखक सतीश पोरे, बालसाहित्य)