Jump to content

गोपाळराव बळवंतराव कांबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोपाळराव बळवंतराव कांबळे
पूर्ण नावगोपाळराव बळवंतराव कांबळे
जन्म जुलै २२, इ.स. १९१८
कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
मृत्यू जुलै २१, इ.स. २००२
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रकला (भित्तिचित्रण, व्यक्तिचित्रण)
शैली वास्तववादी चित्रशैली

गोपाळराव बळवंतराव कांबळे ऊर्फ जी. कांबळे (जुलै २२, इ.स. १९१८ - जुलै २१, इ.स. २००२) हे भित्तिचित्रण(पोस्टर चित्रण) आणि व्यक्तिचित्रणाकरता नावाजलेले मराठी चित्रकार होते.

जीवन[संपादन]

जुलै २२, इ.स. १९१८ रोजी कोल्हापुरात गोपाळराव कांबळ्यांचा जन्म झाला. घरच्या गरिबीच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही कलाविद्यालयामध्ये पद्धतशीर शिक्षण न घेता कांबळ्यांची चित्रकारकिर्दीची वाटचाल सुरू झाली. कलेला वाव मिळावा म्हणून ते मुंबईला गेले. सुरुवातीच्या काळात त्यांनी फिल्मसिटी, रणजित स्टुडिओ, बॉंबे टॉकीज, नॅशनल स्टुडिओ अशा चित्रपट स्टुडिओंमधून पोस्टर रंगविण्याची कामे केली. त्यांची गुणवत्ता ओळखून व्ही. शांताराम यांनी त्यांना आपल्या राजकमल चित्रमंदिरात बोलावून घेतले. त्या काळात कांबळ्यांनी दो ऑंखे बारा हात, अपना देश, तूफान और दिया, झनक झनक पायल बाजे, नवरंग, सेहरा, गीत गाया पत्थरोंने, अमर भूपाळी, सावता माळी, इ चित्रपटांची पोस्टर रंगवली. हिंदी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक ठरलेल्या मुघल-ए-आझम चित्रपटाचे पोस्टरदेखील त्यांनी रंगवले होते.

कालांतराने कांबळे पोस्टरचित्रणाकडून व्यक्तिचित्रणाकडे वळले. पाच वर्षांच्या अभ्यासातून त्यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र राजमान्य, लोकमान्य ठरले. त्यांनी रंगवलेल्या राजर्षि शाहू महाराजांच्या चित्रावरून टपाल तिकिट बनवण्यात आले. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, जॉन एफ. केनेडी, रवींद्रनाथ टागोर, अटलबिहारी वाजपेयी, लता मंगेशकर इत्यादींची त्यांनी रंगवलेली व्यक्तिचित्रे वाखाणली गेली.

गोपाळराव कांबळे यांचे जुलै २१, इ.स. २००२ रोजी निधन झाले.