गृहशोभन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गृहशोभन म्हणजेच (इंटिरिअर डेकोरेशन) वास्तूचा अंतर्भाग सुखकर, सुंदर व सुविधापूर्ण करण्याची कला. खाजगी घरे वा निवासस्थाने आणि सभागृहे, कार्यालये, रुग्णालये, उपाहारगृहे, क्रीडाभवने, चित्रपटगृहे यांसारख्या सार्वजनिक वास्तूंच्या सजावटीसाठी आधुनिक काळात गृहशोभनाचे स्वतंत्र तंत्रच निर्माण झाले आहे.

कुटुंबाचे राहणीमान, अभिरुची व विशेष गरजा इ. लक्षात घेऊन गृहशोभनाचे नियोजन करावे लागते. घरात इच्छित वातावरणनिर्मिती असावी म्हणूनही साधारणपणे फर्निचरचे रूप व मांडणी, प्रकाशयोजना, रंगसंगती यांचा विचार करावा लागतो. गृहशोभन ही एक संमिश्र कला असून तिच्याशी विविध विषय व तंत्रे निगडित आहेत. फर्निचरनिर्मितीची अनेक अंगोपांगे, रंगकाम, विद्युत्‌योजना इत्यादींचा संबंध गृहशोभनाशी असतो. गृहशोभनकाराला त्या त्या क्षेत्रातील शास्त्रज्ञांना गृहशोभनाच्या आराखड्यानुसार मार्गदर्शन करावे लागते.

 घरातील अंतर्भागाचे स्थूल मानाने दोन भाग पडतात. पहिल्या भागात वास्तूची मूळ अंगे म्हणजे भिंती, दरवाजे, खिडक्या, छत इ. व दुसऱ्या भागात वास्तूमधील साधने उदा., फर्निचर, गालिचे, पडदे, पंखे, दिवे, फुलदाणी, चित्रे, शिल्पे इ. कलात्मक वस्तू यांचा समावेश होतो. यांतील पहिला भाग वास्तुकलेचा आणि दुसरा भाग गृहशोभनाचा होय. गृहशोभनकाराला सर्व वस्तूंची मांडणी करताना त्यांची रेखासंगती, रंगसंगती, पोत इत्यादींचा मेळ साधावा लागतो.

फर्निचर व इतर वस्तूंची मांडणी[संपादन]

फर्निचर हा घटक आकारप्रकार व उपयुक्तता यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. फर्निचरची मांडणी करताना अनेक अवधाने ठेवावी लागतात. माणसांची होणारी ये-जा लक्षात घेऊन प्रवेशद्वारांतून सज्जाकडे किंवा दुसऱ्या दालनाकडे जाण्या-येण्याची जागा मोकळी ठेवून फर्निचरची मांडणी करावी लागते. फर्निचरचा विशेष उपयोग ध्यानात घेऊनच त्याला योग्य ती जागा द्यावी लागते. उदा., जेथे लिहिणाऱ्याच्या डाव्या बाजूने खिडकीतून किंवा दरवाजातून नैसर्गिक प्रकाश येईल अशा ठिकाणी टेबल ठेवतात. भिंतीवर आरसा अशा ठिकाणी लावतात, की आरशासमोर उभे राहिल्यावर बघणाऱ्याच्या चेहऱ्यावर उजेड पडेल. सोफा व खुर्च्या यांची मांडणी करताना बसणाऱ्याला नैसर्गिक हवा व उजेड मिळेल व खिडकीतून किंवा सज्जातून बाहेरील जागेचा किंवा इतर निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेता येईल, अशी दृष्टी ठेवतात. झोपल्यावर नैसर्गिक हवा मिळेल व प्रवेशद्वारापासून आडोसाही लाभेल अशा प्रकारे पलंगाची जागा निवडतात. विशिष्ट प्रकारच्या वस्तूंची मांडणी झाल्यावर राहिलेल्या वस्तूंची मांडणी करतात. ती करताना त्यांचा वापर करणे सोयीचे होईल व दालनात हालचाल करण्यास जास्तीत जास्त जागा राहील याची दक्षता घेतली जाते. उपयुक्त फर्निचरची मांडणी झाल्यावर दालनाची शोभा वाढविण्यासाठी व मनाला प्रसन्नता वाटण्यासाठी नाना प्रकारे सजावट करता येते. उदा., जमिनीवर फुलझाडांच्या कुंड्या, लाकडी टेकूवर शिल्पाकृती, टेबलावर फुलदाण्या इ. ठेवून दालनाची शोभा वाढविता येते. तसेच भिंतींवर योग्य ठिकाणी निसर्गचित्रे, छायाचित्रे, विविध पशुपक्ष्यांच्या प्रतिकृती इ. लावता येतात.

वर निर्देश केलेल्या सर्व वस्तूंनी घराची शोभा वाढविता येते परंतु एकाच दालनात सर्व वस्तूंचा समावेश करण्याची गरज नसते. दालनाचा विशिष्ट उपयोग लक्षात घेऊन सजावटीच्या वस्तू निवडाव्या लागतात. उदा., स्वागतकक्षात वा बैठकीच्या दालनात चांगली निसर्गचित्रे व इतर कलात्मक चित्रे सामान्यतः लावली जातात. शयनगृहासाठी कुटुंबातील व्यक्तींची छायाचित्रे व कौटुंबिक प्रसंगांची छायाचित्रे निवडतात. अभ्यासिकेत ग्रंथांचे तसेच व्यक्तीगत छंदानुसार जमविलेल्या चित्रांचे, तिकिटांचे, नाण्यांचे वा अन्य वस्तूंचे दर्शन होईल अशी योजना करावी लागते. भिंतींवरील सजावटीत दारा-खिडक्यांच्या पडद्यांचाही विचार करावा लागतो. बहुधा दारा-खिडक्यांना पडद्याची गरज असते. पडद्यामुळे एकान्त लाभतो, शांतता जाणवते व प्रकाशही मर्यादित करता येतो. ज्या दारांना एकान्ततेसाठी पडदा लावणे जरूर आहे, अशा दारांनाच पडदे लावले जातात. पडद्यांचे रंग व स्वरूप दालनाच्या विशिष्ट वातावरणाला अनुकूल असते. अलीकडे कापडी पडद्यांऐवजी खाली-वर करण्याचे प्लॅस्टिकचे वा लाकडी पट्ट्यांचे पडदे (ब्लाइंड्स ) वापरतात. या पडद्यांनी प्रकाश कमीअधिक प्रमाणात नियंत्रित करता येतो.

छत[संपादन]

आधुनिक वास्तूत सिमेंट काँक्रीटचे अखंड छत तयार केलेले असते. अशा छतापासून खाली अंतरावर विजेचे पंखे व कधीकधी दिव्यांची झुंबरे टांगलेली असतात. काही वेळा छत जमिनीपासून खूप उंच असते. जुन्या निवासात छत लाकडी तुळया व वडोदे यांनी तयार केलेले असते. छत योग्य त्या उंचीवर आणण्यासाठी व ते एकसंध दिसण्यासाठी प्लॅस्टरचे दुसरे छत तयार करता येते. मूळ लाकडी छतापासून खाली काही अंतरावर लाकडी पट्ट्यांचा सांगाडा तयार करून त्यावर खालच्या बाजूने प्लॅस्टरचे तक्ते बसवितात व त्या तक्त्यांवर नक्षीकाम करून छताची शोभा वाढवितात. प्रच्छन्न प्रकाशयोजनासुद्धा अशा छतात करता येते. मूळ छत व नवीन छत यांच्यातील पोकळीत विजेचे दिवे बसवून हवी तशी प्रकाशयोजना करता येते.

तक्तपोशी[संपादन]

तक्तपोशी बहुधा दगडी फरशांची किंवा मोझेइक फरशांची केलेली असते. ती स्वच्छ राखणे सोयीचे असते. बैठकीच्या दालनात सतरंज्या किंवा गालिचे वापरतात. सतरंज्या किंवा चित्राकृतीयुक्त आणि भडक गालिचे न ठेवता शक्य तो साधे ठेवण्याकडे कल असतो. कारण गालिच्यावर ठेवलेल्या फर्निचरमुळे त्याच्यावरील चित्राकृती अंशतः झाकली जाते आणि ती चमत्कारिक दिसते. सतरंज्या व गालिचे यांचे रंग दालनाच्या एकूण रंगसंगतीस पोषक असावेत.  

सुशोभन[संपादन]

फर्निचरची मांडणी करताना सोय व उपयुक्तता यांचा विचार प्रामुख्याने केला जातो. तथापि फर्निचर व इतर वस्तूंची रचना करताना रेखासंगतीही साधावी लागते. या प्रयत्नात पुष्कळ वेळा विकत मिळणारे तयार फर्निचर उपयोगी पडत नाही, म्हणून गृहशोभनकार प्रथम मांडणीचा आराखडा तयार करून त्याप्रमाणे फर्निचर तयार करून घेतो. दालनातील फर्निचर, भिंतीवरील सजावट, दारे, खिडक्यांवरील पडदे इत्यादींच्या संकलित संबंधातून रेखासंगतीचा भास निर्माण होतो. मुख्यतः दालनाच्या विशिष्ट उपयोगास पोषक होईल, अशी रेखासंगती साधणे आवश्यक असते. उदा., शयनगृहात समग्र मांडणीमुळे आडव्या सरळ रेषांचा भास निर्माण केल्यास शांतता व विश्रांतीची भावना उत्पन्न होते. कोणत्याही दालनात जरूर एवढेच फर्निचर व निवडक शोभेच्या वस्तू ठेवणे योग्य असते. वस्तूंची फार गर्दी करू नये, नाहीतर दालनाच्या प्रशस्तपणाला बाध येतो.  

प्रकाशयोजना[संपादन]

प्रत्येक दालनात दिवसा खिडक्या-दारांतून नैसर्गिक प्रकाश येतच असतो. रात्री मात्र कृत्रिम प्रकाशाची योजना करावी लागते. आधुनिक प्रकाशयोजना विजेच्या दिव्यांनी साधता येते. यात मुख्यतः दोन प्रकार मानता येतील. पहिला सर्व दालन प्रकाशित करणारा व दुसरा विशिष्ट कामापुरता उपयोगी पडणारा. पहिल्या प्रकारात दिवा छताच्या मध्यभागी खाली लोंबता सोडलेला असतो त्यामुळे आजूबाजूच्या भिंती व तक्तपोशी प्रकाशित होतात. दुसऱ्या प्रकारात लिहिण्या-वाचण्यासाठी मेजावर लहान दिवा ठेवतात. त्याच्या विशिष्ट रचनेमुळे प्रकाश डोळ्यांवर न पडता मेजावरच पडतो. सोफ्यावर बसून वाचण्यासाठी अशाच प्रकारचा दिवा दिवाणखान्यात वापरतात. या दिव्यांची आच्छादने रेशमी कापडांची आणि निरनिराळ्या आकारांची असल्यामुळे शोभा वाढते. स्वयंपाक करण्यासाठी भिंतीवर आणि प्रसाधनासाठी आरशाजवळही दिव्यांची योजना करतात. शक्यतो दिव्याची नलिका (ट्यूब) किंवा गोळा (बल्ब) प्रत्यक्ष डोळ्याला न दिसेल अशा तऱ्हेने झाकतात. दिव्याची जागा व प्रकार पूर्वनियोजित असल्यास या सर्व तारा भिंतीतून व छतातून खेळवून दृष्टिआड राखता येतात व त्यामुळे भिंतीच्या आणि छताच्या शोभेत भर पडते. प्रकाश व रंग यांचे अत्यंत निकटचे संबंध आहेत. प्रकाशाशिवाय रंग दिसणारच नाहीत. तसेच प्रकाशाच्या रंगाप्रमाणे वस्तूचा रंगही थोडाफार निराळा दिसतो.

रंगयोजना[संपादन]

वास्तूतील विविध दालनांतील रंगयोजना, त्या त्या दालनाचा विविध उपयोग आणि आपल्या मनावर व शरीरावर रंगांचे जे परिणाम संभवतात ते लक्षात घेऊन करावी लागते. पिवळा, तांबडा व निळा हे तीन मूळ रंग मानले जातात. त्यांपैकी पिवळा रंग उबदार व वृत्ती प्रसन्न करणारा आहे. प्रातःकाळचा कोवळा सूर्यप्रकाश पिवळसर असतो, त्यामुळे या रंगाच्या दर्शनाने उत्साह निर्माण होतो तसेच पिवळ्या रंगाने ऐश्वर्याची भावनाही निर्माण होते. पिवळा रंग प्रामुख्याने दिवाणखाना, भोजनगृह व प्रवेशदालन यांसाठी वापरतात. तांबडा रंग उष्णतेची भावना उत्पन्न करतो तांबड्या रंगाच्या वस्तूकडे आपले लक्ष त्वरित जाते. तथापि आपणास फार वेळ त्याकडे पाहवत नाही म्हणून हा रंग गृहशोभनात फारच कमी प्रमाणात वापरतात. दालनात ज्या ठिकाणी आपले लक्ष प्रथम जावे असे वाटत असेल, त्या ठिकाणी तांबड्या रंगाचा उपयोग करतात. दालनातील एखादी भिंत तांबडी रंगविल्यास ती मूळ जागेपासून पुढे आली आहे, असा दृक्‌भ्रम उत्पन्न होतो. निळा रंग शीतल समजला जातो, म्हणून निळ्या रंगाचा उपयोग प्रामुख्याने शयनगृहासाठी करतात. काळा व पांढरा हे रंगसुद्धा काही विशिष्ट प्रकारचा परिणाम साधतात. काळ्या रंगामुळे निराशेची भावना उत्पन्न होते. पांढरा रंग स्वच्छता व शुद्ध भावनेचे प्रतीक आहे त्यामुळे देवघर व इतर पवित्र दालने शुभ्र रंगाने सुशोभित करतात. स्वयंपाकगृह व भोजनगृह यांत भोजनाच्या वेळी मन ज्या रंगामुळे प्रसन्न राहील, अशा पिवळ्या, नारिंगी किंवा गुलाबी रंगाचा उपयोग करतात. बैठकीच्या दालनासाठी सौम्य पण उत्साहदायक अशा पिवळ्या, हिरव्या, जांभळ्या वा गुलाबी रंगांच्या छटांची योजना करतात. अभ्यासिका सजविण्यासाठी आकाशी निळसर, हिरवा किंवा राखी या रंगांच्या छटांची निवड करतात. मात्र एखादे दालन एखाद्या खास व्यक्तीने वापरावयाचे असल्यास त्याची वैयक्तिक आवड लक्षात घ्यावी लागते. त्या व्यक्तीचे वय लक्षात घेऊनही तेथील रंगयोजना करावी लागते.

एकाच रंगाच्या छटा दालनातील सर्व वस्तूंस दिल्यास एकरंगी छायाचित्राप्रमाणे भास निर्माण होईल आणि त्यामुळे थोड्याच वेळात बघणाऱ्यास त्याचा कंटाळा येईल म्हणून एखाद्या दालनासाठी योग्य प्रमुख रंग निवडून झाल्यावर त्यालाच पूरक अशा दुसऱ्या काही रंगांची जोड द्यावी लागते. त्यामुळे विविध रंगांचा वापर करून दालन अधिक आल्हाददायक करण्यात येते. या विविध रंगांनी उत्पन्न केलेला आभास व परिणाम दालनाच्या विशिष्ट उपयोगास पोषकच असतो. विशिष्ट प्रमुख रंग व पूरक जोडरंग यांची निवड व प्रमाण दालनातील विविध घटकांच्या आकारमानावरही अवलंबून असते. या सर्व वस्तूंत भिंतीचे आकारमान सर्वांत जास्त असते. म्हणून दालनाचा विशिष्ट उपयोग दर्शविणारा रंग भिंतींसाठी पसंत करतात. तथापि जास्त आकारमान असलेल्या वस्तूसाठी निवडलेल्या रंगाची छटा फिकट घेतात आणि पूरक जोडरंग गडद घेतात. त्यामुळे मोठ्या आकारमानाच्या वस्तूचा फिका रंग लहान आकारमानाच्या वस्तूंच्या गडद रंगाशी सुसंवाद साधू शकतो. सर्वांत लहान वस्तूचा रंग गडद व सर्वांत जास्त आकारमानाच्या वस्तूचा रंग फिका असावा, असा सर्वमान्य नियम आहे. त्यामुळे दालनातील सर्व वस्तूंचा तोल योग्य प्रमाणात राखला जातो.

दालनाची लांबी, रुंदी व उंची यांचे मूळ प्रमाण योग्य नसल्यास काही रंगांच्या वापराने दृक्‌भास निर्माण करून ते सुधारता येते. जसे एखादे दालन खूपच लांब पण अरुंद असेल, तर रुंदीच्या बाजूच्या भिंती तांबड्या रंगाच्या छटांनी रंगवून त्या भिंती जवळ आल्या असे पाहणाऱ्याला वाटेल, असा भास निर्माण करता येतो. तसेच लांब भिंती निळ्या आकाशी रंगाच्या छटांनी रंगविल्यास त्या दूर गेल्यासारख्या वाटतील. तसेच छत अधिक उंच असल्याचा भास निर्माण करण्यासाठी अगदी फिका किंवा आकाशी निळा रंग देतात. याउलट छत जवळ आहे, असा आभास निर्माण करावयाचा असल्यास छत गडद तांबड्या किंवा नारिंगी रंगाने रंगवितात. दालनाचे आकारमान लहान असल्यास फिकट निळसर किंवा हिरवा रंग वापरल्यास दालन मोठे आहे असे वाटते, तर उलटपक्षी दालन खूप मोठे असल्यास गडद तांबड्या किंवा नारिंगी रंगाचा उपयोग करून दालन लहान असल्याचे दाखविता येते.

पूर्वयोजना व आराखडा[संपादन]

गृहसजावटीचे आराखडे काढण्याच्या पद्धतीचे प्रकार मुख्यतः दोन आहेत:

  • काटकोन रेखांकन पद्धती व
  • यथार्थदर्शन रेखांकन पद्धती.

काटकोन रेखांकन पद्धतीमध्ये वास्तूच्या किंवा दालनाच्या अंतरंगाची मांडणी आणि उभारणी (प्लॅन अँड एलेव्हेशन) पुढील दोन पद्धतींनी करतात:

  1. मांडणीमध्ये वस्तू वरून पाहिल्यावर कशी दिसेल तशी दाखवितात, त्यामुळे वस्तूची लांबी व रुंदी समजते.
  2. उभारणीमध्ये आपण वस्तूच्या पुढे उभे राहून किंवा बाजूस उभे राहून वस्तू जशी दिसेल, तशी दाखवितात. त्यामुळे वस्तूची उंची व लांबी तसेच उंची व रुंदी समजते.

या पद्धतीच्या रेखांकनामुळे वस्तू तयार करणाऱ्या कारागिरास व तंत्रज्ञास खरीखुरी मापे व कोन समजतात. तथापि वस्तूची जोडणी करण्यासाठी यथार्थदर्शन पद्धतीने काढलेल्या आलेखनाचा उपयोग होतो. या दोन्ही पद्धतींचा उपयोग करून दालनाच्या सजावटीची चित्रे तयार करतात. दालनातील छतावरील पंखे, दिवे आणि तक्तपोशीवर भिंतीची जाडी, दरवाजे-खिडक्यांची जागा, फर्निचर व इतर वस्तूंची रचना मांडणी-पद्धतीने दाखवितात. तर चारही भिंतींवर दारे, खिडक्या, पडदे, दिवे व फर्निचर इत्यादींची रचना उभारणी-पद्धतीने दाखवितात. गृहसजावटीमध्ये पडद्यांना विशेष महत्त्व असते. रंगांप्रमाणेच पडद्यांमुळेही खोलीचा किंवा दारा-खिडक्यांचा आकार लहान-मोठा दाखविता येतो. छताची उंचीही कमी-अधिक भासविता येते. विशेषतः खिडक्यांची सजावट करण्याकरिता पडद्यांचा बराच उपयोग होतो. खिडक्यांचा आकार व त्यांची चौकट लक्षात घेऊन पडद्याची रचना करावी लागते. पडद्याचे रंग ठरविताना विशिष्ट खिडकीची दिशा व दालनाचा प्रकारही विचारात घ्यावा लागतो. उदा., स्वयंपाकघर किंवा शयनगृह यांतील खिडक्यांना ताणयुक्त (स्प्रिंगचा) अर्धा पडदा लावून वर पटदंड (कर्टन-रॉड) लावावा. तसेच दोन बाजूंना दालनाच्या रंगसंगतीला जुळणारे दोन गडद रंगांचे पडदे सोडावे. एखाद्या दालनातील खिडकी प्रमाणापेक्षा लहान असेल, तर ती आहे त्यापेक्षा मोठी भासवावयाची असल्यास खिडकीच्या आकाराहून मोठ्या आकारात वरील बाजूला पटदंड लावून दोन बाजूंना दोन लांब पडदे सोडावे म्हणजे खिडकी आहे त्यापेक्षा बरीच मोठी दिसेल व दालनाच्या आकारमानाशी खिडकीचा आकार योग्य मेळ साधू शकेल.  

ऐतिहासिक आढावा[संपादन]

प्राचीन ईजिप्तमध्ये इ. स. पू. ४५०० ते १०९० या काळात सामान्य घरे विटामातीची असत. भिंतींना मातीचा गिलावा असून त्यावर पांढरा अगर दुसरा एखादा रंग देत. मोठ्या घरातील भिंतींवर निरनिराळी चित्रे काढीत. दारे व खिडक्यांना पडदे लावीत. हे पडदे लव्हाळ्याच्या जातीच्या गवताचे व विणलेले असत. पडद्यातून बाहेरील दृश्य दिसे. भिंतींना वरच्या बाजूने सुशोभित झालरी लावून जमिनीवर सचित्र चटया पसरत. दुसऱ्या सहस्रकात घरातील भिंतींचा खालचा सु. ०·३० मीटरचा काठ पिंगट रंगाने व त्यावरील सु. १·२० मी. भागात लाल, काळा व पांढरा या रंगांचे उभे पट्टे रंगवीत. या उभ्या पट्ट्यांवरील भिंतींचा भाग फिकट पिवळ्या रंगाचा असून त्यात चमकदार रंगाने रंगविलेल्या सुशोभित चित्रचौकटी असत. महत्त्वाच्या खोलीतील छत लाकडी असून ते रंगविलेले असे. त्या छतावरील चित्रांचे विविध विषय, साहचर्यातून आलेली कमलपुष्पे, कळ्या, लव्हाळे, तालवृक्ष इत्यादींच्या नैसर्गिक आकार-प्रकारातून सुचलेले असत. छताच्या कडेने चौकडीची किंवा वेलबुटीची सुंदर किनारपट्टी असे. इ. स. पू. चौदाव्या शतकात राजवाड्यातील भिंतींवर वेलबुटीची नक्षी असे. हे सर्व नैसर्गिक रंगांत रंगविलेले असत. या रंगकामात झगझगीत पिवळा रंग अधिक वापरात होता. जमीनही रंगवून त्यावर एखादा देखावा चितारलेला असे.

मेसोपोटेमियामध्ये ख्रि. पू. ४००० ते ३३० या काळातील गृहशोभनाच्या कल्पनाही ईजिप्तप्रमाणेच होत्या. घरातील भिंतींचा खालचा पट्टा गडद रंगाने व वरचा पट्टा फिकट रंगाने रंगविलेला असे. दारांच्या चौकटी लाल रंगाने रंगवीत कारण त्यामुळे दुष्टाच्या प्रभावापासून संरक्षण मिळते, अशी येथील लोकांची समजूत होती. राजवाड्यातील भिंतींवर आतून व बाहेरून चुनखडीच्या जातीच्या पांढऱ्या दगडावर उठावाने कोरलेल्या चित्रचौकटी असत व त्यांत शिकार, समारंभ, युद्धप्रसंग हे विषय असत. त्याभोवती भडक रंगांच्या मृत्स्ना फरशीचे पट्टे असत. कोरीवकाम केलेल्या दगडाची तक्तपोशी असे. तिच्या कडेने गुलाबाच्या पानाफुलांची किनारपट्टी असे. प्राण्यांची व जोमदार लढाऊ व्यक्तिचित्रांची उत्थित शिल्पे हे ॲसिरियन व बॅबिलोनियन गृहशोभनकलेचे एक वैशिष्ट्य होते.

प्राचीन ग्रीस, रोम व क्रीटच्या परिसरात ख्रि. पू. ३००० ते ४७६ या काळात घरांच्या भिंतींवर बैलांच्या झुंजीसारखी लोकजीवनातील प्रसंगांची दृश्ये रंगविलेली असत. यांतील पुरुषांची चित्रे लाल रंगाने व स्त्रियांची चित्रे पिवळ्या रंगाने रंगविलेली असत. भिंतींवरील नक्षीचा अरुंद पट्टा पक्ष्यांच्या चित्रांनी सजविलेला असे. हा पट्टा व छत यांच्यामध्ये पिवळ्या, काळ्या व पांढऱ्या रंगांची आणखी एक निरुंद चमकदार पट्टी असे. ग्रीक आणि रोमन राजवाड्यांतील दालने व दिवाणखान्यांत ही भित्तिचित्रे रंगविलेली असत.

इ. स. पू. पाचव्या शतकात रोमन गृहशोभनात कवडी-फरशीने तक्तपोशी सजविणे रूढ होते. रोमन भित्तिचित्रांमध्ये नक्षीदार स्तंभ, कोनाडे आणि खिडक्या दाखवीत. पुष्कळशा उघड्या खिडक्यांतून दिसणारी काल्पनिक दृश्ये त्यांत रंगविलेली असत.

महाभारतातील ‘मयसभा’ हा गृहशोभनकलेचा अतिप्राचीन व चमत्कृतिपूर्ण नमुना मानता येईल. त्याचप्रमाणे अजिंठा लेण्यांतील भित्तिचित्रे व कोरीवकाम केलेली दालने यासंबंधात विशेष उल्लेखनीय आहेत. मौर्य काळात (इ. स. पू. ३२३ ते १८५) घरांच्या भिंती रंगविलेल्या असत. गुप्त काळात (इ. स. ३२० ते ६००) राजवाड्यांतील कोरीवकाम केलेले स्तंभ व नक्षीदार कमानी एकमेकांस जोडलेल्या असत. भिंतीवरील कोरीवकामात अर्धमूल्यवान रत्ने जडविलेली असत. इ. स.च्या सोळाव्या ते अठराव्या शतकांतील राजवाड्यांतील अंतर्गत सजावट कोरीवकामांनी परिपूर्ण असे. सतराव्या व अठराव्या शतकांत सुती कापडावर रंगकाम केलेल्या भारतीय झालरी व पलंगपोस निर्यात होत.

प्राचीन चीनमधील शांग राजघराण्यापासून (ख्रि. पू. १३००) चालत आलेल्या गृहशोभनकलेत फारसा बदल झाला नाही. महत्त्वाच्या इमारतींमध्ये कोरीवकाम व रंगकाम केलेले असे. या चित्रांमध्ये सपक्ष सर्प (ड्रॅगन) वा व्याघ्र या प्राण्यांचा व काही इतर चित्राकृतींचा समावेश असे. खिडक्यांना विविध नमुन्यांच्या लाकडी पट्ट्यांच्या जाळ्या असत व त्यांवर पांढऱ्या रंगाचा पारदर्शक कागद ताणून बसविलेला असे. खिडक्यांचे बाह्याकार पंखा, पाने किंवा समभुज चौकोन यांसारखे असून दारे कमलदल, कुंभ किंवा कवच यांच्यासारख्या असत. काही भिंती सरकत्या असत व त्यांवर चित्रजवनिका  सोडलेल्या असत.

जपानमधील गृहशोभनकला चिनी शैलीने बरीच प्रभावित झाली होती. पंधराव्या व सोळाव्या शतकांत ती साधी व काटकसरीची परंतु सौंदर्यपूर्ण होती. जमिनीवर चटया अंथरलेल्या असत, दारे सरकती असून ती सचित्र कागदाने सुशोभित केलेली असत. एकेक भिंत म्हणजे जणू एक देखावाच असे.  

यूरोपमध्ये दहाव्या शतकानंतर घरे सामान्यतः गॉथिक पद्धतीची होती. दगडी भिंतीवर चित्रजवनिका टांगलेल्या असत. प्रबोधनकाळात मात्र या भिंतीवर कोरीवकाम केलेले, रंगविलेले किंवा मुलामा दिलेले लाकडी पृष्ठावरण असे. त्यावर सुबक चित्रांकित पडदे व रेशमी, मखमली किंवा किनखाबी झालरी सोडलेल्या असत. अठराव्या शतकातील इंग्रजी व फ्रेंच गृहशोभनांतील आकृतिबंध व कौशल्य उल्लेखनीय असून आजही ते आकर्षक वाटते.

अमेरिकेतील गृहशोभनकला प्रारंभी साधीसुधीच होती. पुढे संपन्नतेच्या वाढीबरोबर अमेरिकन घरे अधिकाधिक सुंदर व आरामदायी बनली. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात उत्कृष्ट प्रतीचे सजावट-साहित्य उपयोगात आले. त्या काळी सचित्र कागद, गालिचे, मखमली झालरी व नाजूक, सुबक लेसचे पडदे, कोरीवकाम केलेल्या सोनेरी चित्रचौकटी आणि गर्द हिरवा व लाल रंग लोकप्रिय होते. १९२० च्या आसपास नव्या सजावटीच्या कल्पना पुढे आल्या. यंत्रयुगाला साजेशी नवीन यांत्रिक-तांत्रिक साधने उपलब्ध झाली. त्यामुळे गृहशोभनाला नाना प्रकारे नवी वळणे मिळू लागली आहेत.

विसाव्या शतकात अनेक कार्यवादी कल्पना गृहशोभनाच्या क्षेत्रात राबविण्यात आल्या. पारंपरिक सजावटीच्या कल्पना मागे पडल्या. मानवी प्रवृत्तीचा शास्त्रशुद्ध अभ्यास नव्या गृहशोभनकलेत महत्त्वाचा ठरल्याने तिच्यात लक्षणीय बदल घडून आला. श्रीमंत लोक व गृहशोभन साहित्याचे उत्पादक या दोघांनीही या बदलास मदत केली. त्यामुळे गृहशोभनाची आंतरराष्ट्रीय शैली प्रचारात आली व सुखसोयी, काटकसर आणि उपयोगिता या कल्पनांना गृहसजावटीत प्रमुख स्थान मिळाले. औद्योगिक दृष्ट्या प्रगत अशा पश्चिमी समाजात घरे म्हणजे सुखकर निवासाची कार्यक्षम यंत्रे, असे समीकरण रूढ झाले. वावरण्याला अधिक जागा मिळावी या अपेक्षेमुळे घरातील हलत्या सामानांची संख्या किमान ठेवणे क्रमप्राप्त ठरले. भारतातील गृहशोभनावरही पश्चिमी कल्पनांचा परिणाम होत आहे. १९४७ नंतर सजावटीसाठी लागणारे जलाभेद्य आणि टिकाऊ रंग, पृष्ठावरणासाठी लागणारे कृत्रिम तक्ते, कापड, कातडे व फरशी यांचे दर्जेदार उत्पादन होऊ लागले आहे. लोकांची सौंदर्याभिरुचीही वाढत आहे. गृहशोभनाच्या शास्त्राचा अभ्यासही होऊ लागला आहे. मुंबई, दिल्ली, कलकत्ता व मद्रास येथील कलासंस्थांमध्ये, तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय तंत्रविद्या संचालनालयातर्फे गृहशोभनाचे अभ्यासक्रम योजिलेले आहेत. स्वतंत्र व्यवसाय म्हणून गृहशोभनाचे क्षेत्र हळूहळू विकसित होत आहे.