ख्रिस्ती वाडवळ समाज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ख्रिस्ती वाडवळ समाज हा मुंबईलगतच्या वसई, विरार, नालासोपारा भागातील समाज आहे. ख्रिस्ती धर्म पाळणारा हा समाज मूळ हिंदू असून पोर्तुगीज अंमलादरम्यान त्यांनी धर्मांतर केले.

शके १०६० मध्ये चालुक्य राजाचा मांडलिक राजा गोवर्धन बिंब ह्याने आपला भाऊ प्रतापबिंब ह्यास दहा हजार घोडेस्वार देऊन उत्तर कोकणावर स्वारी करण्यासाठी पाठविले. त्याने प्रथम दमण आणि नंतर तारापूर घेऊन पुढे शिरगाव मार्गे तो महिकावतीस आला. त्याच्यासोबत बरीच कुळे आली. ती कुळे आसपासच्या परिसरात उत्तरेला देहेरी उंबरगाव पासून दक्षिणेला वसईखाडीपर्यंत स्थिरस्थावर झाली.ह्यातील क्षत्रिय कुळातील लोक पुढे शेती-बागायती व्यवसाय करु लागले.केळी, पानवेल, फुले, फळभाज्या, फुलभाज्या, इत्यादी बागायतीच्या वाड्या निर्माण केल्या.कालांतराने वाड्या करणारे म्हणून हे लोक वाडीवाले म्हणून ओळखले जाऊ लागले. वाडीवाले शब्दाचा अपभ्रंश वाडवळ झाला. ह्यांची आपापसांत बोलली जाणारी भाषा वाडवळी भाषा म्हणून नावारूपास आली.ह्यातील वसईमध्ये राहणारे काही लोक पोर्तुगीज सत्तेच्या जुलमी राजवटीत ख्रिश्चन धर्माच्या रुढीमुळे धर्मांतरित झाले.तेच आज ख्रिस्ती वाडवळ म्हणून ओळखले जातात.