कोसली गाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोसली किंवा कोसाली हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा प्रामुख्याने छत्तीसगड राज्यातील मध्यवर्ती मैदानावर आढळणारा गोवंश आहे. छत्तीसगडच्या मैदानी प्रदेशाला पूर्वी कोशल असे म्हणत असत आणि त्यावरून या गोवंशाला कोसली असे नाव पडले. हा गोवंश मुख्यतः रायपूर, दुर्ग, राजनांदगांव, बिलासपूर, जांजगिर-चांपा, या जिल्ह्यांमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात आढळतो.[१]

शारीरिक रचना[संपादन]

कोसली गोवंश (अर्थात गाय आणि बैल) हा आकाराने लहान परंतु मजबूत शरीराचा असतो. या गोवंशाचा रंग प्रामुख्याने लाल किंवा पांढऱ्या ठिपक्यांचा लाल अशा स्वरूपात असतो.

या गोवंशाच्या गायीचे वशिंड लहान असते तर बैलाचे वशिंड मध्यम व मजबूत असते. पाय सरळ, लहान व मजबूत असतात. शिंगे लहान आकाराची, सरळ वर जाऊन वळलेली असतात. या गोवंशातील गाईंचे कपाळ सपाट व सरळ असते. डोळ्यांच्या पापण्या आणि खुराचा रंग काळा असतो. कानाचा आकार मध्यम तीक्ष्ण असून ते आडवे असतात.

बैलाच्या शरीराची सरासरी लांबी १२५ सेमी आणि उंची उंची ही १२० सेमी तर गायीची सरासरी लांबी १०० सेमी आणि उंची ही १०० सेमीपर्यंत असते.

बैलाचे सरासरी वजन २०० ते २५० किलो तर गायीचे सरासरी वजन १५० ते २०० किलो पर्यंत असते. हा गोवंश मध्यम दुधारू प्रकारचा असून त्यांची कास दंडगोलाकार व मध्यम आकाराची असते.

वैशिष्ट्ये[संपादन]

कोसली गोवंश हा आकाराने लहान, शरीराने मजबूत असून कठोर हवामानाशी जुळवून घेणारा असतो. या वंशाचे बैल शेतीच्या कामासाठी वापरले जातात. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या निकषानुसार हा मशागतीचा गोवंश म्हणून ओळखला जातो[२] .

भारतीय गायींच्या इतर प्रजाती[संपादन]

भारतीय गायीच्या इतर प्रजातींची माहिती मिळवण्यासाठी येथे जा ― भारतीय गायीच्या विविध जाती

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Bajpai, Diti. "क्या आपको भारत की इन 43 नस्ल की गायों के बारे में पता है?". www.gaonconnection.com (इंग्रजी भाषेत).
  2. ^ "Breeds । nddb.coop" (इंग्रजी भाषेत). १३ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.