Jump to content

निकोलस कोपर्निकस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोपर्निकस या पानावरून पुनर्निर्देशित)
निकोलस कोपर्निकस

निकोलस कोपर्निकस (जन्म - फेब्रुवारी १९,१४७३ - मृत्यु - मे २४,१५४३) हे पोलंडमधील प्रसिद्ध गणितज्ञखगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी ग्रहमालेचा अभ्यास व निरीक्षणातून महत्त्वाचे सिद्धान्त मांडले. यानुसार सूर्य हा ग्रहमालेचा केंद्रबिंदू असून पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात असा सिद्धांत मांडला. परंपरागत धार्मिक विचारांनुसार पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू असून सूर्य प्रुथ्वीभोवती फिरतो या रूढ समजूतीस कोपर्निकसने धक्का दिला. त्यामुळे धर्मसंस्थेने त्यांना पाखंडी ठरवून त्यांचे विचार दडपण्याचा प्रयत्न केला.

जन्म व बालजीवन

[संपादन]

कोपर्निकस यांचा जन्म १९ फेब्रुवारी १४७३ रोजी पोलंडच्या टॅारन या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कोपरनाइड व आईचे नाव बार्बारा होते. दोन मुले व दोन मुलींत कोपर्निकस सर्वांत लहान होते.

कोपर्निकस दहा वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांचे मामा लुकास यांच्या देखरेखीखाली झाले. त्यांचे मामा धर्मगुरूशिक्षणप्रेमी होते. समाजात त्यांना खुप मान होता. स्वाभाविकच, कोपर्निकसचे पालनपोषण सुसंस्कृत व धार्मिक वातावरणात झाले. त्यामुळे तरुण निकोलसने धर्मोपदेशक व्हायचे ठरवले आणि त्यानुसार त्यांनी आपले लक्ष त्या ध्येयावर केंद्रित केले.