कालेवाला
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
कालेवाला फिनिश लोकमहाकाव्य. फिनलंड या देशामध्ये त्यास राष्ट्रीय महाकाव्याचा दर्जा आहे. त्यास त्याचे आजचे स्वरूप एकोणिसाव्या शतकात प्राप्त झाले. पेशाने वैद्यक असलेला एल्यास लनरॉट (१८०२-१८८४) हा या महाकाव्याचा संकलक आणि संपादक. फिनलंडमधील काजानी जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक ठिकाणी अभ्यासार्थ आणि संकलनार्थ प्रवास केला. लॅप, एस्टोनियन आणि वायव्य रशियाकडील फिनिश जमाती ह्यांच्यात ते वावरले, फिनो-उग्रिक भाषांच्या अभ्यासाच्या दृष्टीने त्यांनी महत्त्वाची सामग्री गोळा केली, लोकगीतेही जमवली. ही लोकगीते म्हणजे काळाच्या ओघात नष्ट झालेल्या एका महाकाव्याचे भाग आहेत असे जाणवल्यामुळे, त्यांनी ते भाग जोडून, त्यांतून मूळ महाकाव्याची संहिता पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न केला आणि कालेवाला हे फिनिश लोकमहाकाव्य संपादून प्रसिद्ध केले. कालक्रमानुसार या महाकाव्याचे जुने कालेवाला आणि नवीन कालेवाला असे दोन प्रकार मानले जातात. या महाकाव्याची पहिली आवृत्ती १८३५-३६ मध्ये आणि दुसरी सुधारित आवृत्ती १८४९ मध्ये संपादित केली असून, पहिल्या आवृत्तीत ३२ सर्ग आणि १२,०७८ गीते आहेत, तर दुसऱ्या आवृत्तीत ५० सर्ग आणि २२,७९५ गीते आहेत. दुसरी आवृत्ती अधिकृत मानली जाते.
फिनिश आणि कारेलियन मौखिक लोककथा, पौराणिक कथा यांवर आधारित लोक गायकांच्या गाण्यांमधून या काव्यातील गीते संकलित आणि संपादित केली आहेत. पाच प्राचीन वीरांची शौर्यगाथा या महाकाव्यात आहे. त्यांपैकी एक शिकारी आणि दुसरा साहसी भटक्या असून, इतर तिघांत भूदास, घिसाडी व चारण यांचा समावेश आहे. हे सर्व वीर समाजाच्या विविध थरांतले आहेत, ही बाब वैशिष्टयपूर्ण आहे. ह्या महाकाव्याला फिनलंड व लॅपलँड यांच्या युद्धाचा ऐतिहासिक संदर्भही आहे. भावगेय (लिरिकल) शैलीने संपन्न असलेल्या या महाकाव्यातून जड आणि चेतन, मानव आणि निसर्ग यांतील सनातन संघर्षांचे प्रभावी दर्शन घडते. या महाकाव्याच्या सुरुवातीला पृथ्वी, आकाश, पाणी यांची निर्मिती कशी झाली यांच्याशी संबंधित कथा वर्णन केलेल्या आहेत. नंतरच्या कथांमध्ये प्रेम, लैंगिक भावना आणि साहसपूर्ण कथांचे वर्णन आढळून येते. प्रणय,अपहरण आणि मोहकपणाच्या बऱ्याच कथा आहेत. कथांच्या नायकांना बऱ्याचदा अवास्तव किंवा अशक्य असे पराक्रम साध्य करावे लागतात. या राष्ट्रीय महाकाव्यातील कथानकामध्ये संपू नावाचे एक जादुई पात्र वर्णन करण्यात आलेले आहे. या पात्राच्या उपस्थितीमुळे राष्ट्रात समृद्धी आणि शांतता टिकून राहील, असे एक मिथक आहे आणि हे पात्र जर गहाळ झाले किंवा हरवले तर राष्ट्रावर आपत्ती येईल, असा एक समज आहे.
व्हायनामोईनेन हे यातील मुख्य पात्र मानले जाते. हे शूर व धाडसी पात्र आहे. या संपूर्ण महाकाव्यातील कथांमध्ये मिथक हा एक मुख्य घटक आढळून येतो. हे महाकाव्य लिहित असताना कवीने फिनलँड पूर्वेकडच्या भाषेचा उपयोग केलेला आढळून येतो.
नवीन कालेवाला या महाकाव्याचा शाळा कॉलेजमधून अभ्यास केला जातो आणि त्याचे गायन केले जाते. यातील छंदबद्ध कवितांचे संगीताच्या माध्यमातून गायन केल्या जाते. या महाकाव्याचा पुराण, शास्त्र, संगीत, मानववंशशास्त्र, धर्म, संस्कृती अशा अनेक अंगांनी अभ्यास केला जातो. फिनलँडमध्ये २८ फेब्रुवारी हा दिवस कालेवाला दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. इस्टोनिया या देशाच्या राष्ट्रीय महाकाव्यावर सुद्धा या महाकाव्याचा प्रभाव आढळून येतो. द एडवेंचर्स ऑफ टॉम बोंबबाईल या जे.आर.आर.टोल्किन लिखित साहित्यकृतीमागे कालेवाला या महाकाव्याची मुख्य प्रेरणा आहे.
ब्रिटिश कवी लाँगफेलो यांच्या कवितांवर सुद्धा या महाकाव्याचा प्रभाव दिसून येतो. द साँग ऑफ हायावाथा (१८५५) ह्या रेड इंडियनांवरील आपल्या कथाकाव्यात लाँगफेलोने कालेवालाचा आदर्श अनुसरला आहे. साहित्यिक, चित्रकार आणि संगीतकार यांचे ते स्फूर्तिस्थान आहे. या महाकाव्याचे ६० भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलेले आहे. ‘कालेवाला’ हे फिनलंडचे प्राचीन नाव आहे. फिनिश लोकांसाठी हे महाकाव्य एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक प्रेरणा मानली जाते. रशियापासून फिनलॅडला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करण्यात कालेवाला या महाकाव्याची भूमिका महत्त्वपूर्ण राहिलेली आहे.