कान्होबा रणछोडदास कीर्तिकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेफ्टनंट कर्नल कान्होबा रणछोडदास कीर्तिकर F.L.S., I.M.S.(१८४९ - १९१७) हे एक मराठी वनस्पतिशास्त्रज्ञ आणि कवी होते. मुंबईच्या ग्रॅंट मेडिकल कॉलेजमधून पदवी मिळवून ते इंग्लंडला गेले. सन १८७४मध्ये ते लंडनमधल्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स आणि रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्सच्या परीक्षा उत्तीर्ण झाले. १८७६ साली भारतात परत आले आणि १८७७मध्ये सोलापूरमधील लष्कराच्या १९व्या नेटिव्ह इन्फंट्रीचे सर्वात प्रमुख डॉक्टर झाले. १८७८-१८८० सालच्या अफगाण युद्धात त्यांनी चमकदार कामगिरी केली. १८९७मध्ये ते मुंबई विद्यापीठाचे फेलो झाले आणि त्याच वर्षी मुंबई महापालिकेचे प्रमुख आरोग्य अधिकारी झाले व १९०४मध्ये निवृत्त झाले.

कीर्तिकर हे पाठारे प्रभू रिलीफ फंडाचे अध्यक्ष, आर्यन एज्युकेशन संस्थेचे विश्वस्त आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी होते. त्यांकडे वनस्पतिशास्त्रावरची फार मोठी ग्रंथसंपदा होती. ते स्वतः उत्तम चित्रकार होते. शिवाय त्यांनी निसर्गातील वनस्पतींची रंगीत चित्रे काढण्यासाठी एक चित्रकार बाळगला होता.

इ.स. १९०७ मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष कीर्तिकर होते. त्यानी त्या संमेलनादरम्यान त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांना बालकवी ही उपाधी दिली.

काव्यसंग्रह[संपादन]

  • इंद्रकाव्य
  • भक्तिसुधा
  • विलाप लहरी

अन्य पुस्तके[संपादन]

  • Indian Medicinal Plants (२७९३ पानांचे पुस्तक)
  • इंदिरा
  • चार्लस डार्विन

सन्मान[संपादन]

  • १९०९ साली बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद