कांचन
कांचन ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक पुरातन वृक्षांचा उल्लेख आढळतो. कूळ सिसैलपीनेसी त्यापैकी हा कांचनवृक्ष सुद्धा एक वृक्ष आहे. हे झाड मध्यम आकाराचे असून त्याची साल गडद तपकिरी रंगाची व काहीशी गुळगुळीत असते. त्याचे नवे अंकुर तपकिरी रंगाच्या कोवळ्या लवीने झाकलेले असतात. कांचनाची पानगळ थंडीच्या मौसमात होते. ही पाने कोवळी असताना त्यावर बारीक लव असते. परंतु ही पाने जशीजशी मोठी होतात तसतशी ही लव नाहीशी होते. पानांचा पृष्ठभाग चामडयासारखा चिवट होत जातो. या सुंदर झाडाची फुले वेगवेगळ्या रंगाची असतात. गुलाबी, पांढरी, फिकट जांभळ्या रंगावर गडद जांभळ्या छटा असलेली आणि सुवासिक असतात. याची फुले पानाच्या खोबणीत किंवा फांदीच्या टोकावर येतात. फुलांचे देठ अतिशय लहान ,दिसेल न दिसेल असा असतात.यातील चार पाकळ्या फिकट कोनफाळी रंगाच्या व पाचवी पाकळी गडद रंगाची असते. काही फुलांच्या एक किंवा दोन पाकळ्यांच्या मुलाशी पिवळ्या रंगाचे ठिपके सुद्धा आढळतात. ही फुले फारच आकर्षक व मनमोहक दिसतात. कांचन या वृक्षाच्या फुलांचा मौसम हा डिसेंबर ते मार्च किंवा एप्रिल मध्ये असतो. पांढऱ्या रंगाच्या फुलांचा कांचन हे झाड नसून झुडूप आहे. याच्या शेंगा कठीण असतात. यामध्ये १० ते १५ बिया असतात. या शेंगा झाडावर असतानाच फुटतात व त्यातील बिया जमिनीवर पसरल्या जातात.
ही झाडे भारताच्या पूर्वेस आसाम, म्यानमार, तसेच छोटा नागपूर, मध्य प्रदेश येते भरपूर आढळतात. कधी कधी ही झाडे लावल्यावर दुसऱ्याच वर्षी ती बहरू लागतात, फुलतात. ही झाडे बऱ्याच प्रकारच्या मातीत रुजतात .पण उंच व पाण्याचा निचरा होणाऱ्या मातीत लवकर रुजतात व बहरतात .ती फार नाजूक असतात .त्यामुळे थंडीचा त्यावर चटकन परिणाम होतो .या झाडांच्या वाढीच्या बाबतीत किंवा खताच्या बाबतीत फारशी काळजी घेण्याची गरज नसते ,परंतु या झाडाची थोडीशी काळजी घेतली तर या झाडांचा चांगला फुलोरा येतो ,ती बहरतात .या झाडाच्या तोडलेल्या फांदीही मातीत लावल्यास त्या रुजतात. या झाडची फुले सुवासिक असल्यमुळे मधमाश्या त्याकडे आकर्षित होतात व त्या माध्यमातून परागण होते.या झाडाच्या पावसाळ्यापूर्वी पडलेल्या बिया पावसाळ्यात त्वरित अंकुरित होतात व अश्या अंकुरित बिया झाडाच्या अवतीभोवती फार मोठया प्रमाणत पडलेल्या दिसतात.परंतु ज्या बिया मातीत रुजल्या आहेत किंवा पालापाचोळयात झाकल्या गेल्या आहेत ,ज्या बियांवर सूर्यप्रकाश पडत नाही अश्या बिया सोडून उर्वरित बियांची कोवळी रोपे सुर्यप्रकाशामुळे सुकून,करपून जातात .
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |