Jump to content

इंद्रा देवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ईंद्रा देवी तथा युजेनी व्ही. पीटरसन (रशियन:Евгения Петерсон; १२ मे, इ.स. १८८९:रिगा, लात्व्हिया - २५ एप्रिल, इ.स. २००२:बोयनोस आइरेस, आर्जेन्टिना) या रशियन योगशिक्षिका होत्या.

यांचे वडील व्हासिली पीटरसन हे स्वीडिश बँक चालक होते तर आई अलेहांद्रा लाबुनस्कैया या रशियन जहागिरदार घराण्यातील होत्या १९१७मधील बोल्शेविक क्रांती दरम्यान ईंद्रा देवी आपल्या कुटुंबासह बर्लिनला पळून आल्या. तेथे त्यांनी नृत्य आणि अभिनयाचे शिक्षण घेतले.

या रवींद्रनाथ टागोर आणि योगी रामचरक यांच्या पुस्तकांनी प्रभावित झालेल्या होत्या. १९२७ साली या भारतात आल्या व भारतीय टोपणनाव धारण करून येथील चित्रपटांत त्यांनी कामे केली. १९३०मध्ये त्यांनी भारतातील चेकोस्लोव्हाकियाच्या राजदूत यान स्ट्राकाटी यांच्याशी लग्न केले.

मैसूरच्या महाराजांनी भलावण केल्याने योगगुरू तिरुमलई कृष्णमाचार्य यांनी ईंद्रा देवी यांना शिष्य मानले.

१९३९ साली या आपल्या पतीबरोबर चीन येथे गेल्या. तेथे त्यांनी च्यांग कै शेक यांच्या घरी योगासने शिकविण्याचा वर्ग सुरू केला. १९४९ साली स्ट्राकाटी यांचे निधन झाल्यावर ईंद्रा देवी अमेरिकेस गेल्या व तेथेही त्यांना योगासनाचे वर्ग सुरू केले. त्यांच्या शिष्यांमध्ये ग्रेटा गार्बो, यहूदी मेनुहिन, ग्लोरिया स्वान्सन यांसह हॉलिवूडमधील अनेक व्यक्तींचा समावेश होता.

१९५३मध्ये त्यांनी सिगफ्रीड कनौअर यांच्याशी लग्न केले. त्यानंतर अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारताना त्यांनी ईंद्रा देवी हे नाव लावले.

ईंद्रा देवी पुट्टपार्थीच्या सत्य साई बाबा यांच्या कार्याशी संलग्न होत्या.

१९८२ साली ईंद्रा देवी आर्जेन्टिनाला स्थलांतरित झाल्या. तेथे २००२ साली त्यांचा मृत्यू झाला.