ग्रेटा गार्बो
ग्रेटा गार्बो तथा ग्रेटा लोव्हिस्टा गुस्टाफसन (१८ सप्टेंबर, इ.स. १९०५:स्टॉकहोम, स्वीडन - १५ एप्रिल, इ.स. १९९०:न्यू यॉर्क शहर, अमेरिका) ही हॉलिवूडमधील १९२० आणि १९३० च्या दशकातील अभिनेत्री होती.
हिने वयाच्या १९व्या वर्षी पहिल्यांदा गोस्टा बर्लिंग्स सागा या स्वीडिश चित्रपटात काम केले. १९२५-३० दरम्यान गार्बो हॉलिवूडमधील अनेक मूकपटांत होती. ॲना क्रिस्टी हा तिचा पहिला बोलपट होता. या चित्रपटाचे जाहिरातींमध्ये गार्बो बोलते! असे वर्णन करण्यात आले होते. १९४१मधील टू फेस्ड वुमन हा तिचा शेवटचा चित्रपट होता. यानंतर तिने पुन्हा चित्रपटांत भूमिका करण्याच्या अनेक संधी नाकारल्या.
पीटर द ट्रॅम्प या चित्रपटात तिने १९२२ मध्ये काम केले. पुढे १९२२ ते १९२४ या कालावधीत स्टॉकहोम येथील रॉयल ड्रॅमॅटिक थिएटरमध्ये तिने अध्ययन केले, याच काळात तिचा मॉरिटस स्टीलर या स्वीडिश दिग्दर्शकाशी परिचय झाला. त्याने तिला दि स्टोरी ऑफ गोस्टा बर्लिंग या चित्रपटात महत्त्वाची भूमिका दिली. याच वेळी तिचे मूळ नाव बदलून ग्रेटा गार्बो असे ठेवण्यात आले. १९२५ मध्ये ती स्टीलरसमवेत अमेरिकेला गेली.
अमेरिकेमध्ये तिने मेट्रो गोल्डविन मेयर या कंपनीच्या २४ चित्रपटांतून काम केले. त्यांपैकी द टॉरंट (१९२६), फ्लेश अँड द डेव्हिल (१९२७), लव्ह (१९२७), वाइल्ड ऑर्किड्स (१९२९), ॲना ख्रिस्ती (१९३०), माताहारी (१९३१), ग्रॅंड हॉटेल (१९३५), ॲना कॅरेनिना (१९३५), कॅमिल (१९३७) व निनोत्च्का (१९३९) हे तिचे प्रमुख व नावाजलेले चित्रपट होत. त्यांतही द टोरंट हा तिचा पहिला अमेरिकन चित्रपट आणि ॲना ख्रिस्ती हा तिचा पहिला बोलपट होता. टू फेसेड वुमन (१९४१) या चित्रपटानंतर ग्रेटा गार्बो चित्रपटक्षेत्रातून निवृत्त झाली.
ग्रेटा गार्बोच्या भूमिकांमुळे चित्रपटातील स्त्रीभूमिका अधिक नैसर्गिक, प्रगल्भ व उज्ज्वल बनली. स्त्रीभूमिकांना एक प्रकारचा उच्च दर्जा प्राप्त झाला. आकर्षक शरीरयष्टी, पिंगट केस, निळसर डोळे, गूढ पण मधुर हास्य व अभिनयकुशलता या गुणांमुळे चित्रपटसृष्टीत तिला ‘डिव्हाइन गार्बो’ म्हणत असत. कॅमेऱ्यासमोर विलक्षण सहजतेने काम करण्याच्या तिच्या नैसर्गिक प्रवृत्तीचे दिग्दर्शकांनी व चित्रपट >समीक्षाकांनी विशेष कौतुक केले आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील सर्वश्रेष्ठ चित्रपटअभिनेत्री म्हणून तिचा गौरव केला जातो.
निवृत्तीनंतर १९५१ मध्ये तिने अमेरिकन नागरिकत्व स्वीकारले व ती न्यू यॉर्क शहरात एकांतवासात राहू लागली. गार्बो शेवटपर्यंत अविवाहित होती. तिला कलाकृती जमविण्याचा छंद होता.