Jump to content

अरुण खेतरपाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरुण खेतरपाल
[[File:|frameless|alt=]]
मातृभाषेतील नाव अरुण खेतरपाल
जन्म १४ ऑक्टोबर १९५० (1950-10-14)
पुणे, महाराष्ट्र
मृत्यू १६ डिसेंबर, १९७१ (वय २१)
बारापिंड, शंकरगढ सेक्टर
Allegiance भारत
सैन्यशाखा भारतीय सेना
हुद्दा सेकंड लेफ्टनंट
सैन्यपथक १७ पूना हॉर्सेस
लढाया व युद्धे बसंतरची लढाई, १९७१चे भारत पाकिस्तान युद्ध
पुरस्कार परमवीरचक्र (मरणोत्तर)

सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल (१४ ऑक्टोबर, १९५०:पुणे, महाराष्ट्र, भारत - ) हे भारतीय सैन्यातील अधिकारी होते. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धातील बसंतरच्या लढाईमधील दाखविलेल्या शौर्याबद्दल त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी बहुमान मरणोत्तर दिला गेला.

पूर्वजीवन

[संपादन]

अरुण खेतरपाल यांच्या कुटुंबाला सैनिकी सेवेचा मोठा इतिहास आहे. त्यांचे वडील लेफ्टनंट कर्नल (नंतर ब्रिगेडियर) एम.एल. खेतरपाल भारतीय सैन्याच्या कोर ऑफ इंजिनीयर्समध्ये अधिकारी होते. अरुण खेतरपाल यांनी १९६७मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेतला. तेथून उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी भारतीय सैनिकी अकादमीमध्ये प्रवेश घेतला. जून १९७१मध्ये त्यांना १७ पूना हॉर्सेसमध्ये तैनात केले गेले.

बसंतरची लढाई

[संपादन]

पुलावर ताबा

[संपादन]

सैन्यात गेल्यावर सहाच महिन्यात पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यावर युद्ध सुरू झाले. त्यावेळी १७ पूना हॉर्सेस रेजिमेंटला ४७व्या इन्फंट्री ब्रिगेडबरोबर सीमेवर पाठविण्यात आले. तेथे त्यांना बसंतर नदीवरील पूलावर ताबा मिळविण्याचा हुकुम मिळाला. ४७व्या इन्फंट्रीने पुलावर ताबा मिळविला तरी तेथील सगळा प्रदेश भूसुरूंगांनी व्यापलेला होता व त्यातून १७ पूना हॉर्सेसचे रणगाडे आणणे धोक्याचे होते. कोर ऑफ इंजिनीयर्स हे सुरूंग निकामी करीत असताना त्यांना शत्रूचे रणगाडे जवळ येत असल्याची चाहूल लागली. ते कळल्यावर भारतीय रणगाडे तशाच परिस्थितीत सुरूंग चुकवीत पुलाजवळ दाखल झाले.

परमवीर चक्र

[संपादन]

१६ डिसेंबरला सकाळी ८ वाजता पाकिस्तानच्या १३ लान्सर या रणगाड्याच्या डिव्हिजनने आपल्या नव्याकोऱ्या पॅटन रणगाड्यांनिशी भारतीय सैन्यावर चढाई केली. पूना हॉर्सेसच्या बी स्क्वॉड्रनवर हल्ला झाल्यावर त्याच्या सेनापतीने कुमक मागवली. खेतरपाल आणि ए स्क्वॉड्रनमधील काही रणगाडे टाकोटाक त्यांच्या मदतीला धावले. १७ पूना हॉर्सेसचे रणगाडे आणि ४७व्या इन्फंट्रीचे सेनापती हनुत सिंग राठोड यांनी पहिला हल्ला कापून काढला. शत्रूने दोन स्क्वॉड्रन एकदम भारतीय सैन्याच्या अंगावर घातल्या आणि फळी फोडत पुढे येण्यास सुरुवात केली. खेतरपाल आणि त्यांचा सहकारी रणगाडा सरसावले आणि त्यांनी पाकिस्तान्यांची ही चाल रोखून धरली. संपूर्ण स्क्वॉड्रनशी दोन हात करताना खेतरपालच्या सहकारी रणगाड्याचा सरदार कामी आला. एकट्या पडलेल्या खेतरपालच्या रणगाड्यानी लढाई सुरूच ठेवली आणि पुढे येत असलेल्या पाकिस्तानी सैनिक आणि रणगाड्यांवर थेट चाल केली आणि एक रणगाडा तोडून पाडला. इतक्यात सरदार गमावलेल्या रणगाड्यानेही खेतरपालना साथ दिली. हबकलेला शत्रू थोडा मागे होउन परत नव्या दमाने चालून आला. भारतीय रणगाड्यांनी मागे न हटता एकामागोमाग एक असे दहा पाकिस्तानी रणगाडे फोडून काढले. भारताचा दुसरा रणगाडा यात कामी आला. आता खेतरपालचा एक रणगाडा विरुद्ध पाकिस्तानची संपूर्ण स्क्वॉड्रन अशी लढाई सुरू झाली. असंख्य तोफगोळे आणि मशिनगनच्या माऱ्याने खेतरपालचा रणगाडा हतबल झाला आणि खेतरपालांसह रणगाड्यातील चारही सैनिक गंभीर जखमी झाले. रेडियोमन सवार नंद सिंग हे रणगाड्यातच मृत्यू पावले. चालक सवार प्रयाग सिंग आणि तोफचालक सवार नथु सिंग यांच्यासह जागचा हलू न शकणाऱ्या रणगाड्यातून खेतरपाल यांनी तुफान मारा चालूच ठेवला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेडियोवरून त्यांना रणगाडा सोडण्याचा हुकुम दिला असता त्यांनी उत्तर दिले - नाही, मी माझा रणगाडा सोडून पळणार नाही. माझी मुख्य तोफ अजून चालू आहे अन् मी त्या ****ना पाहून घेतो. त्यानंतर ते एकामागोमाग पाकिस्तानी रणगाड्यांचा वेध घेत राहिले. शेवटी एकच शत्रू उरला व तो १०० मीटर वर येउन ठाकला. दोघांनीही एकाच वेळी तोफांचा मारा केला. यात दोन्ही रणगाडे निकामी झाले आणि खेतरपाल मृत्यू पावले. त्याआधी त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवत पाकिस्तानचे डझनावर रणगाडे उडवले आणि पाकिस्तानची व्यूहात्मक चाल उधळून लावली होती.

खेतरपाल यांनी दाखविलेल्या या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र देण्यात आले.

युद्धानंतर

[संपादन]

खेतरपाल यांचा रणगाडा फामागुस्ता शत्रूने काबीज केला. नंद सिंग आणि खेतरपालांचे मृतदेह शत्रूने नंतर परत केले. त्यांच्यावर १७ डिसेंबरला अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या शौर्याची व मृत्यूची बातमी २६ डिसेंबरपर्यंत कळली नव्हती. युद्धानंतर पाकिस्तानने फामागुस्ता भारतीय सैन्याला परत केला व आता तो संग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे. प्रयाग सिंग आणि नथु सिंग हे दोघेही जबर जखमी झाले आणि पाकिस्तानच्या हाती पडले. युद्धानंतर ते भारतास परतले व कॅप्टनच्या मानद हुद्द्यावरून ते सैन्यातून निवृत्त झाले.