अनंत सदाशिव अळतेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अनंत सदाशिव अळतेकर (३० ऑगस्ट, इ.स. १८९८ - २५ नोव्हेंबर, इ.स. १९५९) हे प्राचीन भारतीय इतिहास, शिलालेख, ताम्रपट, नाणी यांचे अभ्यासक व इतिहासकार होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला.[१]

कारकिर्द[संपादन]

पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून त्यांनी इ.स. १९१९ साली बी.ए. व इ.स. १९२२ साली एम.ए. केले. बनारस हिंदु विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापन केले. त्यानंतर इ.स. १९४९ साली ते पाटणा विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहास विभागाचे प्रमुख झाले. नंतर पाटण्यातच के.पी. जयस्वाल संशोधन संस्थेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. अळतेकरांनी बहुतेक ग्रंथलेखन इंग्रजीत केलेले आहे. या ग्रंथांतून भारतीय इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडांची सांगोपांग माहिती मिळते. त्यांच्या काही ग्रंथांचे मराठीतूनही अनुवाद झालेले आहेत. 'प्राचीन भारतीय शिक्षणपद्धती' या ग्रंथातून वेदकालापासून ते इ.स. १२०० पर्यंतच्या कालातील भारतीय शिक्षणपद्धतीविषयीचे चिकित्सापूर्ण विवेचन अळतेकरांनी केलेले आहे.[२] 'प्राचीन भारतातील स्त्रियांचे सामाजिक स्थान व परिस्थिती' या ग्रंथातून प्राचीन साहित्य, शिलालेख, शिल्पे, प्रवासवृत्ते इत्यादी साधनांच्या आधारे भारतातील स्त्रियांचे शिक्षण, विवाह, घटस्फोट, सतीची चाल, स्त्रियांची वेशभूषा याबाबतची माहिती त्यांनी दिलेली आहे. इ.स. १९४० पासून इ.स. १९५४ पर्यंत त्यांनी भारतीय नाणक परिषदेच्या ज्ञानपत्रिकेचे संपादनही केले. इ.स. १९५८ साली वैशालीजवळ पुरातत्त्वीय उत्खनन करत असताना अळतेकरांना गौतम बुद्धांचे काही पुरावशेष मिळाले. हे अवशेष म्हणजे गौतम बुद्धांच्या अस्थि असल्याचे मानले जाते जे सध्या पाटणा वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आलेले आहेत. [३]

लेखन[संपादन]

 • 'गुजरात आणि काठेवाडमधील मुख्य नगरांचा इतिहास'
 • 'पश्चिम भारतातील ग्रामसंस्थांचा इतिहास' (इ.स. १९२७)
 • 'राष्ट्रकूट आणि त्यांचा काळ' (डी.लिट्. साठी लिहिलेला प्रबंध)
 • 'प्राचीन भारतीय शिक्षणपद्धती' (इ.स. १९३४)
 • 'शिलाहारांचा इतिहास' (इ.स. १९३५)
 • 'बनारसचा इतिहास' (इ.स. १९३७)
 • 'प्राचीन भारतातील स्त्रियांचे सामाजिक स्थान व परिस्थिती' (इ.स. १९३८)
 • 'द एज ऑफ द वाकाटकाज ॲंड द गुप्ताज' (इ.स. १९४६)
 • 'स्टेट ॲन्ड गव्हर्नमेंट एन्शन्ट इंडिया'
 • 'कॅटलॉग ऑफ द गुप्त गोल्ड कॉइन्स इन द बयाना होर्ड' (इ.स. १९५६)
 • 'कॉर्पस ऑफ गुप्त कॉइन्स'

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ सु.र. देशपांडे. अळतेकर, अनंत सदाशिव. मराठी विश्वकोश. २८ मे २०१४ रोजी पाहिले.
 2. ^ पॉल फ्रेडरीक क्रेसी (इ.स. १९३४). अमेरिकन जर्नल ऑफ सोशियालॉजी. pp. ४२४-४२५. doi:10.1086/216811. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 3. ^ प्रणव के. चौधरी. "Holy ashes fail to attract pilgrims". २१ जानेवारी २०१४ रोजी पाहिले.