कैलाश खेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कैलाश खेर

कैलाश खेर
आयुष्य
जन्म ७ जुलै, १९७३ (1973-07-07) (वय: ५०)
जन्म स्थान मीरत, उत्तर प्रदेश
संगीत साधना
गायन प्रकार इंडियन पॉप, बॉलिवूड
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळ २००३ - चालू

कैलाश मेहेरसिंह खेर (जन्म : मीरत-उत्तर प्रदेश, ७ जुलै इ.स. १९७३) हा एक भारतीय गायक आहे. मीरत येथे जन्मलेल्या खेरने २००१ साली मुंबईला स्थानांतर केले व संगीत सृष्टीमध्ये काम मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. २००३ सालच्या अंदाज चित्रपटामध्ये त्याने जे एक गाणे म्हटले ते लोकप्रिय झाले. त्यानंतर स्वदेस, मंगल पांडे, सरकार इत्यादी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन करून तो प्रसिद्धीस आला. कैलाश सध्या बॉलिवूडमधील एक लोकप्रिय पार्श्वगायक असून त्याला २००७ सालचा सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायकासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

पूर्वेतिहास[संपादन]

बालपणी कैलाशने कधी चित्रपट-गीत ऐकले नव्हतेना गायले होते. मात्र आपल्या पित्याकडून ते कबीराची गीते किंवा बाबा गुरूसाहेबवाणी ऐकत असत. वडील पुजारी होते आणि अनेकदा घरी होणाऱ्या धार्मिक समारंभात परंपरागत गीते गात. त्यांच्याकडूनच कैलाशने संगीताचे थोडेफार शिक्षण घेतले. पुढच्या शिक्षणासाठी ते वयाच्या १३व्या वर्षी दिल्लीला आले. तेथे संगीताच्या एका वर्गात दाखल झाले, पण उदरनिर्वाहासाठी करावयाच्या कामकाजामुळे संगीत शिक्षणाकडे पुरेसे लक्ष देऊ शकले नाहीत. मात्र त्याही काळात आपल्या तुटपुंज्या संगीत ज्ञानावर ते परदेशी विद्यार्थ्यांना गाणे शिकवू लागले. इ.स. १९९९पर्यंत कैलाश खेर आपल्या एका मित्रासोबत साड्या निर्यातीचा व्यवसाय करीत होते, पण त्यात मोठा तोटा झाला. हा तोटा इतका जास्त होता की त्यांचे संपूर्ण भांडवल त्यात गडप झाले. आत्महत्या करावी आसे विचार मनात येऊ लागले. अश्या मनःस्थितीत असताना ते नशीब काढण्यासाठी सहा महिन्यासाठी सिंगापूरला आणि थायलॅंडला जाऊन आले. आपल्या मनाला आलेल्या नैराश्यावर मात करण्यासाठी ते ऋषिकेशला जाऊन राहिले. तिथल्या साधुसंतांसाठी ते गाणी म्हणत. ती गाणी ऐकून मोठमोठे साधू खुश होत. ते पाहून कैलाश खेर यांना नव्याने आत्मविश्वास मिळाला आणि संगीत क्षेत्रात काम करायचे त्यांनी निश्चित केले.

वयाच्या २९व्या वर्षी कैलाश खेर मुंबईला आले आणि एका चाळीत राहू लागले. वर्ष-दीड वर्षे ते चपला झिजवत संगीत स्टुडिओंच्या वाऱ्या करत राहिले, आणि एके दिवशी राम संपत नावाच्या जाहिरातकाराने त्यांना एका जाहिरातीच्या गाण्यासाठी बोलावले. ते जाहिरातगीत झाले आणि कैलाश खेर यांना पाच हजार रुपये मिळाले. ते पैसे त्यांना बरेच दिवस पुरले, मात्र त्यानंतर त्यांची यशाची गाडी चालूच राहिली. चित्रपटांतील पार्श्वगायनासाठी त्यांना मागण्या येऊ लागल्या.

चित्रपटांव्यतिरिक्त[संपादन]

कैलाश खेर यांनी २०१२ साली अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात भाग घेतला. त्यासाठी ते सभामंचांवरून अनेकदा गीतेही गात. दिल्लीत झालेल्या काॅमनवेल्थ क्रीडा स्पर्धांच्या समारोप समारंभात त्यांचा एका गीतात सहभाग होता. याशिवाय अनेक जाहीर कार्यक्रमांतून त्यांनी चित्रपट-गीते गाऊन लोकांचे मनोरंजन केले आहे.

कौटुंबिक[संपादन]

कैलाश खेर यांनी २००९ साली मुंबईच्या शीतलनावाच्या मुलीशी लग्न केले; त्यांना कबीर नावाचा एक मुलगा आहे.


पुरस्कार[संपादन]

फिल्मफेअर पुरस्कर[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत