Jump to content

वासुदेव वामन खरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वासुदेव वामन खरे
जन्म नाव वासुदेव वामन खरे
टोपणनाव वासुदेवशास्त्री खरे
जन्म ५ ऑगस्ट १८५८
गुहागर, रत्नागिरी जिल्हा
मृत्यू ११ जून १९२४
मिरज, सांगली जिल्हा
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी, संस्कृत
साहित्य प्रकार इतिहास, नाटक
प्रसिद्ध साहित्यकृती ऐतिहासिक लेखसंग्रह
पत्नी सत्यभामाबाई खरे (माहेरचे नाव यमू सोमण)
अपत्ये यशवंतराव खरे
विकिस्रोत
विकिस्रोत
वासुदेव वामन खरे हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.

वासुदेव वामन खरे ऊर्फ वासुदेवशास्त्री खरे (जन्म : गुहागर, ५ ऑगस्ट १८५८; - ११ जून १९२४) हे मराठी भाषा इतिहाससंशोधक, कवीनाटककार होते.

जीवन

[संपादन]

वासुदेवशास्त्री खरे यांचा जन्म रत्‍नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे झाला. त्यांच्या घराण्यात शास्त्राध्ययनाची आणि पुराण सांगण्याची परंपरा होती. पण त्यांची घरची परिस्थिती बेताची होती. त्यांना तीन भाऊ व दोन बहिणी होत्या. वासुदेवशास्त्री बुद्धिमान होते. गुहागरच्या मराठी शाळेत ते सहावीपर्यंत शिकले. कवितांची आणि नाट्यकलेची त्यांना देण होती. गावातल्या देवीच्या उत्सवाच्या वेळी नाटक मंडळींना ते नाटके लिहून व बसवून देत.[] १८७२ च्या डिसेंबर महिन्यात त्यांचा विवाह झाला. त्यानंतर विद्याभ्यासासाठी आणि जमल्यास उद्योग करण्यासाठी वासुदेवशास्त्री यांनी कोकण सोडले व ते साताऱ्यास आले.

साताऱ्यात वासुदेवशास्त्री तत्कालीन विख्यात संस्कृत पंडित अनंताचार्य गजेंद्रगडकर यांच्या हाताखाली संस्कृत शास्त्र विद्या शिकण्यासाठी राहिले. अनंताचार्य यांच्याकडे वासुदेवशास्त्र्यांनी काव्ये, तर्कसंग्रह व व्याकरण यांचा अभ्यास केला. त्यांची शास्त्रींची बुद्धिमत्ता आणि अभ्यासाची कळकळ पाहून आचार्य त्यांच्यावर संतुष्ट झाले आणि लवकरच त्यांनी आपल्या घरीच वासुदेवशास्त्री यांची जेवणाची सोय केली.[] साताऱ्याला वासुदेवशास्त्री अडीच वर्षे होते. त्यांचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले पण नंतर त्यांना पैशांची मोठी चणचण भासू लागली. एकदा शास्त्री साताऱ्यातील भटमहाराजांच्या हौदावर गेले असता पुण्याचे शिक्षक बजाबा बाळाजी नेने यांच्याशी त्यांची गाठ पडली. नेने मास्तर व वासुदेवशास्त्री यांच्यात 'एखाद्या विषयावर कोण जास्त चांगली व जलद कविता करतो' याची पैज लागली व वासुदेवशास्त्रींनी ती पैज जिंकली. नेने मास्तर वासुदेवशास्त्र्यांच्या ज्ञानावर खूष झाले व त्यांनी पुण्याला शाळेत आपल्या बदली नोकरीवर जाण्यासंबंधी विचारले. शास्त्रीबुवा त्यासाठी लगेच तयार झाले. त्यानंतर वासुदेवशास्त्री पुण्यात दरमहा पंधरा रुपये पगारावर शाळेत रुजू झाले.[]

पुण्यात आल्यावर वासुदेवशास्त्री यांची माधवराव कुंटे, श्रीधर विठ्ठल दाते, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, सार्वजनिक काका, विष्णूशास्त्री चिपळूणकर अशा थोरामोठ्यांशी ओळख झाली. विष्णूशास्त्र्यांनी काढलेल्या 'काव्येतिहास संग्रह' या मासिकातील संस्कृत विभागाचे संपादन विष्णूशास्त्र्यांच्या गैरहजेरीत वासुदेवशास्त्रींनी केले. लोकमान्य टिळक आणि वासुदेवशास्त्रींची ओळख डेक्कन कॉलेजपासून होती. म्हणूनच वासुदेवशास्त्रींनी आपली शाळेतील नोकरी सोडून टिळक, आगरकर व विष्णूशास्त्री यांनी स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली. टिळक व आगरकर यांनी काढलेल्या वर्तमानपत्राला 'केसरी'हे नाव वासुदेवशास्त्री यांनी सुचवले होते.[]

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वासुदेवशास्त्रींनी केवळ दहा महिने शिकवले. त्यानंतर त्यांनी पुणे सोडले व २८ नोव्हेंबर १८८० रोजी ते मिरजेत नव्याने स्थापन झालेल्या हायस्कूलमध्ये संस्कृत शिक्षक म्हणून रुजू झाले.[] मिरजयेथील शाळेत ते संस्कृत आणि मराठी हे विषय शिकवत. शाळेतील विद्यार्थी त्यांना फार घाबरत. पण तेच वासुदेवशास्त्री विद्यार्थांना जीव ओतून शिकवत. सर्व विद्यार्थांना ते समान वागणूक देत. गरीब-श्रींमंत असा भेदभाव करत नसत. तसेच ते शाळेप्रमाणे घरीही मुलांना बोलवून शिकवत असत.

लोकमान्य टिळकांच्या केसरीच्या पहिल्या पानावर वरच्या भागी वासुदेवशास्त्री खरे यांचा

गजालिश्रेष्ठा ह्या निबिडतरकान्तारजठरी। मदान्धाक्षा मित्रा क्षणभरिहि वास्तव्य न करी।
नखाग्रांनी येथे गुरूतर शिला भेदुनि करीं। भ्रमाने आहे रे गिरिकुहरि हा निद्रित हरी॥
हा श्लोक असे. हा श्लोक म्हणजे वासुदेवशास्त्री खरे यांनी जगन्नाथ पंडिताच्या भामिनीविलासमधील श्लोकाचा मराठी समश्लोकी काव्यानुवाद होता.

जगन्नाथ पंडिताचा मूळ श्लोक  :

स्थितिंनो रे दध्या: क्षणमपि मदान्धेक्षण सखे।
गजश्रेणीनाथ त्वमिह जटिलायां वनभुवि।
असौ कुम्भिभ्रान्त्या खरनखरनिर्दारितमहा-
गुरूग्रावग्राम: स्वपिति गिरिगर्भे हरिपति:॥

प्रकाशित साहित्य

[संपादन]
वर्ष पुस्तक भाषा प्रकार विषय
संगीत उग्रमंगल मराठी नाटक
ऐतिहासिक लेखसंग्रह मराठी ललितेतर इतिहास
संगीत कृष्णकांचन मराठी नाटक
संगीत चित्रवंचना मराठी नाटक
तारामंडल मराठी नाटक
देशकंटक मराठी नाटक
शिवसंभव मराठी नाटक
१९१३ इचलकरंजी संस्थानाचा इतिहास[] मराठी ललितेतर इतिहास
  • खरे, वासुदेव वामन शास्त्री (१८८८). यशवंतराय महाकाव्य. पुणे.

चरित्र

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

संदर्भसूची

[संपादन]
  • पुराणिक, शरदचंद्र. ऋषितर्पण.