संगीत उग्रमंगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

संगीत उग्रमंगल हे इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरे यांनी लिहिलेले एक काल्पनिक ऐतिहासिक नाटक होते. या नाटकाचे प्रयोग बलवंत संगीत मंडळी करीत असे.

’शटं प्रति शाठ्यम्‌’ आणि ‘शठं प्रति सत्यम्‌’ या दोन तत्त्वांचा योग्य परामर्श घेणारे ‘उग्रमंगल’ हे नाटक रजपूत रमणीवरील आलेल्या एका प्रसंगाचे रूपकात्मक चित्रण होते. उमरावती येथे २१ जानेवारी, २०१२ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. नाटकातील पात्रे आणि त्यांच्या भूमिका करणारे नट असे होते :-
लक्ष्मणसिंह-चिंतामणराव कोल्हटकर, भीमसिंह-पुरुषोत्तम बोरकर, हिरासिंग-बळवंतराव अभिषेकी, विद्याधर-दिनकर ढेरे, गणक-दामुअण्णा मालवणकर, घटकर्पत-मराठे, गुर्गावती-कृष्णराव कोल्हापुरे, वेत्रवती-गणपतराव मोहिते, पद्मावती (बिजलीजान)-मा. दीनानाथ मंगेशकर.

उग्रमंगल नाटकात दीनानाथ शास्त्रोक्त नृत्य करीत असत. त्यांच्या नृत्यांना आणि त्यांच्या ‘छांडो छांडो बिहारी’ आणि ‘भाव भला भजकांचा’ या पदांना वन्समोअर मिळत असे.

राजा लक्ष्मणसिंहाला शत्रूने कपटाने कैद केलेले असते, तेव्हा त्याची राणी पद्मावती ही वेषांतराने बिजलीजान नावाची नर्तकी बनून साथीदारांसह ‘छांडो छांडो’ ही ठुमरी शत्रूसमोर सादर करते आणि त्याला बेसावध अवस्थेत कैद करून लक्ष्मणसिंहाची सुटका करते..

या नाटकातील नृत्यांसाठी दीनानाथांनी तत्कालीन प्रसिद्ध नर्तक सुखदेवप्रसाद कथक यांची नृत्यशिक्षणाची शिकवणी लावली होती. उग्रमंगल नाटकाच्या निमित्ताने मराठी रंगभूमीवर शास्त्रोक्त नृत्याचा पहिला प्रयोग झाला. राणी पद्मावती आणि नर्तकी बिजलीजान यांच्या मनमोहक मुद्रा पहायला, गाणे ऐकायला आणि नृत्याचा आनंद लुटायला प्रेक्षकांची झुंबड उडत असे. इतकी की एकदा अमरावतीमधील बोके इंद्रभुवन नाट्यगृहाची गॅलरी प्रेक्षकांच्या भाराने खाली कोसळली. उग्रंंगल नाटकाचे मराठवाड्यात, गोव्यात आणि संपूर्ण विदर्भात अनेक प्रयोग होऊन दीनानाथांची राणी पद्मावती लोकप्रिय झाली.

अमरावतीत झालेल्या या नाटकातील भूमिका पाहून नाशिकच्या गंगापूर पीठाचे श्रीमत्‌‍जगद्गुरू शंकराचार्य डॉ. कूर्तकोटी यांनी अभिनेते दीनानाथांना आशीर्वादादाखल ‘संगीतरत्‍न’ ही उपाधी दिली. (१४ मे, १९२२)