दलित स्त्रीवाद
दलित स्त्रीवाद (Dalit Feminism) ही एक राजकीय विचारसरणी आहे. १९९६ साली गोपाळ गुरू यांच्या दलित वुमेन टॉक डिफरेन्टली (Dalit women talk differently) या लेखाद्वारे दलित स्त्रीवादाची चर्चा सुरू झाली.[१] यापूर्वीदेखील १९९० पासूनच दलित स्त्रियांच्या वेगळ्या संघटनांमधून वेगळ्या दलित स्त्रीवादाची मांडणी चळवळीच्या पातळीवर होत होती. मुख्यप्रवाही स्त्रीवाद आणि दलित चळवळ यांनी दलित स्त्रियांच्या प्रश्नाकडे सिद्धान्ताच्या, विश्लेषणाच्या व कृतीच्या पातळीवर दुर्लक्ष केले हा तात्कालिक संदर्भ होता. त्याचप्रकारे फुले-आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांच्या सहभागाचा ऐतिहासिक संदर्भही या चर्चेच्या पार्श्वभूमीला होता.[२]
पार्श्वभूमी
[संपादन]फुले आंबेडकरी चळवळीमध्ये स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता.जोतीराव फुल्यांनी व सावित्रीबाई फुल्यांनी स्त्रीशिक्षणाची सुरुवात करून (१८४८) दलित स्त्रियांनाही शिक्षणाची कवाडे खुली केली. यातीलच एका शाळेतील विद्यार्थीनी मुक्ता साळवे हिने आम्हां महारामांगांचा धर्म कोणता? या निबंधातून दलित स्त्रीचे मातृत्वाचे अनुभव उच्चवर्णीय स्त्रियांच्या अनुभवांपेक्षा भिन्न आहेत अशी मांडणी केली. आंबेडकरी चळवळीतूनही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रिया या जातिव्यवस्थेची प्रवेशद्वारे आहेत यातून जात व स्त्रीप्रश्न यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. मात्र आंबेडकरोत्तर भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राजकारण, दलित पॅंथर, नामांतर चळवळ आदी दलित चळवळींनी दलित स्त्रीचा प्रश्न स्त्रीप्रश्न आहे असे मानून त्याकडे दुर्लक्ष केले. या चळवळींचा केंद्रबिंदू नेहमी दलित पुरुष होता.
स्त्रीवादी चळवळीने ७० च्या दशकापासून भारतात अधिक राजकीय कृती करण्यास सुरुवात केली. हुंडाविरोधी आंदोलने, बलात्कारविरोधी आंदोलने, घरगुती हिंसाचारविरोधी चळवळी यातून भारतातील स्त्रीवाद चळवळ सिद्धान्त व व्यवहाराच्या पातळीवर विकसित होत होता. या स्त्रीवादी चळवळीने दलित स्त्रीचा प्रश्न हा जातीचा प्रश्न आहे असे मानून त्याकडे दुर्लक्ष केले. या चळवळीचा केंद्रबिंदू नेहमी उच्चवर्णीय स्त्री होती.
प्रा. डॉ. सुषमा अंधारे यांच्या मते ब्राह्मणवादाची सावली पडलेल्या आंबेडकरी चळवळीने स्त्री नेतृत्वाला गृहित धरले, 'आंबेडकरी चळवळीवर विश्लेषण, समीक्षा, त्याची सैद्धांतिक मांडणी करताना या चळवळीतल्या नेत्यांनी स्त्रीला कायम दुय्यम स्थान दिले. नेतृत्वातल्या अहममिकेमुळे महिलेला एखाडे प्रमुख पद देणंही दुरापास्त झालं आहे. याचा परिणाम असा झाला आहे की दलित स्त्रीच्या जगण्यातील वेदना कुठे तरी हरवली आहे.'[३]
दलित स्त्रीवादी भूमिदृष्टी
[संपादन]भूमिदृष्टी सिद्धान्त (Standpoint Theory) हा सिद्धान्त मार्क्सवादी लेलीनवादी तत्त्वज्ञानातून आलेला असून या सिद्धान्तानुसार समाजातील सर्वात शोषित समूहाच्या दृष्टीकोनातूनच सत्याचे आकलन होऊ शकते यालाच भूमिदृष्टी असे म्हणतात. अशी भूमिदृष्टी जन्मतः प्राप्त होते असे नाही तर ही एक जाणीव असून ती ऐतिहासिक ल ढ्यांतून विकसित होते. शर्मिला रेगे यांनी या सिद्धान्ताची मांडणी दलित स्त्रीच्या बाबतीत केली आहे.[४] दलित स्त्रीवादी भूमिदृष्टी ही फुले आंबेडकरी ऐतिहासिक लढ्यांमधून विकसित झालेली आहे. ती भारतातील सध्या अस्तित्वात असलेल्या भूमिदृष्टीपैकी सर्वात मोठी मुक्तिदायी भूमिदृष्टी असल्याने स्त्रीवादी चळवळीने त्याचा स्वीकार करावा असे रेगे यांचे मत आहे.
दलित स्त्रीवादी संघटना
[संपादन]दलित स्त्रीवादी साहित्य
[संपादन]मराठी
[संपादन]- आम्हीही इतिहास घडवला - ऊर्मिला पवार, मीनाक्षी मून
- आयदान (आत्मचरित्र) - ऊर्मिला पवार
- धादांत खैरलांजी (नाटक) - प्रज्ञा दया पवार
- जिणं आमचं - बेबीताई कांबळे
इंग्रजी
[संपादन]- अगेन्स्ट द मॅडनेस ऑफ मनु - शर्मिला रेगे
- दलित विमेन स्पीक आउट: कास्ट, क्लास अँड जेंडर व्हायोलन्स इन इंडिया - जयश्री मंगुभाई
बंगाली
[संपादन]- चंडालीनी कोबिता (कवितासंग्रह) - कल्यानी ठाकुर
- चंडालीनी ब्रिबिती (निबंधसंग्रह) - कल्यानी ठाकुर
काळा स्त्रीवाद व दलित स्त्रीवाद
[संपादन]काळा स्त्रीवाद व दलित स्त्रीवाद यांमध्ये अनेक बाबतीत साम्य व काही बाबतीत भिन्नत्व असलेले दिसते. भूमिदृष्टी सिद्धान्ताचा दोन्हींनी स्वीकार केलेला दिसतो. परंतु काळ्या स्त्रीवादामध्ये वंशवादविरोधी चळवळीतून येणारी मातृभूमीची आस ही बाब भिन्न असलेली दिसते.
हे सुद्धा पहा
[संपादन]- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
संदर्भ
[संपादन]- ^ "Dalit Women Talk Differently". Economic and Political Weekly (इंग्रजी भाषेत). 30 (-1). 2015-06-05.
- ^ पवार, ऊर्मिला आणि मून, मीनाक्षी(२०००). आम्हीही इतिहास घडवला. सुगावा प्रकाशन, पुणे
- ^ "आंबेडकरी चळवळीतही स्त्री नेतृत्वाला दुय्यम स्थान-Maharashtra Times". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2018-11-09 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ Rege, Sharmila (1998). "Dalit Women Talk Differently: A Critique of 'Difference' and Towards a Dalit Feminist Standpoint Position". Economic and Political Weekly. 33 (44): WS39–WS46.