ऊर्मिला पवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऊर्मिला पवार
जन्म ७ मे इ.स. १९४५
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र लेखन
साहित्य प्रकार कादंबरी, काव्य
प्रसिद्ध साहित्यकृती '

ऊर्मिला पवार ( ७ मे १९४५) या एक मराठी लेखिका आहेत. त्यांचे मूळ गाव तळकोकणात आहे. पवार यांचे वडील शिक्षक होते. पण लहानपणीच ते वारल्यामुळे आईला आयदान करीत चरितार्थ चालवावा लागला. त्यांचे एम.ए.चे शिक्षण झाल्यावर त्यांनी लिहायला सुरुवात केली. ’सहावं बोट’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९८८मध्ये प्रकाशित झाला. दलितांचा इतिहास व सद्यस्थितीचा अभ्यास तसेच बौद्ध धम्मग्रंथांचा मराठी अनुवाद, अशा प्रकारचे लेखनही ऊर्मिला पवार करतात.

एकांकिका, समीक्षा असे लेखनप्रकार हाताळणाऱ्या ऊर्मिला पवार यांच्या ' आयदान ' या आत्मकथनाने मराठी साहित्यातील आत्मकथेला ऐतिहासिक वळण मिळाले. आज दलित आत्मकथनांच्या प्रवासाची चर्चा 'बलुतं ते आयदान' अशीच केली जाते. ऊर्मिला पवार यांच्या कथा, आत्मकथनाची इंग्रजी, स्वीडिश या भाषांमध्येही भाषांतरे झाली आहेत.

जीवनपट[संपादन]

महाराष्ट्र राज्यातील कोकण ह्या प्रांतात पवार यांचा जन्म झाला. त्यांच्या महार समाजातील लोक परंपरेने बांबूच्या कामट्यांची सुपे, रोवळ्या, टोपल्या विणण्याचे काम (आयदानाचे काम) करीत होते.

उर्मिला पवार म्हणतात त्यानुसार २००० साली त्यांनी ' अबब! हत्ती ' नावाच्या छोट्यांच्या दिवाळी अंकात एक भाग लिहिला होता. तो छापून आल्यावर बाईंना आणखीन लिहावसे वाटले. 'चौथी भिंत' या पुस्तकात १९८९ साली त्यांनी लिहिलेली 'गोष्ट शैशवाची’ ही गोष्ट छापून आली. त्यानंतर त्या अधिकाधिक लिहू लागल्या.

उर्मिला पवारांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. लग्नानंतर त्या जिद्दीने पुढे शिकल्या. त्यांनी आंबेडकरी चळवळीत भाग घेतला, संघटना बांधल्या. त्यांनी मराठी वाङ्‌मय ह्या विषयात पदव्युत्तर पदविका मिळवली.

ऊर्मिला पवार पुढे महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीला लागल्या.(संदर्भ?)

ऊर्मिला पवार ११-१२ वर्षे वयाच्या असताना १९५७ साली त्यांचे कुटुंब बौद्ध झाले.

ऊर्मिला पवार यांच्या ‘आयदान’ या आत्मकथनात्मक पुस्तकाचे सुषमा देशपांडे यांनी नाट्यरूपांतर केले आहे. या नाटकाचे ५०हून अधिक प्रयोग झाले आहेत.

लिहिलेली पुस्तके[संपादन]

 1. डॉ. आंबेडकर जीवन कालपट - सहलेखिका, ५ डिसेंबर २००३, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई,
 2. आम्हीही इतिहास घडवला : आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांचे योगदान (संशोधन) (सहलेखिका मीनाक्षी मून), पहिली आवृत्ती १९८९, स्त्री उवाच, दुसरी आवृत्ती सुगावा प्रकाशन.
 3. आयदान (आत्मकथन) २००३ पहिली आवृत्ती - ७ पुनर्मुद्रणे प्रकाशित, ग्रंथाली मुंबई
  1. आयदान (हिंदी भाषांतर) वाणी प्रकाशन, नवी दिल्ली
  2. आयदान (इंग्रजी भाषांतर, कोलंबिया विश्वविद्यालय) २००९, कोलंबिया युनिव्हर्सिटी प्रेस, न्यू यॉर्क
 4. उदान (पाली भाषेतल्या ’तिपिटक सुत्तपीटक खुद्दकणिकाय उदान’ या मूळ ग्रंथाचा अनुवाद) बौद्ध तत्त्वज्ञानपर कथा १९८९, सुगावा प्रकाशन, ८६१ सदाशिव पेठ पुणे
 5. कोकणातील दलितांचे रीतिरिवाज आणि लोकगीते
 6. चौथी भिंत (कथासंग्रह) १९८९, संबोधी प्रकाशन, गोरेगाव(पूर्व) मुंबई
 7. दलित लेखिका आणि त्यांचे साहित्य (वैचारिक)
 8. दोन एकांकिंका - एलास पावन्यात बसा बसा व मुक्ती - १९९६, समता प्रकाशन, मुंबई
 9. मॉरिशस - एक प्रवास (प्रवासवर्णन) १९९४, सुगंधा प्रकाशन, मुंबई
 10. सहावें बोट (कथासंग्रह) १९८८, साहित्य सांस्कृतिक मंडळ, मुंबई
 11. हातचा एक (कथासंग्रह) जुलै २००४, अक्षर प्रकाशन, माहीम, मुंबई

मानसन्मान /पुरस्कार[संपादन]

 • मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार
 • ’आयदान’ला पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिलेला ’लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार’ ऊर्मिला पवार यांनी नाकारला. कारण सांगताना ’वर्णवादाला मसापचा नकार नाहीये. अशा संस्थेकडून पुरस्कार घेणं योग्य नाही,(स्वल्पविराम मुळातलाच!) असं वाटलं, म्हणून मी मसापचा पुरस्कार नाकारलाय’.... ’मसापच्या सरस्वतीपूजन आणि पसायदानाला माझा विरोध आहे.’ (आधार :’महानगर’च्या मध्ये १२ जून २००४ च्या अंकात प्रसिद्ध झालेली, ऊर्मिला पवार यांची प्र.म. लता यांनी घेतलेली मुलाखत).
 • जुलै २००४मध्ये मिळालेला ’प्रियदर्शनी अकादमी’चा २५००० रुपयांचा पुरस्कार.
 • धुळे येथे झालेल्या ११व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. हे संमेलन १३ व १४ जानेवारी २०१३ या दोन दिवसांत भरले होते.
 • नाशिकच्या समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने रविवार दि. २४ फेब्रुवारी २०१३ रोजी सटाणा येथे कवी कैलास पगारे यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या परिषदेत ऊर्मिला पवार यांना समाज प्रबोधन संस्थेचा राज्यस्तरीय 'प्रबोधनमित्र' पुरस्कार प्रदान करण्यात आला.