Jump to content

भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध
पाकिस्तानी लेफ्टनंट जनरल ए.के. नियाझी पराभवनाम्यावर स्वाक्षरी करताना
पाकिस्तानी लेफ्टनंट जनरल ए.के. नियाझी पराभवनाम्यावर स्वाक्षरी करताना
दिनांक ३ डिसेंबर - १६ डिसेंबर , १९७१
स्थान बांगलादेश (त्यावेळचा पूर्व पाकिस्तान) व भारत पश्विम सीमा (राजस्थान, पंजाब)
परिणती भारताचा निर्णायक विजय
प्रादेशिक बदल बांगलादेशची निर्मिती, पाकिस्तानची फाळणी, पश्चिम सिमेवर युद्धबंदी
युद्धमान पक्ष
भारत भारत पाकिस्तान पाकिस्तान
सेनापती
फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ ए.के. नियाझी, टिक्काखान, हमीदखान
सैन्यबळ
५ लाख सैन्य+
१ लाख मुक्तिवाहिनी स्वयंसेवक
४ लाख सैन्य
बळी आणि नुकसान
३,८४३ ठार ठार व जखमींचा आकडा माहीत नाही
९०,३६८ युद्धबंदी

डिसेंबर १९७१ मध्ये झालेले भारत पाक युद्ध भारत व पाकिस्तानमधील तिसरे युद्ध होते. या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला व बांगलादेशाची निर्मिती केली. या युद्धाची सुरुवात पाकिस्तानी आक्रमणाने झाली.

पार्श्वभूमी

[संपादन]

१९७० च्या पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत पूर्व पाकिस्तानातील अवामी लीग ने १६९ मधील १६७ जागा जिंकल्या व इस्लामाबादमध्ये संसदेत अवामी लीगचे बहुमत झाले. आवामी लीगचे नेते शेख मुजिबूर रहमान यांनी राष्ट्राध्यक्षांपुढे सरकार स्थापनेचा दावा सादर केला. पाकिस्तानच्या स्थापनेपासून राजकारणात वर्चस्व ठेवणाऱ्या पश्चिम पाकिस्तानातील खास करून पंजाबी व पठाणी राजकारण्यांना बंगाली वर्चस्व होणे मान्यच नव्हते. झुल्फिकार अली भुट्टो यांनी मुजिबूर यांना पंतप्रधानपद देण्यास विरोध केला. राष्ट्राध्यक्ष याह्याखान यांनी पूर्व पाकिस्तानात सेनेला तैनात केले.

पूर्व पाकिस्तानात यानंतर सर्वत्र अटकसत्र व दडपशाही सुरू झाली. पूर्व पाकिस्तानी सैनिक व पोलिसांना निःशस्त्र करण्यात आले. पूर्व पाकिस्तानमध्ये यामुळे बंद, हरताळ, मोर्चे यासारखे प्रकार वारंवार होऊ लागले. पाकिस्तानी सेनेने हे सर्व प्रकार दडपून मार्च २५ १९७१ रोजी डाक्क्याचा ताबा मिळवला व अवामी लीगवर बंदी घालण्यात आली. मुजिबूर रहमान यांना अटक करून पश्चिम पाकिस्तान त्यांची रवानगी झाली. पूर्व पाकिस्तानातील हिंदूचे मोठ्या प्रमाणात शिरकाण सुरू झाले.

मार्च २७ १९७१ रोजी झिया उर-रहमान यांनी मुजिबूर रहमान यांच्या वतीने बांगला देशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली व एप्रिलमध्ये छुप्या सरकारची स्थापना केली. यामुळे पूर्व पाकिस्तानात स्वातंत्र्याची ओढ लागलेले हजारो लोक मुक्तिवाहिनीमध्ये (एक स्वतंत्र सैन्यदल) सामिल झाले.

भारतातील घडामोडी

[संपादन]

मार्च २७ १९७१ रोजी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यानी पूर्व पाकिस्तानात चालू असलेल्या बांगला देशसाठीच्या स्वातंत्र्य लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला व पूर्व पाकिस्तानी जनतेला जी मदत लागेल ती पुरवण्याचे आश्वासन दिले. पूर्व पाकिस्तानात चाललेल्या मानवी हत्यांमुळे भारतात मोठ्या संख्येने तिकडील लोक सीमा ओलांडून भारतात आश्रयास आले.[] सीमेवर छावण्या उभारण्यात आल्या. अज्ञातवासातील बांगला सैनिकांनी व लष्करी अधिकाऱ्यांनी लगेचच मुक्तिवाहिनीच्या स्वयंसेवकांना तयार करण्यास सुरुवात केली.

पूर्व पाकिस्तानातील भयंकर हिंसाचारामुळे भारतात येणाऱ्या आश्रितांची संख्या प्रचंड वाढली. ती १ कोटीच्याही वर गेली. भारतावर यामुळे आर्थिक ताण पडू लागला. त्यातच पाकिस्तानने अमेरिकडून युद्धकालात मदत मिळवण्याचे आश्वासन मिळवले.

एप्रिल १९७१ मध्ये श्रीमती गांधींनी युरोपचा झंजावाती दौरा केला. ९ ऑगस्ट १९७१ रोजी श्रीमती गांधींनी रशियाशी २० वर्षाचा मैत्रीचा करार करून सर्व जगाला खासकरून अमेरिकेला, ब्रिटन व फ्रान्ससारख्या देशांना धक्का दिला. या मैत्रीने चीनची युद्धात उतरून मध्यस्थी होऊ शकण्याची शक्यता कमी झाली. चीन हा पाकिस्तानचा मित्रदेश असला तरी त्याने युद्धकाळात तटस्थ राहणे पसंत केले.

दरम्यानच्या काळात मुक्तिवाहिनी पूर्व पाकिस्तानात सक्रिय झाली व तिने गनिमी काव्याने पाकिस्तानी लष्कराविरुद्ध उठाव केला. भारताने देखील मुक्तिबाहिनीला पूर्ण पाठिंबा देत लष्करी साहित्याची मदत केली.[]

युद्ध

[संपादन]
T-55
१९७१ चे भारत-पाक युद्ध

नोव्हेंबर पर्यंत घडामोडींना आणखीनच वेग आला व युद्धाची शक्यता अटळ झाली. भारताने पूर्व पाकिस्तान सीमेवर सैन्य जमा केले. पावसानंतरच्या काळात जमीन बऱ्यापैकी कोरडी झाली होती.तसेच हिमालयात थंडीमुळे चिनी आक्रमणाची शक्यता कमी झाली. नोव्हेंबर २३ १९७१ रोजी पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष याह्याखान यांनी पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू केली व युद्धास तयार रहाण्याचे देशवासीयांना आवाहन केले. रविवार डिसेंबर ३ रोजी पाकिस्तानी हवाई-दलाने उत्तर भारतातील अनेक हवाईतळांवर हल्ले चढवून युद्धाची पहिली ठिणगी टाकली. जोरदार हवाई हल्ले चढवून भारताची आक्रमण क्षमता खच्ची करण्याचे पाकिस्तानी तंत्र होते. पाकिस्तानने हल्ला तर केला परंतु त्यात त्यांचा फारसा फायदा झाला नाही उलट भारताला आक्रमण करायला सबळ कारण मिळाले व दुसऱ्या दिवशीच इंदिरा गांधींनी भारतीय सेनेला ढाकाच्या दिशेने आक्रमण करायचे आदेश दिले व भारताने अौपचारिकरित्या युद्धाची घोषणा केली .

भारतीय आक्रमणाचे दोन उदिष्टे होती. १) पूर्व पाकिस्तानात जास्तीत जास्त आत घुसून पूर्व पाकिस्तानचा ताबा मिळवणे. २) पश्चिम सीमेवर पश्चिम पाकिस्तानातून येणाऱ्या पाकिस्तानी फौजेला फक्त रोखून धरायचे. पश्चिम पाकिस्तानात घुसून कोणत्याही परिस्थितीत आक्रमण करायचे नाही असा भारताचा बेत होता.

या उलट पाकिस्तानी सेनेची उदिष्टे होती. १) भारताला पूर्व पाकिस्तानात घुसण्यापासून रोखणे. पूर्व पाकिस्तानात आत खोलवर घुसणे बरेच अवघड होते व भारतीय सेनेला त्यात जास्तीत जास्त वेळ लागेल असे पहाणे २) दरम्यान पश्चिमेकडून भारतात घुसून जास्तीत जास्त भूक्षेत्राचा ताबा मिळवणे. भारताने पश्चिम सीमेवर त्यामानाने कमी सैन्य तैनात केले होते. त्यामुळे त्यात पाकिस्तानी सेनेला यश मिळेल असा विश्वास होता. या दोन्हीत यशस्वी झाल्यावर भारताची कोंडी होईल अशी पाकिस्तानी लष्कराची चाल होती.

पाकिस्तानने पहिले आक्रमण करून युद्धाची सुरुवात केली खरी परंतु त्यांना त्याचा संवेग राखता आला नाही. पश्चिम पाकिस्तानातून पाकिस्तानी लष्कराने भारतात अनेक ठिकाणी जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्‍न केला, परंतु भारतीय सेनेपुढे त्याचे काही एक चालले नाही. त्यातील एका पुढे प्रसिद्ध झालेल्या लोंगेवालाच्या लढाईत त्यांना जबरदस्त नुकसान सहन करावे लागले. केवळ १२० भारतीय सैनिकांनी २,००० पेक्षाही अधिक सैन्य असलेल्या चिलखती ब्रिगेडचा पहाटेपर्यंत टिच्चून सामना केला. सकाळ होताच भारतीय हवाई हल्यात पाकिस्तानी चिलखती (रणगाडा) तुकडीचे जबरदस्त नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले. अशा रीतीने पाकिस्तानी सेनेला पश्चिम सीमेकडे भारतीय मोर्चे विस्कळीत करण्यात अपयश आले. याउलट भारतीय सेनेने आक्रमक भूमिका घेऊन पाकिस्तानच्या सीमेलगतचा एकूण १४,००० चौ.किमी इतका मोठा भूभाग काबीज केला. हा सर्व भाग नंतर सिमला कराराअंतर्गत पाकिस्तानला परत करण्यात आला.

भारतीय वायुसेनेने या युद्धात जबरदस्त कामगिरी नोंदवली. ऑपरेशन पायथॉन या नावाखाली भारतीय नौदल व हवाईदलाने अमेरिकन पद्धतीप्रमाणे विमानवाहक युद्धनौकांचा वापर करून पूर्व पाकिस्तानात चितगाव येथील पाकिस्तानी विमानतळ उद्ध्वस्त केला. या युद्धात भारताने हवाई दलाच्या विमानांची एकूण ४,००० उड्डाणे केली. त्यांना पाकिस्तानी हवाईदलाकडून फारसा प्रतिकार झाला नाही. पश्चिमेकडे भारतीय नौदलाने कराची बंदराची कोंडी केली व त्याबरोबरच दोन पाकिस्तानी विनाशिका बुडवल्या.

भारतीय पायदळाने अपेक्षेपेक्षाही अधिक वेगाने पूर्व पाकिस्तानमध्ये वाटचाल केली. शत्रूचे कच्चे दुवे हेरत व मोठ्या प्रतिकार शक्य असलेल्या ठिकाणी वळसा घालून भारतीय सेनेने पुढे वाटचाल केली. यामध्ये पाकिस्तानला खूप नुकसान सहन करावे लागले. पंधरवड्याच्या आतच भारतीय सेनेने डाक्का शहर काबीज केले. ९०,०००हून अधिक पाकिस्तानी सैनिक युद्धबंदी झाले. डिसेंबर १६ रोजी पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी सेना शरण आली. दुसऱ्या दिवशी पाकिस्तान सरकारनेही शरणागती पत्करली.

अमेरिकन व सोव्हिएट हस्तक्षेप

[संपादन]

अमेरिका पहिल्यापासूनच पाकिस्तानचा मित्रदेश होता व भारताने सोविएत संघाशी मैत्रीचा करार केल्याने भारत आता त्याच्या शत्रुपक्षात गेला. भारताने जर पाकिस्तानवर विजय मिळवला व पाकिस्तानवर कब्जा मिळवला तर अमेरिकेचा दक्षिण अशियामध्ये प्रभाव कमी होऊन सोव्हिएट प्रभाव वाढेल असा कयास होता. म्हणून अमेरिकेने पाकिस्तानला सर्व आघाड्यांवर मदत केली. अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीला यु.एस.एस. एंटरप्राईझ ही विमानवाहू नौका बंगालच्या उपसागरात पाठवली. रशियानेही दोन युद्धनौका भारताच्या मदतीला व्हलाडिओस्टॉकयेथून पाठवल्या व अमेरिका अण्वस्त्रांची चाल चालवणार नाही ही काळजी घेतली. भारतानेदेखील अमेरिकेच्या भावना लक्षात घेऊन पश्चिम पाकिस्तानात फारसा रस दाखवला नाही. सोव्हिएट संघाने बांगलादेशी स्वातंत्र्यलढ्याला मान्यता देऊन एक प्रकारे भारतीय आक्रमणाला मान्यता दिली.

परिणाम

[संपादन]

भारताने या युद्धात निर्णायक विजय मिळवला. पाकिस्तानच्या वतीने लेफ्टनंट जनरल ए.के. नियाझी यांनी शरणगतिपत्रावर सही केली. भारताने लगेचच बांगलादेशच्या स्वातंत्र्याची घोषणा केली व जगाच्या नकाशावर बांगलादेश हा नवीन देश उदयास आला. हा पराभव पाकिस्तानला चटका लावून गेला व भारताने आमच्या देशाचे दोन तुकडे केले अशी पाकिस्तानी जनमानसात अजूनही भावना आहे. याह्याखान यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मुजिबूर रहमान यांची मुक्तता करण्यात आली. जानेवारी १० १९७२ रोजी मुजिबूर रहमान परत बांगलादेशात आले.

भारताचे जवळपास ४ हजार सैनिक या युद्धात कामी आले. पाकिस्तानच्या मृत सैनिकांची संख्या आजही निश्चित नाही. भारताने पाकिस्तानचे ९० हजाराहून अधिक सैनिक व समर्थक युद्धबंदी बनवले. या युद्धात मानवतेला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना घडल्या. पाकिस्तानने केलेले मानवी शिरकाण हे उपखंडातील आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक मानले जाते पाकिस्तानी सेनेने अंदाजे २० ते ३० लाख लोक सामुहिक संहारात मारले असण्याची शक्यता आहे. यात मुख्यत्वे बांगलादेशातील हिंदूंना मारण्यात आले.

भारतात मोठ्या संख्येने तिकडील लोक सीमा ओलांडून भारतात आश्रयास आले. शरणार्थी कॅम्प आणि इतर राज्यात पसरलेल्या बांगलादेशी नागरिकांमुळे भारतात रोगराई देखील पसरली. एकंदरीत परिस्थितीमुळे भारतावर आर्थिक ताण पडू लागला. हा आर्थिक ताण कमी करण्यासाठी तत्कालीन भारत सरकारने आपले बजेट २१९२ कोटी वरून २८३९ कोटी वर नेले. याकरिता आर.आर.टी. (रिफ्यूजी रिलीफ टॅक्स) देखील लागू केला. याच सोबत पाच आणि दहा पैशांची पोस्टची तिकिटे देखील मोठ्या प्रमाणात छापण्यात आली.[]

शरणार्थी सहायता टपाल तिकीट
शरणार्थी सहायता टपाल तिकीट
शरणार्थी सहायता टपाल तिकीट

युद्धातील मुख्य लढाया

[संपादन]

पुस्तके

[संपादन]

बांगला देशच्या या स्वातंत्र्यलढ्यावर व इ.स. १९७१ च्या भारत-पाकिस्तानमधील युद्धावर अनेक पुस्तके लिहिली गेली. ती अशी :-

  • असा तोडला पाकिस्तान १९७१ - बांगलादेश मुक्तिसंग्राम (लेखक : शशिकांत रा. मांडके)
  • कॅप्टन सुरेंद्र ज. सुर्वे यांनी लिहिलेले ’...आणि तोफा धडाडल्या’ हे मराठी पुस्तक
  • १९७१ची रोमांचक युद्धगाथा (लेखक - सुरेंद्रनाथ निफाडकर)

हेही पाहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c "1971 में शरणार्थियों से बढ़ा था भारत का बजट, डाक टिकटों से इंदिरा गांधी ने जुटाए थे पैसे". 2019-12-12 रोजी मूळ पानापासून संग्रहित.

बाह्य दुवे

[संपादन]