Jump to content

पतित पावन मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पतित पावन मंदिर[] हे रत्‍नागिरी, महाराष्ट्र येथे उभारलेले असून ते अस्पृश्यांना प्रवेश देणारे भारतातले पहिले मंदिर आहे. पतित पावन या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे समाजाकडून अव्हेरल्या गेलेल्या समाजाला स्वीकारून शुद्ध करून घेणे होय. हे मंदिर १९३१ मध्ये भागोजी शेठ कीर यांनी स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या सांगण्यावरून बांधले.[ संदर्भ हवा ] या देवळामध्ये मुख्य देवता म्हणून लक्ष्मी नारायणाची मूर्ती आहे.


पार्श्वभूमी :

जातिव्यवस्था ही भारतीय समाजामध्ये खोलवर रुजलेली व्यवस्था आहे आणि त्यामुळे भारतीय समाजाचे खूप नुकसान झालेले आहे हे स्वा. सावरकरांनी ओळखले व त्यामुळे जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांनी रत्‍नागिरीमध्ये स्थानबद्धतेमध्ये असताना ( १९२४ ते    ) वेगवेगळ्या प्रकारे काम केले.


विठ्ठल मंदिर सत्याग्रह :

रत्‍नागिरीतील विठ्ठल मंदिर पुरातन आहे. राजस्थानातून आलेल्या गुजर कुटुंबीयांनी हे मंदिर बांधले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पतितपावन मंदिर उभारण्यापूर्वी जनसामान्यांना या मंदिरात प्रवेश मिळावा, म्हणून लढा दिला होता. या संघर्षामुळे बहुजन समाजाच्या नागरिकांना सभामंडपापर्यंत प्रवेश देण्यात आला होता. विठ्ठल मंदिरातील सत्याग्रहाचा अनुभव लक्षात घेऊन सामाजिक समतेचा उद्घोष करण्यासाठी स्वतंत्र मंदिर बांधण्याचा निश्चय सावरकरांनी केला.


श्री भागोजी कीर :

श्री भागोजी शेठ कीर हे भंडारी समाजातील एक सधन गृहस्थ. ते शिवभक्त होते आणि त्यांना सामान्य मंदिरात प्रवेश नसल्याने त्यांनी भागेश्वर मंदिर नावाचे खासगी शिवमंदिर स्वतःसाठी बांधून घेतले होते हे त्यांनी सावरकरांना सांगितले. सावरकरांनी कीरांना उपदेश केला – आपण धनवान, स्वतंत्र देऊळ बांधलेत, हे महार निर्धन, त्यांना देव नाही, देवालय नाही, देवदर्शन नाही. त्यांच्यावरचा अन्याय दूर व्हावा म्हणून सर्व हिंदू लोकांकरिता एक स्वतंत्र मंदिर आपण बांधावे. कीरांनी ही सूचना मान्य केली. व त्यानुसार तीन लाख रुपये खर्च करून श्री पतित पावन मंदिराची उभारणी करण्यात आली.  


उद्घाटन प्रसंग :

२२ फेब्रुवारी १९३१ या दिवशी पतित पावन मंदिराचे उद्घाटन करायचे असे ठरले. या मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा भागोजी शेठ कीरांच्या म्हणजेच जन्माने शूद्र अशा व्यक्तीच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने करायची असे ठरले आणि त्यासाठी काशीहून पंडितांना बोलवण्यात आले. आयत्या वेळेला शूद्राला वेदोक्ताचा अधिकार नाही त्यामुळे विधी पुराणोक्त पद्धतीने करू असं सांगून काशीच्या ब्राम्हणांनी अडचणीचा प्रसंग उभा केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे मान्य नव्हते. मुहूर्त टळेल त्यामुळे पुराणोक्त पद्धतीने विधी करू असा प्रस्ताव कीर व शंकराचार्य कुर्तकोटी यांनी मांडला. तो अमान्य करत स्वातंत्र्यवीर म्हणाले –

“शेटजी, देऊळ आपले, धनी आपण, त्यामुळे समारंभ आपण करालच. पण प्रत्येक हिंदूस वेदोक्ताचा अधिकार आहे. मग तो महार असो की महाराज. या तत्त्वास आपण सोडाल तर मलाही सोडल्यासारखे होईल. जुनी देवळे थोडी नाहीत. नवीन तत्त्वाचे अधिष्ठान म्हणून हे नवीन देऊळ हवे होते. ते साधत नसेल तर आपण मलाही सोडावे. पण आपण जर तत्त्वास सोडणार नसाल तर ह्याही परिस्थितीत समारंभ मी पार पाडीन. पण आमच्या नव्या अखिल हिंदू स्मृतीच्या आधारे.”

काशीच्या ब्राम्हणांना उद्देशून सावरकर म्हणाले –

“तुम्ही मंडळींनी वेदोक्त विधी करू म्हणून मान्य केल्याचे पत्री आम्हाला कळविले. मी माझ्या पत्रात वेदोक्ताचा अर्थ स्पष्ट कळवला होता. त्यावर आक्षेप न घेता आपण काशीसारख्या अंतरावरून इथं आलात. मला जन्माने ब्राम्हण तो पुरोहित हे तत्त्वही मान्य नाही. पण कीर शेठजींची इच्छा ब्राम्हण हवेत म्हणून अडलो. पण आपण जर आता नाकाराल तर आजचा मुहूर्त टळून कार्य रद्द होईल असे जर कोणी अडवू म्हणत असेल तर ते कदापि घडणार नाही… हा जो इथं मराठा, महार, चांभार, भंडारी, ब्राम्हण, भंगी अखिल हिंदुसमाज दाटलेला आहे त्या शतावधी धर्मबांधवांसह आम्ही ही देवमूर्ती अनंत हस्ती उचलून जय देवा असे गर्जून स्थापणार. हाच आमचा विधी! हिंदू धर्म की जय असे हजारो कंठांतून निघणारे जयघोष हाच आमचा वेदघोष आणि ‘भावो ही विद्यते देव:’ हाच आमचा शास्त्राधार. पण तरीही काशीच्या पंडितांनी हे कार्य पार पाडले नाही. मसूरकर महाराजांच्या आश्रमातील वेदशास्त्र संपन्न गणेश शास्त्री मोडक यांनी वेदोक्त विधीने यथाशास्त्र पूजा सांगून कीरांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

संदर्भ – स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र – धनंजय कीर, सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग – शेषराव मोरे, जात्युच्छेदक निबंध – स्वातंत्र्यवीर सावरकर


प्रतिक्रिया : पतित पावन मंदिराच्या उभारणीनंतर अनेक कर्मठ लोकांकडून सावरकरांना विरोध सहन करावा लागला पण अनेक पुरोगामी नेत्यांनी या प्रकल्पाचे स्वागत केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सावरकरांना कळवले की , “सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करीत आहात त्याविषयी अनुकूल अभिप्राय देण्याची संधी घेत आहे. जर अस्पृश्य वर्ग हिंदू समाजाचा अभिन्न भाग व्हायचा असेल तर नुसती अस्पृश्यता जाऊन भागणार नाही तर चातुर्वर्ण्याचे उच्चाटन झाले पाहिजे. ज्या थोड्या लोकांना याची आवश्यकता पटली आहे त्यापैकी एक आपण आहात हे सांगावयास मला आनंद वाटतो.”

संदर्भ : पुस्तक : स्वातंत्र्यवीर सावरकर लेखक : धनंजय कीर

सावरकर स्मारक रत्‍नागिरी[]

याच मंदिराच्या परिसरात सावरकरांचे प्रेरणादायी स्मारक उभारण्यात आले आहे. स्मारकाच्या पहिल्या मजल्यावर गाथा बलिदानाची हे प्रदर्शन असून १८५७ च्या स्वातंत्र्यसमरापासून ते स्वातंत्र्याच्या काळापर्यंतचे देशभक्त, क्रांतिकारक, हुतात्मे यांचा तेजस्वी इतिहास इथे मांडण्यात आला आहे. वीर सावरकरांच्या ज्या वस्तूंनी इतिहास घडवला ती सावरकरांनी लंडनहून पाठवलेली दोन पिस्तुले, त्यांची काठी, जंबिया, त्यांचा चष्मा, अशा अनेक गोष्टी तेथे जपून ठेवण्यात आल्या आहेत. मार्सेलिस बंदरावर ज्या बोटीतून सावरकरांनी समुद्रात ऐतिहासिक उडी घेतली, त्या मोरिया बोटीची प्रतिकृती तेथे ठेवली आहे. तळमजल्यावरील सभागृहात माहितीपटांद्वारे सर्वांना थोर नररत्ने व इतरही अनेक गोष्टींची माहिती देण्यात येते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Patit Pavan Mandir, Ratnagiri, Maharashtra". ApniSanskriti - Back to veda (इंग्रजी भाषेत). 2020-05-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-06-10 रोजी पाहिले.
  2. ^ Smith, Walter (2003). "Ratnagiri". Oxford Art Online. Oxford University Press. ISBN 978-1-884446-05-4.