Jump to content

आपटे वाचन मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवीन इमारत
नवीन इमारत

आपटे वाचन मंदिर हे महाराष्ट्रातील इचलकरंजी शहरातल्या राजवाडा चौकात असलेले ग्रंथालय आहे. इचलकरंजीचे संस्थानिक गोविंदराव आबासाहेब घोरपडे सरकार यांच्या प्रेरणेने गावातील तत्कालीन प्रसिद्ध वकील रामभाऊ आपटे यांनी सन १८७०मध्ये नेटिव्ह जनरल लायब्ररी सुरू केली. सुरुवातीस मगदूम पीर देवस्थानाच्या नगारखान्यात असलेले हे ग्रंथालय नंतर नवीन वास्तूत आले. नवीन वास्तूसाठी इचलकरंजीचे तत्कालीन जहागीरदार नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी मदत केली. १९१० साली त्याचे नाव आपटे वाचन मंदिर झाले.[]

स्वातंत्र्यानंतर

[संपादन]

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इचलकरंजी संस्थानाच्या विलीनीकरणानंतर १ मार्च १९४९ पासून ग्रंथालयाची मालकी महाराष्ट्र सरकारकडे आली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर वृत्तपत्र वाचन विभाग होता. तर तळमजल्यावरची जागा वाचनालय आणि पोस्ट ऑफिस वापरत असत. ही जागा अपुरी पडू लागल्यामुळे शासनाकडे वारंवार पोस्ट ऑफिसची जागा रिकामी करून देण्याबद्दल विनंत्या करण्यात आल्या.

शताब्दी समारंभ

[संपादन]

शताब्दी वर्षाचा भाग म्हणून मे १९७० मध्ये वसंत व्याख्यानमाला सुरू करण्यात आली. आजही ही व्याख्यानमाला अविरतपणे सुरू आहे. बा.भ.बोरकर, सेतू माधवराव पगडी, पु.भा.भावे, गो.नी.दांडेकर, रमेश मंत्री, गंगाधर गाडगीळ, राम शेवाळकर, मधु मंगेश कर्णिक, वसंत बापट अशा अनेक साहित्यिकांनी या व्याखानमालेत हजेरी लावली. १९७८ मध्ये शासनाने इमारतीची मालकी संस्थेला दिली. त्यानंतर नवीन इमारतीचे काम सुरू करण्यात आले.

नवीन इमारत

[संपादन]

७ एप्रिल १९८५ रोजी बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांच्या हस्ते नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. नवीन इमारतीत तळमजल्यावर वृत्तपत्र वाचन विभाग आहे. पहिल्या मजल्यावर पुस्तके देवघेव विभाग, संदर्भ ग्रंथ विभाग, बाल विभाग, छोटा हॉल आहेत. पहिल्या मजल्यावर अनेक दुर्मिळ चित्रे असलेले कलादालन आहे, त्यातील काही चित्रे सुमारे १०० वर्षे जुनी आहेत. दुसऱ्या मजल्यावर एक मोठे सभागृह आहे.

अन्य सोयी

[संपादन]

आपटे वाचन मंदिर संपूर्णतः संगणकीकृत आहे. संदर्भ ग्रंथालय व अभ्यासिका नाममात्र शुल्कात उपलब्ध आहेत. झेरॉक्सची सोय असून मुक्त व मोफत बालविभाग आहे.

ग्रंथसंपदा

[संपादन]

वाचनालयात सुमारे ८३,००० पुस्तके आहेत. ग्रंथालयात सुमारे १०० दुर्मिळ ग्रंथ आहेत. त्यांतील काही ग्रंथ इचलकरंजी संस्थानाच्या आणि घोरपडे घराण्याच्या इतिहासासंबंधी आहेत.

वाचनालयातील काही जुन्या आणि दुर्मिळ पुस्तकांची यादी

[संपादन]
  • इचलकरंजी संस्थानचा इतिहास, वासुदेव वामन खरे, १९१३, आर्यभूषण छापखाना,पुणे - इचलकरंजी संस्थानाच्या इतिहासाबद्दलचे पुस्तक

इचलकरंजीचे जहागीरदार श्री.नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी लिहिलेली खालील पुस्तके वाचनालयाच्या संदर्भ विभागात उपलब्ध आहेत.

  • ब्रिटनने हिंदुस्थानासाठी काय केले आहे? --- श्री. नारायणराव बाबासाहेब घोरपडे
  • श्रीमंत नामदार नारायणराव बाबासाहेब यांनी तारीख २० जून १९०८ रोजीच्या कायदेकौन्सिलच्या बैठकीत केलेले भाषण आणि विचारलेले प्रश्न आणि त्यास मिळालेली उत्तरे
  • प.लो.मिस व्हायओलेट क्लार्क यांच्या Leaves पुस्तकाचे भाषांतर -नारायणराव बाबासाहेब घोरपडे

सभासद

[संपादन]

सुमारे ५६२० सभासद वाचनालयाचा लाभ घेतात.

उपक्रम

[संपादन]
  • वार्षिक वसंत व्याख्यानमाला 'मे' महिन्यात आयोजित करण्यात येते.[]
  • आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा (लोकमान्य टिळक पुण्यतिथीच्या दिवशी - १ ऑगस्ट रोजी) आयोजित करण्यात येते.
  • आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा (डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथीला) आयोजित करण्यात येते.
  • प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाचे संस्थापक रामभाऊ आपटे यांच्या पुण्यतिथीला कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात येते.
  • शासनाची योजना 'एक शाळा वाचनालयासाठी दत्तक घेणे' या अंतर्गत माधव विद्या मंदिर ही शाळा दत्तक घेतली आहे.

वाचनालयाकडून दिले जाणारे पुरस्कार

[संपादन]
  • कवयित्री इंदिरा संत यांनी दिलेल्या देणगीतून सन १९९७ पासून दरवर्षी उत्कृष्ट काव्यसंग्रहाला वाचनालयाच्या वतीने 'इंदिरा संत' पुरस्कार देण्यात येतो.[]
  • आशाताई सौंदत्तीकर पुरस्कार, सर्वोत्कृष्ट कथासंग्रहासाठी
  • १९७५ साली झालेल्या साहित्य संमेलनातील उरलेल्या निधीमधून ‘इचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट पुरस्कार’, सर्वोत्कृष्ट मराठी गद्यासाठी
  • पार्वतीबाई तेलसिंगे पुरस्कार, सर्वोत्कृष्ट बाल साहित्यासाठी
  • महादेवराव जाधव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मराठी भाषांतरासाठी
  • वि.म.शेळके पुरस्कार, सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठी
  • शामराव भिडे पुरस्कार, सर्वोत्कृष्ट ललित साहित्यासाठी
  • स्थानिक साहित्यिकासाठी पुरस्कार

वाचनालयाला मिळालेले पुरस्कार

[संपादन]
  • १९९०-९१ मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, 'अ' वर्ग वाचनालयांमधील सर्वोत्कृष्ट वाचनालयासाठी
  • १९९७ मध्ये कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचा एम.जी. पाटकर पुरस्कार
  • २००० मध्ये रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी आणि दगडूशेठ मर्दा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने १९००-२००० ह्या शंभर वर्षातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार
  • २००१ मध्ये लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी पुरस्कार
  • २००६ मध्ये शंभर वर्षे वाचनालय चळवळीत केलेल्या कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार

चित्रदालन

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ author/lokmat-news-network. "इचलकरंजीची साहित्य संपदा आपटे वाचन मंदिर". Lokmat. 2020-01-02 रोजी पाहिले.
  2. ^ "आपटे वाचन मंद‌िराची शनिवारपासून वसंत व्याख्यानमाला". Maharashtra Times. 2019-12-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-04 रोजी पाहिले.
  3. ^ "रवींद्र लाखे यांना इंदिरा संत उत्कृष्ट काव्य संग्रह पुरस्कार | eSakal". www.esakal.com. 2019-12-04 रोजी पाहिले.