जावजी दादाजी चौधरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जावजी दादाजी चौधरी
जावजी दादाजी चौधरी

जावजी दादाजी चौधरी (जन्म १८३९ - मृत्यू ५ एप्रिल १८९२ ) हे निर्णयसागर ह्या ख्यातनाम मुद्रणालयाचे मालक व मुद्राक्षरांचे (टंकांचे) निर्माते होते. देवनागरी मुद्रणाच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान वाखाणण्यात आले आहे.

पूर्ववृत्त[संपादन]

जावजी ह्यांचे पणजोबा तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील विढे ह्या गावचे रहिवासी होते. शेती करून निर्वाह करणे शक्य वाटत नसल्याने ते मुंबईत उमरखाडी येथे स्थायिक होऊन नोकरी करू लागले. जावजी ह्यांचे वडील दादाजी हे एका पेढीवर तगादेदार शिपायाची नोकरी करत असत.[१]

शिक्षण व नोकरी[संपादन]

जावजी ह्यांचे नाव शाळेत घालण्यात आले होते. पण त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षी शाळा सोडल्यामुळे अक्षर-ओळखीपुरतेच शिक्षण त्यांना लाभले.[२]

जावजी ह्यांनी थॉमस ग्रॅहॅम ह्यांच्या छापखान्यात मुद्रिका (टाईप) घासण्याची नोकरी पत्करली. सुमारे दहा वर्षे त्यांनी ही नोकरी केली. पुढे थॉमस ग्रॅहॅम ह्यांनी आपला छापखाना टाइम्स ऑफ इंडियाच्या मुद्रणालयाला वीस हजार रुपयांना विकला.[३] तेव्हा जावजी ह्यांना तेथे टंक खात्यात काम मिळाले. तिथे त्यांना टंक तयार करण्याची कला शिकायला मिळाली. १८६२ साली इंदुप्रकाश ह्या मुद्रणालयाची स्थापना झाली. तिथे टंकशाळा (टाईप फाउंड्री) सुरू करण्यासाठी माहीतगार माणसाची आवश्यकता असल्याने जावजी ह्यांना नेमण्यात आले. ह्या ठिकाणी दोन वर्षे काम केल्यानंतर जावजी ह्यांनी ओरिएंटल छापखान्यात टंक तयार करण्याचे काम स्वीकारले.[४]पुढे त्यांनी राणूजी रावजी अरू ह्यांच्या सहकार्याने स्वतंत्र उद्योग सुरू केला.

निर्णयसागर मुद्रणालयाची स्थापना[संपादन]

१८६९ साली जावजी दादाजी ह्यांनी निर्णयसागर मुद्रणालयाची स्थापना केली. त्या छापखान्यात वसई येथील नामांकित ज्योतिषी चिंतामणी पुरुषोत्तमशास्त्री पुरंदरे ह्यांच्या सहकार्याने शके १७९१ (इ. स. १८६९-१८७०) ह्या वर्षाचे निर्णयसागर पंचांग प्रकाशित झाले.[५] मराठी व संस्कृत ह्या भाषांतील धार्मिक साहित्य शुद्ध व सुंदर स्वरूपात प्रकाशित करण्याचा उपक्रम निर्णयसागर मुद्रणालयाने हाती घेतला. अश्या पोथ्यांची पाठनिश्चिती करणे, त्यांतील मजकुरांना टिपा जोडणे ह्यासाठी निर्णयसागर मुद्रणालयात अनेक विद्वानांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या.[६] डॉ. अण्णा मोरेश्वर कुंटे, शंकर पांडुरंग पंडित, काशिनाथ पांडुरंग परब, नारायण विष्णू बापट, गोविंद शंकरशास्त्री बापट, पं. दुर्गाप्रसाद, वासुदेवशास्त्री पणशीकर इ. विद्वान प्रामुख्याने संस्कृत ग्रंथांच्या संपादनाचे काम पाहत.[७]

काव्यमाला मासिक व ग्रंथमाला[संपादन]

पंडित दुर्गाप्रसाद ह्यांनी परिश्रमपूर्वक संस्कृत साहित्य मिळवले होते. त्यांतील निवडक साहित्य संपादित करून मासिक स्वरूपात प्रकाशित करण्याच्या हेतूने निर्णयसागरने 'काव्यमाला' नावाचे मासिक जानेवारी १८८६पासून सुरू केले.[८] ह्या मासिकातून प्रकाशित झालेले साहित्य पुढे ९५ ग्रंथांच्या मालेच्या स्वरूपात प्रकाशित करण्यात आले.[९]


काव्यसंग्रह[संपादन]

मराठीतील संतपंतांच्या वाङ्मयाचे प्रकाशन करण्याच्या हेतूने जावजी दादाजी ह्यांनी 'काव्यसंग्रह' हे मासिक जनार्दन बाळाजी मोडक ह्यांच्या संपादकत्वाखाली १८९०मध्ये सुरू केले. ह्या मासिकातून मोरोपंत, वामन पंडित, मुक्तेश्वर, आनंदतनय, अमृतराय ह्यांचे काव्य प्रकाशित होऊ लागले.[१०] काव्यसंग्रह सुरू झाल्यावर ३ महिन्यांतच जनार्दन बाळाजी मोडक ह्यांचे निधन झाल्याने त्यानंतर काव्यसंग्रहाचे संपादकत्व वामन दाजी ओक ह्यांच्याकडे आले.[११] ओकांच्या मृत्यूनंतर नारायण चिंतामण केळकर, बाळकृष्ण अनंत भिडे, दामोदरपंत ओक आदींनी ह्या मासिकाचे संपादकत्व भूषवले. हे मासिक इ.स. १९०९पर्यंत चालू होते. संतपंत वाङ्मयाव्यतिरिक्त ऐतिहासिक व्यक्तींची दुर्मिळ चित्रे, वस्तूंची चित्रे व रेखाटने ह्यांचेही प्रकाशनही ह्या मासिकातून होत असे.[१२]

देवनागरी टंक[संपादन]

देवनागरी लिपीतील मुद्रणाच्या इतिहासात जावजी दादाजी ह्यांच्या निर्णयसागर मुद्रणालयाचे आणि टंकशाळेचे विशेष योगदान आहे अशी मान्यता आहे. जावजी दादाजी आणि त्यांचे सहकारी राणूजी रावजी अरू ह्यांनी देवनागरी लिपीचे सुंदर आणि वाचनीय टंक निर्माण केले.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

संदर्भसूची[संपादन]

  • कुलकर्णी, पुरुषोत्तम बाळकृष्ण. निर्णयसागरची अक्षर-साधना : शेठ जावजी दादाजी ह्यांचें चरित्र.