जनार्दन बाळाजी मोडक
जनार्दन बाळाजी मोडक (३१ डिसेंबर, इ.स. १८४५:पंचनदी, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र - १९ मार्च, इ.स. १८९२:ठाणे, महाराष्ट्र) हे मराठी आणि संस्कृत काव्याचे चिकित्सक व संग्राहक होते. पुणे येथे बी.ए.च्या वर्गात असतानाच इ.स. १८७०पासून ते मेजर थॉमस कॅन्डी यांच्या हाताखाली भाषांतरकार म्हणून नोकरीला लागले. नंतर ते ठाणे शहरातील एका शाळेत शिक्षक झाले. महाराष्ट्र सारस्वतकार विनायक लक्ष्मण भावे यांच्यावर मोडकांचा मोठा प्रभाव होता.

विविधज्ञानविस्तार (स्थापना-इ.स. १८६८) या नियतकालिकाशी मोडक यांचा संबंध १८७४ ते १८९० पर्यंत आला. या काळात मोडकांनी ज्योतिष व गणिताविषयी अनेक लेख मासिकात लिहिले. भास्कराचार्यांच्या लीलावतीचे भाषांतरही प्रसिद्ध केले. या शिवाय संस्कृत कवींची चरित्रे, संस्कृत काव्यांतील सौंदर्य, आणि पुस्तकपरीक्षणे आदी विषयांवर त्यांनी विविधज्ञानविस्तारात लेखन केले. याखेरीज त्यांचे मराठी काव्यासंबंधी लेख ‘निबंधमाला’, ‘निबंधचंद्रिका’ ‘शालापत्रक’, ठाण्याचे ‘अरुणोदय’, मुंबईचे ‘इंदुप्रकाश’ आदी मासिकांतून प्रसिद्ध झाले. मोडक हे ‘काव्येतिहाससंग्रह’ व नंतर ‘काव्यसंग्रह’ या मासिकांचे संपादक झाले.
काव्येतिहास मासिक
[संपादन]प्राचीन मराठी हस्तलिखित काव्ये, जुन्या बखरी, जुनी ऐतिहासिक कागदपत्रे हे अप्रसिद्ध साहित्य प्रकाशात आणण्यासाठी जनार्दन बाळाजी मोडक यांनी काशिनाथ नारायण साने यांच्या सोबत इ.स. १८७८मध्ये ‘काव्येतिहास’ नावाचे मासिक सुरू केले. त्यांच्या या कार्यात त्यांना विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि शंकर तुकाराम शाळिग्राम आदींचे साहाय्य झाले. पुढे विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी ‘काव्येतिहास’शी संबंध तोडल्यामुळे, जनार्दन बाळाजी मोडक त्या मासिकातील संस्कृत काव्यविभागाचे कामही पाहू लागले. हे मासिक १८८८पर्यंत चालले. त्यात मोडकांनी संपादन करून प्रकाशित केलेली काव्ये आणि लेख :
- मुक्तेश्वरकृत महाभारत-वनपर्व (१८७९)
- वामनपंडितकृत प्रकरणे (१८८२)
- रामदासस्वामीकृत रामायण व इतर प्रकरणे (१८८२)
- मोरोपंतांचे कृष्णविजय-पूर्वार्ध (१८९१)
- अनेक-कवी-कृत-कविता (१८८३) (पुस्तक वाचनासाठी उपलब्ध)

जनार्दन बाळाजी मोडक यांचे अन्य साहित्य
[संपादन]- जगाच्या इतिहासाचे सामान्य निरूपण (१८७२)
- भास्कराचार्य व तत्कृत ज्योतिष (१८७७)
- वेदांग ज्योतिषाचे मराठी भाषांतर (१८८५)
जनार्दन बाळाजी मोडक यांच्यावरील लेख
[संपादन]हरी माधव पंडित लिखित मोडक यांचे चरित्र
निधन
[संपादन]मोडक यांचे वयाच्या सत्तेचाळिसाव्या वर्षी ठाण्यात निधन झाले.