तेजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तेजी(Prosperity) या अवस्थेत अर्थव्यवस्थेतील गुंतवणूक, रोजगार, उत्पादन, उत्पन्न,किमती, उपभोग, भांडवल पुरवठा इत्यादी सर्व घटकात कमाल वाढ होते. संयोजक अधिक नफा प्राप्त करण्यासाठी उत्पादनवाढीचे प्रयत्न सुरू करतात. यामुळे भांडवल, कच्चा माल, श्रम व इतर उत्पादन साधनांची मागणी वाढते. खंड, वेतन, व्याज आदींचे दर वाढतात. कच्च्या मालाचे भाव वाढतात. उत्पादन घटकांचे उत्पन्न वाढल्याने त्यांची क्रयशक्तीत वाढ होते. विविध वस्तूची व सेवांची  मागणी वाढते. यामुळे त्यांच्या किमती वाढतात. किमती व  उत्पादन खर्च यांतील तफावत वाढल्याने संयोजकाचा नफा वाढतो. यामुळे ते जास्त उत्पादन वाढवितात. परिणामी,उत्पादन व रोजगारात वाढ होते. रोजगार संधी व उत्पन्न वाढल्याने लोकांमध्ये उत्साह असतो. उत्पादक वर्गामध्ये आशावाद निर्माण होतो. उत्पादन वाढीसाठी बँकाही कर्ज पुरवठा करण्यास अनुकूल होतात. बँकांचे कर्ज व्यवहार वाढून त्यांची पत निर्मिती वाढते. भाग बाजार, भांडवल बाजार आणि रोके बाजारातील गुंतवणूकही वाढते. यामुळे तेजीचे वातावरण निर्माण होते. तेजीच्या काळात आर्थिक व्यवहारांचा विस्तार होतो. तेजी मध्ये व्यापारी नफा मिळवण्यासाठी मालाची साठेबाजी करतात. देशातील साधन सामग्रीचा पर्याप्त वापर होतो.  यामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढते. बेकरी घटते. आर्थिक विस्तार स्वयंगतीने घडवून आणणारी तेजीची ही अवस्था चिरकाल टिकणारी नसते.