एक्सप्लोरिंग मॅस्क्युलीनिटी (पुस्तक)
एक्सप्लोरिंग मॅस्क्युलीनिटी[१] हे पुस्तक कमला भसीन[२] द्वारे लिखित असून विमेन अनलिमिटेड द्वारे २००४ मध्ये प्रकाशित केले गेले.
प्रस्तावना
[संपादन]या पुस्तिकेत पुरुषत्व या संकल्पनेचे अर्थ व त्याचे लिंगभावात्मक संबंधांसाठी, सामाजिक तसेच राजकीय व आर्थिक व्यवस्थेसाठी व धार्मिक व कौटुंबिक विचारधारेसाठी असणारे महत्त्व उलगडलेले आहे. येथे लेखिका वर्चस्ववादी पितृसत्ता, लष्करी पितृसत्ता, कामगार व अभिजनवर्गातील पितृसत्तेवर भाष्य करतात. पौरुषत्ववाद व लष्करीकरण; जातीयवाद, मूलतत्त्ववाद व पौरुषत्ववाद तसेच भांडवलशाही व पौरुषत्ववादामधील संबंधांचे परीक्षण करतात. नकारात्मक पौरुषत्व व स्त्रीत्वाचे, स्त्री व पुरुषांवरील होणारे परिणाम त्या अधोरेखित करतात. लिंगभाव संबंध सुधारण्यासाठी पर्याय ही त्या येथे सुचवतात.[३]
पुस्तकातील मजकूर
[संपादन]ही पुस्तिका प्रश्न उत्तराच्या स्वरूपात लिहिलेली आहे. येथे विविध मुलभूत व्याख्या व संबंधित मुद्यांवर चर्चा केलेली आहे.
पुरुषी व पुरुषत्वाची-व्याख्या
[संपादन]येथे लेखिका विविध शब्दकोश, थेसोरसच्या मदतीने पुरुषी व पुरुषत्व या संकल्पनांची व्याख्या मांडतात. ऑक्सफोर्ड या शब्दकोशाप्रमाणे पारंपारिकरित्या पुरुषांशी जोडली गेलेली गुण वैशिष्ट्यांना पुरुषी असे म्हणतात तर पुरुषत्व याचा संबंध जैविकतेशी नसून ठराविक वैशिष्ट्ये व गुणांशी आहे. कोलीन या थेसोरस मध्ये पुरुष, खंबीर, पुरुषासारखा, निर्भीड, ताकतवान, गरम रक्ताचा, मर्दानी, धाडसी, आक्रमक, शूर, कणखर, दृढनिश्चयी हे शब्द पुरुषी यासाठी प्रतिशब्द म्हणून आढळतात. पुरुषत्व याअर्थी समाजाद्वारे पुरुषांना व मुलांना दिलेली एक सामाजिक व्याख्या आहे व समाजाने घडवलेली रचना आहे. स्त्री व पुरुषांपैकी ज्यांच्या मध्ये समाजाने ठरवलेले स्त्रियांचे गुण वैशिष्ट्य आढळतात, त्यांना स्त्रीसुलभ व पुरुषी गुण आढळल्यास पुरुषी असे मानण्यात येते. याचबरोबर त्या असे ही मत मांडतात कि पुरुषत्वाची संकल्पना स्थान व काळानुरूप बदलत असते. पुरुषत्वाची संकल्पना ही काळ व समुदायानुसार बदलत असली तरी ती सर्वठिकाणी सामर्थ्य, सत्ता, नियंत्रण व आक्रमकपानाशी संबंधित आहे. पुरुष व पुरुषत्व हे स्त्री व स्त्रीत्वापेक्षा वरिष्ठ आहे असे पितृसत्ताक विचारधारेची धारणा आहे.
लिंगभाव- व्याख्या
[संपादन]लिंगभाव ही मुला-मुलींना, स्त्री पुरुषांना समाजाने दिलेली सामाजिक सांस्कृतिक परिभाषा आहे. लिंगभाव हे एक सामाजिक रचना असून स्त्री/पुरुष, मुलगी/ मुलगा यांच्यावरील नियम, मुल्य, रूढी व व्यवहाराशी संबंधित असून त्याद्वारे जैविक भिन्नतांना व्यापक अशा सामाजिक व्यवस्थेत रूपांतरीत करतो.
लिंगभाव संबंध- व्याख्या
[संपादन]स्त्री व पुरुष, स्त्री व स्त्री, पुरुष व पुरुष यांच्या मधील लिंगभाव आधारित संबंधाना लिंगभाव संबंध असे म्हणतात. पुरुषसत्ताक विचारधारा व व्यवस्थेमुळे सर्वत्र लिंगभाव संबंध हे असमान व उतरंडीचे आहेत. स्त्रियांना सर्व ठिकाणी दुय्यम समजले जाते त्या भेदभावाला बळी पडतात.
पितृसत्ता – व्याख्या
[संपादन]पितृसत्ता ही अशी एक सामाजिक व वैचारिक व्यवस्था आहे ज्यामध्ये पुरुषांना स्त्रियांपेक्षा वरचढ समजले जाते व साधनांवर व निर्णय प्रक्रियेवर पुरुषांचे नियंत्रण असते. ती एक सामाजिक रचित असून त्याचे स्वरूप, मजकूर व विस्तार हे वेगवेगळ्या संदर्भात व काळात बदलणारे असतात. सर्व सामाजिक संरचनांप्रमाणे पितृसत्तेलाही एक विचारधारा व रचना आहे. सदरची संरचना हे निश्चित करते कि कुटुंब प्रमुख हे पुरुष असतील व कुटुंबाच्या मालमत्तेचे व नावाचे वारसदार पुरुष असतील. पण एकंदरीत सर्व सामाजिक संस्था या पुरुषसत्ताक आहेत.
पौरुषत्व व जैविकता याचा संबंध
[संपादन]पौरुषत्व याचा जैविकतेशी काहीही संबंध नसून पौरुषत्व व स्त्रीत्व हे सामाजिक रचना आहे. पुरुषांची जैविकता किंवा जैव-रसायनशास्त्र हे त्यांना वर्चस्ववादी, आक्रमक किंवा स्पर्धात्मक बनवत नाहीत. पौरुषत्व व स्त्रीत्व यांचा संबंध सत्तेशी असून जैविकतेशी नाही.
अधिसात्तक पुरुषत्व –व्याख्या
[संपादन]अधिसत्तेचा अर्थ वर्चस्व किंवा सर्वसमावेशक नेतृत्व असे आहे. त्याअर्थी अधिसात्तक पुरुषत्वाचा अर्थ वरचढ होणारे पुरुषत्व असा होतो. या प्रकारचे पुरुषत्व हे सत्ता व इतरांवर सत्ता गाजवण्याशी संबंधित आहे व ती शरणागतीची मागणी करते.
पुरुषत्व व हिंसा
[संपादन]पितृसत्ताक समाजात पुरुषांनी केलेल्या हिंसेच समर्थन केले जाते कारण अधिकार, नियंत्रण, सत्ता व नेतृत्व हे पुरुषत्वाच्या खुणा आहेत. पुरुषांना समाज दाता व संरक्षक म्हणून बघतो. या भूमिका बजावण्यासाठी पुरुष घरातील व समाजातील इतर सभासदांना शिस्त लावणे ही आपली जबाबदारी मानतो. शिस्त लावण्यासाठी व इतर प्रश्न सोडवण्यासाठी पुरुष हे हिंसेचा वापर एक साधन म्हणून करतात.
पुरुषत्व व धर्म
[संपादन]लिंगभाव, पुरुषत्व व धर्म यांचा स्पष्ट संबंध आहे. संस्कृतीच्या पातळीवर सर्वसामान्य लोकांची कुटुंब, लग्न, लैंगिकता, याबाबतीतील समजुती घडवण्यात, स्त्री व पुरुषांच्या भूमिका व व्यवहारासंदर्भात नियम ठरवून देण्यात, नवरा व बायकोचे तसेच मुलगी व मुलगा यांचे स्थान ठरवण्यात, त्यांचे हक्क व जबाबदाऱ्या ठरवण्यात धर्म महत्त्वाची भूमिका बजावतो. सद्यकालीन सर्व धर्म हे स्त्रियांना पुरुषांपेक्षा दुय्यम ठरवतात.
पुरुषत्व व लैंगिकता
[संपादन]स्त्री व पुरुषांची लैंगिकता व लैंगिक व्यवहार वेगवेगळ्या प्रकारे मांडण्यात आलेले आहेत. पुरुष हे लैंगिक संबंधांबाबत पुढाकार घेणारे मानले जातात. पुरुषांच्या लैंगिक गरजा, आवडी व नावडी व त्यांच्या समाधानाला महत्त्व दिले जाते. तर स्त्रियांना लैंगिक संबंधाबाबत दुय्यम, निष्क्रिय सहभागी व पुरुषांची गरज व लालसा भागवणारी असे मानले जाते. पुरुषांची लैंगिकता, आक्रमकपणा व हिंसा यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे.
पुरुषत्व व गुन्हे
[संपादन]पुरुषत्व व गुन्हे यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. पुरुषत्वाची धारणा पुरुषांना व मुलांना सशक्त, शारीरिक दृष्ट्या सक्षम, आक्रमक, वर्चस्ववादी होण्यास प्रेरणा देते. ऐन ओकले मांडतात कि गुन्हेगारी व पुरुषत्व या दोघांशी संबंधित क्रिया या बऱ्याच प्रमाणात सारख्या आहेत.
पुरुषत्व व लष्करीकरण
[संपादन]पुरुषत्व व लष्करीकरणाचा जवळचा जुना संबंध आहे. लष्करीकरण ही विचारधारा प्रश्न सोडवण्यासाठी लष्कराची भूमिका मान्य करते व सामाजिक व वैयक्तिक उद्देश साध्य कार्यासाठी हिंसेला मान्यता देते ज्यामुळे आक्रमक पुरुषत्वाला समर्थन मिळते. लष्करीकरण, पितृसत्ता व पौरुषत्व हे एकमेकांशी गुंतलेले असून परस्पर पोषक ठरतात. स्त्रीवाद्यांच्या मते लष्करी विचार व मुल्य हे मूलतः पुरुषी असून स्त्रियांवर पुरुषांचे वर्चस्व असणे यावर विश्वास ठेवते. स्त्रीवादी विश्लेषकांनी हे दाखवून दिलेले आहे कि स्त्रिया पण लष्करी विचाराचा एक भाग होतात. ‘आदर्श सैनिक’ व ‘आदर्श पत्नी’ हे परस्पर पूरक आहेत. युद्धासाठी पुरुष नेतृत्व जन्म देणे हे मातांची देशाप्रतीची जबाबदारी मानली जाते.
सद्यकालीन आर्थिक व्यवस्था, पुरुषी व पुरुषत्व
[संपादन]सद्यकालीन आर्थिक व्यवस्था स्पर्धा, महत्त्वाकांक्षा व यशाचे समर्थन करते व त्याला प्रोत्साहन देते. त्यामुळे भांडवलशाहीतील मूल्य व्यवस्था व पुरुषत्व हे एकमेकांना पूरक दिसते. भांडवलशाही जगात स्पर्धा, व्यक्तिवाद, आक्रमकपणा, आत्म-केंद्रितता. स्वार्थीपणा सक्षमता व विजय याला महत्त्व देते व सहकार्याला परावृत्त करते. या अर्थव्यवस्थेत जैविक पुरुषापेक्षा अधिसात्तक/वर्चस्ववादी पुरुषत्वाला अधिक महत्त्व आहे. जे पुरुष सत्ता मिळवू शकतात व स्वतःच्या प्रगतीसाठी वापरू शकतात त्यांना जास्त महत्त्व मिळालेले आहे. जागतिकीकरणाच्या जगात, पुरुषत्व हे जागतिक बनत चाललं आहे. कोर्पोरेट संस्कृती ही पुरुषांद्वारे व्यापलेली व पुरुषी आहे. यासर्व प्रक्रियेत स्त्रिया या परीघाबाहेर फेकल्या जातात कारण त्यांच्यामध्ये अपेक्षित गुण व भांडवलशाहीत अपेक्षीत गुणांचा मेळ बसत नाही.
संदर्भ सूची
[संपादन]- ^ Bhasin, Kamla (2004). Exploring Masculinity (इंग्रजी भाषेत). Women Unlimited. ISBN 9788188965007.
- ^ "Kamla Bhasin / SANGAT South Asian Feminist Network - South Asia - One Billion Rising Revolution". One Billion Rising Revolution (इंग्रजी भाषेत). 2013-07-22. 2018-12-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-23 रोजी पाहिले.
- ^ "Exploring masculinity | sangatsouthasia.org". www.sangatnetwork.org (इंग्रजी भाषेत). 2018-06-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-23 रोजी पाहिले.