महिरावणी
?महिरावणी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | नाशिक |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
महिरावणी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील एक गाव आहे.
पार्श्वभूमी
[संपादन]महिरावणी गाव ऐतिहासिक गाव महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिककडून त्र्यंबकेश्वरला जाताना चौदा किलोमीटरवर रस्त्याच्या उजव्या हाताला हे गाव आहे. गावात महादेवाचं मंदिर, महादेवाची पिंड, नंदीची मूर्ती व मारुतीचे मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या एका मंदिरात मारुतीच्या दोन मूर्ती आहेत. गावात इतरही देवतांची लहानलहान मंदिरे आहेत.
इतिहास
[संपादन]महिरावणीच्या नावामागे मोठी पौराणिक कथा आहे. अहिरावण आणि महिरावण हे रावणाची आई कैकसीचे भाऊ. दोघेही तंत्र-मंत्र विद्येत महापंडित होते. त्यांची कामाक्षी देवीवर अपार श्रद्धा होती. राम व रावणाच्या युद्धादरम्यान रामाने मेघनादला ठार केल्यानंतर रावणाने रामाला मारण्यासाठी अहिरावण व महिरावण या दोघा मामांना पाठविले. बिभीषणाला हे कळल्यावर राम व लक्ष्मणाच्या सुरक्षेसाठी हनुमानाला सज्ज करण्यात आले. मात्र महिरावण आणि अहिरावण यांनी राम व लक्ष्मणाचे अपहरण करून त्यांना पाताळात नेले. हनुमानानं त्यांचा माग काढत युद्ध केले व दोघांना ठार केलं. यांच्यातील युद्धाची कथाही रोचक आहे. दंडकारण्याचा भाग असणाऱ्या नाशिकमध्ये अहिरावण व महिरावण हे राक्षस राहत होते. त्यामुळे या भागाला अहिरावण व महिरावण असे नाव पडले. सध्या महिरावण गाव आपल्याला पहायला मिळतं मात्र अहिरावण गाव आता नाही. मात्र अहिरावण गावाचं अस्तित्त्व केव्हा संपुष्टात आलं अथवा या गावाचं काय झालं हे गूढच आहे. दोन्ही गावांमध्ये मारुतीची मंदिरं होती. अहिरावण हे गाव आता अस्तित्त्वात नसल्याने तेथील मंदिरातील मारुतीची मूर्ती महिरावणीतील मारुती मंदिरात ठेवण्यात आली, अशी दंतकथा आहे. अहिरावण व महिरावणाचा हनुमानाने वध केल्याने या दोन्ही गावांमध्ये त्यांची मंदिरं बांधली गेली असावीत.
नाशिक ही पेशव्यांची उपराजधानी होती. माधवराव पेशव्यांशी खटके उडाल्याने रघुनाथराव पेशव्यांनी वास्तवासाठी नाशिकची निवड केली होती. आनंदवल्लीमध्ये आनंदीबाईंची गढी त्यांनी उभारली होती. रघुनाथराव पेशवे म्हणजे राघोबादादा ऊर्फ राघो भरारी हे उत्तर पेशवाईतील अल्पकाळ सत्तेवर (१७७३) असलेले एक महत्त्वाकांक्षी पेशवे होते. त्यांना खलपुरुष म्हणून ओळखले जाते. राघोबादादांच्या स्वाऱ्या इतक्या प्रसिद्ध होत्या की, पेशावरपर्यंत त्यांनी दबदबा निर्माण केला होता. थोरला माधवराव गादीवर आल्यावर (१७६१) नाराज होऊन राघोबाने पेशवेपद बळकाविण्यासाठी खटाटोप केले. यादरम्यान स्वतःची ताकद वाढविण्यासाठी राघोबांनी महिरावणीत स्वतःचा तोफखाना उभारला होता. हा पेशवाईतील सर्वात मोठा तोफखाना होता, अशा नोंदी मिळतात. मात्र आर्थिक पाठबळाअभावी त्यांचा हा प्रयत्न फसला. तेव्हापासून महिरावणीतील या मैदानाला तोफखाना मैदान असे नाव पडले. पेशवाई अस्ताला गेल्यावर इंग्रजांनी हा तोफखाना ताब्यात घेतला. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तान येथील तोफखाना भारतात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा पेशव्यांनी सुरू केलेल्या सर्वात मोठ्या तोफखान्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन पाकिस्तानातील तोफखाना नाशिकमध्ये स्थलांतरित करण्यात आला असावा. महिरावणीतील पेशव्यांच्या तोफखान्याच्या खाणाखुणा आज दिसत नसल्या तरी त्यांच्या आठवणी अजूनही रंजकतेने सांगितल्या जातात.
भौगोलिक
[संपादन]महिरावणी गावासमोर महिरावणी डॅम आहे. हा परिसर तोफखाना मैदान म्हणूनही ओळखला जातो. गावात गायात्रीधाम तसेच गुरू गंगेश्वर वेदशाळा आहे. येथील ग्रंथालयात दुर्मिळ ग्रंथांचा खजिना आहे.
विकास
[संपादन]महिरावणी गावाची नवी ओळख येथे निर्माण झालेले शैक्षणिक केंद्र, बागातयदार शेतकरी आणि त्या जोडीला हुशार अन् प्रतिभासंपन्न तरुणांमुळे जगाच्या नकाशावर पोहचली आहे.
हवामान
[संपादन]येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १०५० मि.मी.पर्यंत असते.