Jump to content

मोहनदास सुखटणकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोहनदास सुखटणकर
जन्म मोहनदास सुखटणकर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख नाटके लेकुरे उदंड झाली, स्पर्श, दुर्गी
वडील श्रीपाद
पत्नी शालिनी

मोहनदास श्रीपाद सुखटणकर (जन्म : २१ नोव्हेंबर १९३०) हे एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत. वडील श्रीपाद सुखटणकर हे गोव्याचे नामांकित डॉक्टर होते. डॉक्टरकीचा त्यांनी कधीच धंदा केला नाही. सामाजिक कार्य म्हणूनच त्यांनी वैद्यकीय सेवा केली. आईही स्वतंत्र विचारांची होती.

पहिली भूमिका

[संपादन]

सुखटणकरांचे बालपण गोव्यात गेले. म्हापशाच्या ‘सारस्वत विद्यालय’ या मराठी शाळेत इयत्ता दुसरीत शिकत असताना त्यांनी पहिल्यांदाच एका छोटया नाटुकलीत काम केले. त्या नाटुकलीचे नाव होते, ‘खोडकर बंडू’. अभिनय येतो म्हणून नाही, तर वर्गात सतत बडबड करतो म्हणून, आरोंदेकर मास्तरांनी त्या नाटुकलीत काम करायची त्यांना शिक्षा केली होती. त्या नाटुकल्याच्या निमित्ताने मोहनदास सुखटणकरांच्या गालाला जो पहिल्यांदा रंग लागला तो कायमचा. नाटुकलीत खोडकर बंडूची प्रमुख भूमिका करून ज्या वेळी त्यांनी बक्षीस पटकावले, त्या वेळी प्रेक्षकांनी त्यांच्या धिटाईचे कौतुक केले. या नाटुकलीमुळेच सुखटणकरांना नाटकाची गोडी लागली. त्या निमित्ताने आपल्याला मुळातच अभिनयाची आवड होती याची जाणीवही त्यांना झाली.

इंग्रजी शाळेत

[संपादन]

पुढे गोव्यात ‘ॲंग्लो-पोर्तुगीज इन्स्टिटय़ूट’ या हायस्कूलमध्ये शिकत असताना शाळेच्या वार्षिक संमेलनातून तीन ते चार वर्ष स्व-लिखित कोकणी प्रहसनांतून मोहनदासांनी विनोदी भूमिका साकारल्या व पारितोषिकेही मिळवली. तेव्हा अभिनयात कारकीर्द करायचे आहे, असे काही त्यांच्या मनात नव्हते. पण छंद म्हणूनच सुखटणकर सारे करीत होते. त्यांच्या गांधीवादी विचारांच्या मामांचे एक सांगणे असायचे, आयुष्यात छंद जोपासावेत, पण मुख्य कामाकडे दुर्लक्ष करून नाही. मामांचे विचार त्यांच्यावर बिंबले ते कायमचे. त्यामुळे अभिनयाचा छंद जोपासताना सुखटणकरांनी शाळेच्या अभ्यासाची कधीही हेळसांड केली नाही.

इंग्रजी शाळेत असताना सुखटणकरांची ओळख कवी बा.भ. बोरकरांशी झाली. त्यांच्याकडूनच मुंबईत उच्चशिक्षणाची चांगली सोय असते, असे मोहनदासांना समजले.

मुंबईत दाखल

[संपादन]

मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी मोहनदास सुखटणकर १९५० साली मुंबईत आले आणि मुंबईकर झाले त्यांनी त्या वर्षी मॅट्रिकची आणि एस.एस.सी.ची अशा दोन्ही परीक्षा दिल्या आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.

गोव्यात त्यावेळी सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रासाठी पूरक वातावरण कमी होते. परिणामी सुखटणकरांनी मुंबईतच राहून पुढचे कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या पायावर उभे राहून काम करायचे, म्हणून त्यांनी एक छोटीशी नोकरी केली.

वडिलांची पेशंट असलेल्या एका ख्रिश्चन बाईंचे माहीमला तीन गाळे होते. त्या बाई व त्यांची दोन मुले यांच्याबरोबर सुखटणकर तीन वर्षे गुण्यागोविंदाने राहिले.

कॉलेजचे शिक्षण आणि अभिनयाचे कारकीर्द

[संपादन]

मोहनदास सुखटणकरांनी १९५२ साली मुंबईत चर्चगेटच्या जयहिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयात प्रवेशअर्ज भरण्यासाठी लांबच्या लांब रांगेत सुखटणकरांची सुनील दत्तशी ओळख झाली.. बी.ए.पर्यंत दोघे वर्गमित्र होते व. वर्गात एकाच बाकडयावर बसायचे.

महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षी डॉ. चारुशीला गुप्ते यांनी जयहिंद मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना करून सुखटणकरांना सचिव बनवले. या वाङ्मय मंडळांतर्गत विविध कार्यक्रम झाले.. महाविद्यालयाच्या वसतिगृहासाठी ‘लग्नाची बेडी’ हे नाटक करून मंडळाने निधी जमा केला. त्‍या नाटकात मोहनदास यांनी ‘गोकर्ण’ची भूमिका साकारली होती. आत्माराम भेंडे, आशा भेंडे, बबन प्रभू ही व्यावसायिक रंगभूमीवर काम करणारी माणसेही त्यात होती.

त्यानंतर सुखटणकर विविध एकांकिका स्पर्धांमधून भाग घेऊ लागले. त्यांनी एकांकिकांतून फक्त विनोदी भूमिकाच केल्या नाहीत, तर गंभीरही केल्या. ‘वहिनी’ या एकांकिकेत त्यांनी ‘वल्लभ’ची गंभीर भूमिका रमाकांत देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारली.

‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’च्या स्पध्रेत चारुशीला गुप्ते यांच्या ‘आम्ही सारेच वेडे’चा प्रयोग झाला. त्यात सुखटणकरांनी एका प्रौढाची विनोदी भूमिका वठवून उत्कृष्ट अभिनयासाठी असलेले पारितोषिक मिळवले.

भारतीय विद्याभवनात ‘आंतर महाविद्यालयीन नाट्यस्पर्धा’ व्हायच्या. तिथे सुखटणकरांनी ‘भाऊबंदकी’त काम केले आणि. गंगाधर गाडगीळांच्या ‘वेडयांचा चौकोना’तही केले.. या दोन्ही नाटकांसाठी त्यांना बक्षीस मिळाले.

कायद्याचे शिक्षण आणि अभिनय

[संपादन]

१९५८ साली बी. ए. झाल्यावर मोहनदास सुखटणकर मुंबईतच ‘गव्हर्नमेंट लॉ कॉलेज’मध्ये शिकू लागले.आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत या कॉलेजने सादर केलेल्या ‘बळी’ आणि ‘लाल गुलाबाची भेट’ या एकांकिकांसाठी त्यांना अभिनयाची प्रशस्तीपत्रके मिळाली.

धी गोवा हिंदू असोसिएशन

[संपादन]

१९५९ साली महाराष्ट्र राज्य नाटय स्पर्धेत ‘इंडियन नॅशनल थिएटर’ने ‘अशीच एक रात्र येते’ हे प्रा. प्रभाकर ताम्हाणे यांचे नाटक सादर केले. त्यात भय्यासाहेब वकील ही एक अत्यंत महत्त्वाची भूमिका मोहनदास सुखटणकरांनी वठवली. या नाटकात त्यांच्याबरोबर प्रसिद्ध लेखिका विजया पाटील यांनी काम केले होते, तर भय्यासाहेब वकिलाच्या मुलीची भूमिका मीनल मडकईकर यांनी केली होती. या नाटकाच्या प्रयोगाला ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’चे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी सुखटणकरांनाला गाठून ‘तू गोव्याचा. आमच्या संस्थेत तू असलंच पाहिजेस,’ वगैरे गोष्टी सुनावल्या, आणि त्यांना ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’मध्ये घेतले.

यापूर्वीच शासकीय स्पर्धात विक्रम गाजवत ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’ने संगीत ‘संशयकल्लोळ’, संगीत ‘शारदा’ या नाटकांत बक्षिसे मिळवली होती. त्या नाटकांचे प्रयोग स्पर्धेबाहेरही सुरू ठेवले होते. सुखटणकर ‘संशयकल्लोळ’मध्ये ‘भादव्या गडय़ा’चं काम करू लागले. ‘शारदा’मध्ये ‘सुवर्णशास्त्री’ किंवा ‘हिरण्यगर्भ’ या भूमिका ते करत असत.

त्यानंतर संस्थेने संगीत ‘मृच्छकटिकम्’ बसवले. नंदकुमार रावते यांनी दिग्दर्शन केले. आशालता वाबगावकर, रामदास कामत, खुद्द रावते यांच्या प्रमुख भूमिका नाटकात होत्या. ‘चेट’ या चावट पात्राचे काम सुखटणकरांना मिळाले. ती गद्य भूमिका होती. संस्थेने या नाटकाचे सुमारे २५ प्रयोग केले.

मोहनदास संस्थेत दाखल होण्यापूर्वी संस्थेच्या संगीत नाटकातील नायकाच्या भूमिका रामदास कामत करायचे, पण जेव्हा संस्थेत त्यांचे पर्दापण झाले तेव्हा त्यांना नायकाच्या भूमिका देऊन संस्थेने ‘युद्धस्य कथा रम्या’ आणि ‘मरणात खरोखर जग जगते’ ही गद्य नाटके रंगभूमीवर आणली. नाटकांचे प्रयोग चांगले झाले. मात्र लेखनाची बाजू अतिसुमार असल्यामुळे ही दोन्ही नाटके फारशी यशस्वी ठरली नाहीत. नाटके पडली, पण सुखटणकरांचे संस्थेतील स्थान पक्के होत गेले. आणि ते धी गोवा हिंदू असोसिएशनचे प्रमुख घटक झाले. संस्थेच्या बहुतेक नाटकांमधून त्यांनी कामे केली आहेत. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात स्त्रीपात्र सोडून बहुतेक सर्व भूमिका मोहनदासांनी साकारल्या. कुठल्याही नाटकाचा प्रयोग बंद पडू दिला नाही. ‘लेकुरे उदंड जाहली’चे पाचशे प्रयोग केले. ‘लेकुरे..’चा प्रयोग परदेशातही झाला. ‘दुर्गी’, ‘स्पर्श’मधल्या त्यांच्या भूमिकांचे विशेष कौतुक झाले. ‘स्पर्श’तील भूमिकेसाठी मोहनदास सुखटणकरांना गौरवण्यात आले.

कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाच्या समस्येवर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘स्पर्श’ या नाटकातील ‘नाटेकर’ या भूमिकेमुळे सुखटणकरांना गंभीर भूमिकाही करता येते हे सिद्ध झाले. त्यांची ‘दुर्गी’तील मोरोबा नाडकर्णी ही भूमिकाही खूप गाजली. गोमंतकचे संपादक माधव गडकरी यांनी मोरोबा नाडकर्णीवर विशेष लेख लिहिला होता. पुढे ‘दुर्गी’वर ‘सावल्या’ नावाची मालिका आली. ‘सावल्या’मध्ये मोहनदास सुखटणकरांबरोबर दामू केंकरे आणि भक्ती बर्वे यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

अन्य कार्यक्रम

[संपादन]
  • मोहनदास सुखटकर हे कुसुमाग्रजांच्या साहित्यावर स्वगत आणि काव्यवाचनाचा कार्यक्रम करतात. हा कार्यक्रम करताना त्यांना अनेक ठिकाणी स्टॅंडिंग ओव्हेशन मिळायचे.

अभिनयाचा छंद हा छंद पुढे भविष्यात उत्पन्नाचे साधन बनू नये, म्हणून मोहनदास सुखटणकरांनी एलआयसीत नोकरी केली. १९९० साली ते एलआयसीतून निवृत्त झाले, तरी रंगभूमीसाठी काम करणे त्यांनी सोडलेले नाही. नोकरी आणि गोवा हिंदू असोसिएशनचे काम सांभाळून रेडिओ, टीव्ही, चित्रपट या माध्यमांतूनही ते कामे करतच राहिले.

मोहनदास सुखटणकर यांच्या नाटकांतील भूमिका

[संपादन]
  • अंमलदार (हरभट)
  • अखेरचा सवाल (हरिभाऊ)
  • आभाळाचे रंग (आबा)
  • एकच प्याला (तळीराम)
  • दुर्गी (मोरोबा नाडकर्णी)
  • मत्स्यगंधा (चंडोल, विदूषक)
  • राणीचा बाग (मनोहर)
  • वेड्यांचा चौकोन (बंडू)
  • लग्नाची बेडी (गोकर्ण)
  • लेकुरे उदंड जाहली (दासोपंत)
  • शारदा (सुवर्णशास्त्री किंवा हिरण्यगर्भ)
  • संशयकल्लोळ (भादव्या)
  • स्पर्श (नाटेकर)
  • होनाजी बाळा (जान्या)

रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांना मिळालेले पुरस्कार

[संपादन]
  • 'राजहंस प्रतिष्ठान' या संस्थेतर्फे देण्यात येणारा 'राजहंस पुरस्कार' (१२ जानेवारी २०१४)
  • नाट्यक्षेत्राची ५०हून अधिक वर्षे सेवा केल्याबद्दल मुंबईच्या ’आम्ही गोवेंकर’ या प्रतिष्ठित संस्थेकडून जीवनगौरव पुरस्कार (१५ मार्च २०१३)