कृष्णविवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कृष्णविवर ही काही ताऱ्यांची अंतिम स्थिती असते. एका विशिष्ट वस्तुमानापेक्षा जास्त वस्तुमानाचे तारे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी आकुंचन पावत कृष्णविवरात रुपांतरीत होतात. अशा कृष्णविवरांजवळचे गुरुत्वाकर्षण इतके तीव्र असते की प्रकाशदेखिल त्यांपासुन सुटू शकत नाही आणि यामुळेच अशा ताऱ्यांना कृष्णविवर असे म्हटले जाते.


निर्मिती[संपादन]

कलाकाराने काढलेले कृष्णविवराचे चित्र

विश्व हे मूलतः अणूंपासून बनलेले आहे आणि अणूंच्या रचनेतले घटक कृष्णविवर निर्मितीस कारणीभूत ठरतात. अणू मधे केंद्रात प्रोटॉन , न्युट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे अतिसूक्ष्म कण असतात. अणूचे सर्व वस्तुमान त्याच्या केंद्रात एकवटलेले असते आणि तुलनेने हलके इलेक्ट्रॉन त्याभोवती संचार करतात. अणूंच्या संयोगावेळी हे एलेक्ट्रोन दोन केंद्रात पुरेसे अंतर राखायला मदत करतात. अगदी ग्रहाच्या केंद्रातील अणूंची रचना पृष्ठभागा अणुंप्रमाणेच असते.परंतु ताऱ्याच्या केंद्रात वेगळी परिस्थिती असते. नुक्लिअर चेन रिअक्शननुसार ताऱ्याच्या गाभ्यात हायड्रोजनचे रूपांतर हेलियम मध्ये होत असते. आणि हेलियम वजनाने हलका असल्याने वस्तुमानातील फरक प्रचंड उर्जेत रूपांतरित होतो. ही उर्जा सर्व बाजूला विखुरली जाऊन ताऱ्याला प्रसारण अवस्थेत ठेवतात व तारा तेजस्वी दिसतो.

अखेर एक वेळ अशी येते जेव्हा ताऱ्याच्या गर्भातील सर्व हायड्रोजन ज्वलन होऊन संपतो. तेव्हा रूपांतरित हेलियमचे ज्वलन होण्यास सुरवात होते. अखेरीस जेव्हा हेलियम सुद्धा संपतो तेव्हा ताऱ्याचा पृष्ठभाग केंद्राकड़े कोसळतो. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे तारा जितका आकाराने मोठा तितका हायड्रोजन ज्वलनाचा वेग जास्त असतो. यामुळे प्रचंड तारे कमी संख्येत असतात. आपल्या सुर्याचे इंधन संपायला १० हजार दशलक्ष वर्षे लागतील. तर सुर्याच्या केवळ ३ पट मोठा असणारा तारा ५०० दशलक्ष वर्षे च टिकेल.[ संदर्भ हवा ] जेव्हा तारा कोसळतो त्या वेळी त्याचा प्रचंड स्फोट होतो याला सुपर नोवा म्हणतात. सुपरनोवा नंतर तार्‍याचे प्रचंड द्रव्य आत कोसळ्ते, या प्रचंड द्रव्याचा दाब इतका अति असतो की अणूंमधील एलेक्ट्रोन बंध तुटतात आणि तार्‍याचे आकारमान मोठया प्रमाणात कमी होते. याची परिणिती तार्‍याचे गुरुत्वाकर्षण वाढण्यात होते.अशा प्रकारे सुपरनोव्हानंतर तारा हा वस्तुमानानुसार न्यूट्रॉन तारा, पल्सार व कृष्णविवर बनतो.

चंद्रशेखर मर्यादा[संपादन]

भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर यांचे यातील योगदान फार महत्त्वाचे आहे. त्यांनी असा सिद्धांत मांडला, की सूर्या च्या १.४ पटी पेक्षा लहान असणारा तारा "श्वेत बटु" मध्ये रूपांतरित झाल्यानंतर आणखी कोसळत नाही. यात अखेर गुरुत्वाकर्षण आणि अणूच्या मूलभूत कणां च्या परस्पर विरोधी बलात समतोल साधला जातो. आणि तारा प्रचंड घनता असलेला " श्वेत बटु " तारा बनून स्थिरावतो. व्याध - ब हा तारा याचेच उदाहरण आहे. तसेच सूर्याच्या १.४ ते ३ पट वस्तुमान असलेल्या तार्‍यांमधे अणुकेंद्रे परस्परांत विलीन होऊन तार्‍यामध्ये फक्त न्यूट्रॉन कण शिल्लक राहतात. त्याहूनही जास्त वस्तुमान असलेल्या तार्‍यांचे कृष्णविवरात रुपांतर होते.

स्टिफन हॉकिंग यांचे मत[संपादन]

कृष्णविवराच्या संदर्भात ॲल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताला स्टीफन हॉकिंग यांनी पुंज वादाची जोड देऊन नवी गृहिते मांडली होती. कृष्णविवरामध्ये प्रचंड गुरुत्वाकर्षण असते आणि त्यामुळे त्याच्या कक्षेत येणारे ग्रह, तारे यांना हे विवर गिळत असते असे शास्त्रज्ञांचे म्हणणे होते. या कृष्णविवरांच्या प्रचंड गुरूत्वाकर्षण शक्तीमुळे प्रकाश किरणदेखील बाहेर पडू शकत नाहीत असे समजले जात होते. परंतु कृष्णविवरातून प्रकाशाचे उत्सर्जन होत असल्याचे स्टीफन हॉकिंग यांनी आपल्या गृहितकांच्या आधारे पटवून दिले होते. स्टीफन हॉकिंग यांच्या दाव्यानुसार कृष्णविवर नावाची गोष्टच नसते असा त्यांचा दावा आहे.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. झिया मेराली (२४ जानेवारी २०१४). "Stephen Hawking: 'There are no black holes'" [स्टिफन हॉकिंग:कृष्णविवराचे अस्तित्वच नाही]. नेचर. डी.ओ.आय.:10.1038/nature.2014.14583. २६ जानेवारी २०१४ रोजी पाहिले. 

बाह्य दुवे[संपादन]