स्टीफन हॉकिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्टीफन हॉकिंग
Stephen Hawking.StarChild.jpg
जन्म ८ जानेवारी १९४२
ऑक्सफर्ड, इंग्लंड
नागरिकत्व इंग्लंड
कार्यक्षेत्र (१) खभौतिकशास्त्र, (२) गणित
प्रशिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठ
केंब्रिज विद्यापीठ
डॉक्टरेटचे मार्गदर्शक डेनिस विल्यम सियामा
ख्याती कृष्णविवर
पुरस्कार कमांडर ऑफ दी ब्रिटिश एम्पायर
वडील डॉ. फ्रँक हॉकिंग
आई इसोबेल हॉकिंग
पत्नी (१) जेन वाइल्ड, (२) इलेनी मेसन
अपत्ये (१) रॉबर्ट (पुत्र), (२) लूसी (कन्या), (३) तिमोथी (पुत्र)

खगोलभौतिकी शास्त्रज्ञ व गणिताचे प्राध्यापक स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ या दिवशी ऑक्सफर्ड, इंग्लंड येथे झाला. याच तारखेस बरोबर ३०० वर्षांपूर्वी (१६४२ साली) गॅलेलियो गॅलिली यांचा मृत्यु झाला.

डॉ. फ्रँक हॉकिंग आणि इसोबेल हॉकिंग यांचे ज्येष्ठ चिरंजीव असलेले स्टीफन वयाच्या ८ व्या वर्षी सेंट एल्बान्स स्कुल, हर्टफोर्डशायर या शाळेत जाऊ लागले. स्टीफन हॉकिंग लहानपणापासून एकपाठी, संगीत, गणित आणि भौतिकशास्त्राची आवड असलेले विद्यार्थी होते. शालेय शिक्षण पूर्ण करून त्यांनी १९६२ साली ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी स्टीफन यांनी केंब्रिज विद्यापीठ येथे आपले नाव नोंदविले.

१९६२ साली हिवाळी सुट्यांसाठी स्टीफन आपल्या घरी गेले असता त्यांना अचानक त्रास होऊ लागला. उपचारासाठी अनेक डॉक्टरांकडे दाखवून झाले पण रोगाविषयी काहीच माहिती मिळेना. त्यातच रोगाचा जोर वाढला आणि ८ जानेवारी १९६३ रोजी, त्यांच्या २१ व्या वाढदिवसाच्या दिवशीच स्टीफन यांना एक असाध्य रोग झाला. या रोगाला इंग्लंडमध्ये मोटर न्यूरॉन डिसीज (M. N. D.) तर अमेरिकेत अमायो ट्रॉपिक लॅटरल स्क्लोरोसिस (A. L. S.) असे म्हणतात. या रोगामुळे शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण संपून जाते. याच्या सुरूवातीच्या काळात अशक्तपणा जाणवतो मग अडख़ळत बोलणे, अन्न गिळतांना त्रास होणे, हळूहळू चालणे-फिरणे आणि बोलणे बंद होत जाते. स्टीफन हॉकिंग जेमतेम दोन वर्षे जगतील असे त्यांना सांगण्यात आले. आधी ते खूप निराश झाले पण त्याच इस्पितळातील एका रोग्याला असाध्य रोगाशी झगडतांना पाहून स्टीफन यांनाही आशेचे किरण दिसू लागले.

एकदा लंडनमध्ये खगोलशास्त्रज्ञ रॉजर पेनरोझ यांचे भाषण ऐकायला स्टीफन हॉकिंग गेले. तार्‍यातील इंधन संपल्यावर तो बिंदूवत होऊ शकतो असे निष्कर्ष पेनरोझ यांनी त्या भाषणात मांडले होते. यावरूनच स्टीफन हॉकिंग यांनी स्वतंत्र अभ्यास करून संपूर्ण विश्वाचाही तार्‍याप्रमाणेच अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला, त्यांच्या या प्रबंधावर स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरेट मिळाली. याच प्रबंधाचा पुढचा भाग सिंग्युलॅरिटीज अँड दी जीओमेट्री ऑफ स्पेसटाईम हा प्रबंध स्टीफन यांनी लिहिला. या प्रबंधासाठी १९६६ सालचे ऍडम्स प्राईझ मिळाले.

नंतर स्टीफन हॉकिंग यांनी कृष्णविवर या विषयाकडे आपले लक्ष वळविले. यावर आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाचा सिद्धांतची जोड देऊन गृहिते मांडणे सुरू केले. त्यावेळी हॉकिंग आपल्या शरीराची हालचाल करू शकण्यास असमर्थ होत गेले. येवढी अवघड गणिते त्यांनी केवळ मनातल्या मनात सोडविली. १९७४ साली हॉकिंग यांनी पहिल्यांदा पुंज यामिक आणि सापेक्षतावादाचा सिद्धांतची सांगड घालून दोन सिद्धांतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. स्टीफन हॉकिंग यांच्या या प्रबंधाला आधी जोरदार विरोध झाला पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणार्‍या किरणोत्सर्जनाला हॉकिंग उत्सर्जन असे नाव देण्यात आले. त्याच वर्षी स्टीफन हॉकिंग यांचा कृष्णविवर या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या नेचर या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आणि त्यांची रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवड झाली.

दरम्यान स्टीफन यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हील चेअरचा आधार घ्यावा लागला. मग या व्हील चेअरलाच एक संगणक जोडण्यात आला. फक्त एक बोट वापरून स्टीफन या संगणकावर हवे ते काम करू शकत.

१९८० च्या दशकात हॉकिंग यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ, प्रिन्स्टन विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ, लँकेस्टर विद्यापीठ या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला.

१९८५ साली हॉकिंग यांना न्यूमोनिया रोग झाला. केवळ श्वास नलिकेला छिद्र करूनच शस्त्रक्रिया होऊ शकणार असल्याने तशी शस्त्रक्रिया हॉकिंग यांच्यावर करण्यात आली पण त्यामुळे हॉकिंग यांचा आवाज कायमचा गेला. यावर संगणतज्ज्ञ डेव्हिड मेसन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्या संगणकासाठी एक नवी आज्ञावली लिहून ती त्या संगणकात कार्यरत करून दिली. यामुळे हॉकिंग अडखळत बोलू शकतात.

विज्ञान विषयात काम करीत असतांनाच हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी, त्यांच्या सोयींसाठी आणि त्यांच्यावरील अन्यायासाठी लढा दिला. यासाठी हॉकिंग यांना १९७९ Royal Association for Disability and Rehabilitation या संस्थेकडून मॅन ऑफ दि इयर हा किताब देण्यात आला.