शम्मी (मूळ नाव:नर्गिस रबाडी) (नारगोल, २४ एप्रिल, १९३०; - मुंबई, ५ मार्च, २०१८) या भारतीय अभिनेत्री होत्या. त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीत दोनशेहून अधिक हिंदी चित्रपटांत काम केले आहे.
शम्मी यांचे मूळ नाव नर्गिस रबाडी होते. गुजरातमधील नारगोल संजाण येथे त्यांचा जन्म पारसी कुटुंबात झाला. रबाडी या काही महिन्यांच्या असताना त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. या कुटुंबाचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नव्हता. नर्गिस या योगायोगाने तेथे आल्या.
दिग्दर्शक तारा हरीश यांनी रबाडी यांना आपले नाव बदलून शम्मी हे नवे नाव धारण करण्याचा सल्ला दिला, कारण नर्गिस नावाची एक नटी आधीच सिनेमासृष्टीत होती.
वयाच्या १८ व्या वर्षी शम्मी यांनी उस्ताद पेड्रो या चित्रपटात सहनायिकेची भूमिका केली. मल्हार या चित्रपटात त्यांना मुख्य नायिकेची भूमिका मिळाली. शम्मी यांनी नर्गिस, मधुबाला, दिलीप कुमार यांच्यासह अनेक अभिनेत्यांबरोबर काम केले.