कुसुम शेंडे
कुसुम गोपीनाथ शेंडे (माहेरच्या घारपुरे)(जन्म : पुणे, १२ दिसेंबर १९२९; - पुणे, २७ ऑगस्ट २०१९) या एक किराणा घराण्याच्या गायिका व नाट्यअभिनेत्री होत्या. संगीत नाटकांत आणि चित्रपटांत त्यांच्या भूमिका असत. पुण्यातील शल्यविशारद डाॅ. के.सी. घारपुरे हे त्यांचे वडील आणि ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’च्या (पीडीए) अभिनेत्री तारामती घारपुरे या त्यांच्या आई.
काॅलेज शिक्षणाच्या काळात कुसुम शेंडे या पंडिता रोहिणी भाटे यांच्याकडून थोडेफार कथ्थक नृत्य शिकल्या. नंतर त्या संगीताकडे वळल्या. छोटा गंधर्व, शोभा गुर्टू आणि सरस्वती राणे यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
कुसुम शेंडे यांनी ‘मंदारमाला’, ‘मृच्छकटिक’, ‘सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’, ‘स्वयंवर’ या संगीत नाटकांत छोटा गंधर्व, राम मराठे, प्रसाद सावकार आणि रामदास कामत यांसारख्या कलावंतांबरोबर नायिकेच्या भूमिका केल्या. नाटककार संजीव शेंडे हे कुसुम शेंडेंचे चिरंजीव. त्यांच्याही आम्रपाली' आणि 'वैरीण झाली सखी' या नाटकांत कुसुम शेंडे यांनी काम केले होते. लंफू या हिंदी चित्रपटात त्यांनी 'भाजीवाली'ची एक छोटीशी पण लक्षवेधी भूमिका केली होती.
संगीत नाटकांतून निवृत्ती घेतल्यावर कुसुम शेंडे यांनी संगीत शिकवण्याचे काम केले. ‘चारुकेशी’, ‘धानी’ आणि ‘भीमपलास’, या रागांत त्यांनी काही बंदिशी लिहिल्या.
गायिका बेला शेंडे आणि सावनी शेंडे-साठ्ये या कुसुम शेंडे यांच्या नाती. त्या आपल्या आजीकडेच गायन शिकल्या.
पुरस्कार
[संपादन]- महाराष्ट्र सरकारचा सलग तीन वर्षे गायक-अभिनेत्रीचा पुरस्कार.