अजित सोमण
अजित सोमण (जन्म : ६ ऑगस्ट] १९४७; - २ फेब्रुवारी २००९) हे एक प्रसिद्ध बासरीवादक, संगीतज्ञ, संहितालेखक, जाहिरातलेखक आणि इंग्रजी भाषेचे प्राध्यापक होते. . मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.
संगीतातील कारकीर्द
[संपादन]अजित सोमण यांनी अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम केले. सुधीर फडके, यशवंत देव, पं.हृदयनाथ मंगेशकर, श्रीधर फडके, आनंद मोडक, सुधीर मोघे, पं. बिरजू महाराज,पं. केलुचरण महापात्रा, पंडिता रोहिणी भाटे, प्रभा मराठे, डॉ.सुचेता चापेकर, मनीषा साठे, पार्वती दत्ता, रोशन दात्ये यांच्याबरोबर विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी बासरीची साथ केली.
'सखी मंद झाल्या तारका', 'ही वाट दूर जाते ' यांसारख्या अनेक प्रसिद्ध गाण्यांमध्ये किंवा इंडो जॅझ ग्रुपच्या ॲंटीग्रॅव्हिटी, बुगी फॉर हनुमान अशा सीडीज् मध्ये सोमणांची बासरी ऐकायला मिळते. त्यांनी अनेक लघुपटांसाठी पार्श्वसंगीत दिले आहे. युजीसीच्या अंतर्गत तयार केलेल्या "राग रंजन" या मालिकेच्या आखणीपासून ते संहितालेखनापर्यंत सर्व काम सोमणांनी केले होते. या मालिकेला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. सोमणांच्या चाहत्यांत बिरजू महाराज, प्रभा मराठे, रोहिणी भाटे पार्वती दत्ता तसेच संगीत क्षेत्रातील अनेक नामवंतांचा समावेश आहे.
स्वरानंद, सुगम, आशा पब्लिसिटी अशा संस्थांचे त्यांनी विश्वस्त अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
सोमण यांच्यावर एक लघुपट तयार करण्यात आला आहे. अजित सातभाई यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे.
शिक्षण क्षेत्रातील कारकीर्द
[संपादन]तळेगाव येथील इंद्रायणी महाविद्यालय, तसेच स.प. महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे इंग्रजी तसेच रानडे इन्स्टिट्यूट येथे पत्रकारिता, तर सिम्बायोसिस येथे सोमण यांनी Creative writing and Mass communication अशा विषयांचे अध्यापन केले.
पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात त्यांनी १५ वर्षांहून अधिक काळ अप्लाईड म्युझिक, म्युझिक ॲप्रीसिएशन हे विषय शिकवले. या अभ्यासक्रमासाठी पाठ्यपुस्तक म्हणून वापरल्या जाणाऱ्या 'संगीत' या पुस्तकाचे ते सहलेखक आहेत.
कॉपी रायटिंग मधील कारकीर्द
[संपादन]सोमण यांनी लिहिलेल्या अनेक जिंगल्स व जाहिराती प्रसिद्ध झाल्या. "ऊंचे लोग ऊंची पसंद", "चवीनं खाणार त्याला केप्र देणार", " या वर्षी पु.लंची दिवाळी तुमच्या घरी ", "सकाळ घरात आला की, आजोबांपासून नातवापर्यंत सासूपासून सुनेपर्यंत सगळ्यांचा स्वार्थ एकदम जागा होतो" , " प्रत्येक कुटुंबासाठी-कुटुंबातील प्रत्येकासाठी सकाळ" या काही त्यांच्या गाजलेल्या जाहिराती आहेत.
संहिता आणि गीतलेखन
[संपादन]अनेक औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय, सांगीतिक लघुपटांसाठी तसेच अनेक दृकश्राव्य कार्यक्रमांसाठी सोमण यांनी संहिता लिहिल्या आहेत.
अनेक जिंगल्स तसेच 'राऊ' सारख्या मालिकेसाठी आणि 'देवी अहिल्याबाई' या चित्रपटासाठी गीतलेखन केले.
'एक होता विदूषक' मधील तराणा सोमण यांनी लिहिला आहे.
'टोकन नंबर', 'या आमुच्या हसऱ्या घरात' सारख्या मालिकांचे शीर्षकगीत सोमण यांनी लिहिले आहे. NDA चे स्फूर्तिगीत सोमण यांनी लिहिले आहे. 'लाखाची गोष्ट', 'गुळाचा गणपती', 'गाभारा' या गाजलेल्या चित्रपटांची इंग्रजी उपशीर्षके सोमण यांची आहेत.
सोमण यांनी कथक नृत्यासाठी अनेक बॅले, ठुमऱ्या लिहिल्या आहेत.
अजित सोमण यांचे कुटुंब
[संपादन]पत्नी अनुराधा, कन्या भाग्यश्री गढवाल, पुत्र गुणवर्धन सोमण
स्वरशब्दप्रभू पुरस्कार
[संपादन]अजित सोमण यांच्या स्मृत्यर्थ विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांचा सोमण परिवारातर्फे दरवर्षी स्वरशब्दप्रभू पुरस्काराने सन्मान करण्यात येत असतो. तसेच उदयोन्मुख कलाकाराला त्यांच्या नावाची शिष्यवृत्तीही देण्यात येते. आजवर हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती:
- २०१७ : सुधीर गाडगीळ
- २०१६ : अरुण काकतकर
- २०१५ : मनीषा साठे
- २०१४ : रमाकांत परांजपे
- २०१३ : सुधीर मोघे
- २०१२ : श्रीधर फडके
स्वरशब्दप्रभू शिष्यवृत्ती
[संपादन]अजित सोमण यांच्या स्मृत्यर्थ ललित कला केंद्रातील सर्वोत्तम विद्यार्थी किंवा विद्यार्थीनीचा सोमण परिवारातर्फे दरवर्षी 'स्वरशब्दप्रभू शिष्यवृत्ती देऊन सन्मान करण्यात येतो. आजवर ही शिष्यवृत्ती मिळालेले विद्यार्थी/विद्यार्थीनी:
- २०१७ : माधवी केळकर - गायिका
- २०१६ : श्रीपाद शिरवाळकर- तबलावादक
- २०१५ : रोहन शेटे - तबलावादक
- २०१४ : लीलाधर चक्रदेव- हार्मोनिअम वादक
- २०१३ : वल्लरी आपटे - कथक नृत्यांगना
- २०१२ : प्रमोद गणोरकर - गायक