Jump to content

हानामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चेरीच्या फुलांचा बहर
हिमेजी किल्ल्याच्या भोवती हानामीसाठी सहली, २००५
ओसाका किल्ला

हानामी (जपानी भाषेमध्ये: (花見, फुले पाहणे) ही जपानमधील फुलांचा बहर पाहण्याचा आनंद घेण्याची एक परंपरा आहे. जपानी भाषेत हाना म्हणजे फुले आणि मी म्हणजे पाहणे. जरी या परंपरेचे फुले पाहणे असे नाव असले, तरी बहुतेकवेळा चेरीच्या (जपानी भाषेमध्ये: साकुरा) झाडांची फुले आणि कधीकधी अलुबुखारच्या (जपानी भाषेमध्ये: उमे) झाडांची फुले पाहणे असाच अर्थ अभिप्रेत असतो.[]

मार्चच्या अखेरीपासून ते मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत संपूर्ण जपानभर चेरीच्या फुलांना बहर येतो. आणि एक फेब्रुवारीच्या दरम्यान ओकिनावा बेटावर चेरीचा बहर पाहायला मिळतो.जपानच्या हवामान खात्यातर्फे दर वर्षी चेरीच्या बहराचा अंदाज वर्तवला जातो.[] चेरीच्या फुलांचा हा अल्पजीवी बहर केवळ एक ते दोन आठवडे टिकत असल्यामुळे हानामीचे नियोजन करणारे या तारखांवर लक्ष ठेवून असतात.आधुनिक काळात जपानमध्ये उद्यानात बहरलेल्या साकुराच्या वृक्षाखाली दिवसा किंवा रात्री पार्टी करून हानामी साजरी करतात.रात्रीच्या वेळच्या हानामीला यो-झाकुरा (夜桜) म्हणजे रात्रीचा साकुरा असे म्हणतात. उएनो पार्क सारख्या अनेक उद्यानांमध्ये योझाकुरासाठी कागदी आकाश कंदील लावले जातात.ओकिनावा बेटावर मोतोबू शहराजवळच्या याए पर्वतावर किंवा नाकीजीन किल्ल्यावर विद्युत आकाश कंदीलांची रोषणाई केलेली असते.

हानामीचा एक अजून प्राचीन प्रकार सुद्धा जपानमध्ये आहे. त्याला उमेमी (梅見, आलुबुखारची फुले पाहणे ) असे म्हणतात. यामध्ये चेरीऐवजी अलुबुखारच्या फुलांच्या सौंदर्याचा आस्वाद घेतला जातो. या प्रकारची हानामी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये जास्त लोकप्रिय आहे. साकुरा पार्ट्यांमध्ये विशेषतः तरुण लोक मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असल्यामुळे गर्दी आणि आवाज जास्त असतो, तुलनेने उमेमी पार्ट्या शांत आणि कमी गर्दी असलेल्या असतात.

इतिहास

[संपादन]

हानामीची प्रथा अनेक शतके जुनी आहे. ही पद्धत नारा काळात (७१०-७९४)सुरू झाली असे मानले जाते. सुरुवातीच्या काळात लोक अलुबुखारच्या बहराचे कौतुक करत असत. पण हेई काळात (७९४-११८५) चेरीच्या बहराने अधिक लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली आणि हानामी म्हणजे साकुरा (चेरी) असे समीकरण तयार झाले. तेव्हापासून वाका आणि हायकू दोन्हीमध्ये " फुले" म्हणजे "साकुरा" असे गृहीत धरलेले असते.

हेई काळातील 'गेंजीची गोष्ट' या कादंबरीत सर्वप्रथम साकुराच्या बहारासाठी 'हानामी' हा शब्द वापरलेला आढळतो. मुळात साकुराची पूजा करून भात लावणीच्या हंगामाची सुरुवात केली जात असे. वृक्षातील देवावर लोकांची श्रद्धा होती आणि त्याला नैवैद्य दाखवला जात असे. नंतर तो प्रसाद म्हणून साके(तांदळाची दारू) बरोबर सेवन केला जात असे.

हेई काळातील सम्राट सागाने या पद्धतीला सुरुवात केली आणि क्योतोमधील राजप्रासादातील साकुराच्या फुलांनी बहरलेल्या झाडांखाली साके आणि इतर पदार्थ असलेल्या मेजवान्या आयोजित करण्यास सुरुवात केली. या नाजूक फुलांवर कविता लिहिल्या जात असत. ही फुले सुंदर, तेजस्वी पण क्षणभंगुर आयुष्याचे प्रतीकच मानली गेली. जपानमधील हानामीची सुरुवात इथून झाली असे मानण्यात येते. आरंभीच्या काळात ही प्रथा फक्त राजदरबारापुरती मर्यादित होती, पण हळूहळू ती सामुराई समाजात पसरली आणि इदो काळापर्यंत ती सामान्य लोकापर्यंत पोचली. या प्रथेला प्रोत्साहन देण्यासाठी तोकुगावा योशीमुने यांनी अनेक चेरीच्या झाडांची लागवड केली. साकुराच्या बहरलेल्या झाडांखाली लोक वनभोजन करीत आणि साकेचे सेवन करत असत.

सध्याची प्रचलित पद्धत

[संपादन]

जपानी लोकांनी हानामीची परंपरा सुरू ठेवली आहे.जिथे चेरीच्या झाडांना बहर येतो , तिथे जपानी लोक हानामीसाठी गर्दी करतात. चेरीच्या बहरलेल्या झाडाखाली पार्टी करण्यासाठी हजारो लोक विविध उद्यानांना भेट देतात.अशा पार्ट्या अनेकवेळा रात्री उशिरापर्यंत सुरू असतात.जपानच्या निम्म्याहून जास्त भागात हानामी आणि शालेय वर्षाची सुरुवात तसेच सुट्ट्यांच्या नंतर ऑफिसची सुरुवात होण्याची वेळ एकत्र येते. त्यामुळे अनेकवेळा हानामी पार्टीने स्वागत केले जाते.टोकियोमधील उएनो उद्यान आणि शिन्जुकू उद्यान अशा मोठ्या उद्यानांमध्ये चेरीच्या विविध जातीच्या वृक्षांना विविधरंगी फुलांचा बहर येतो.त्यामुळे या बागांमध्ये विशेष गर्दी होते.[]

जपानबाहेर हानामी

[संपादन]

जपानबाहेर तैवान,कोरिया,फिलिपाईन्स आणि चीन या देशांमध्ये छोट्या प्रमाणावर हानामी साजरी केली जाते.[] अमेरिकेमध्ये सुद्धा हानामी लोकप्रिय झाली आहे.१९१२ साली जपानने अमेरिकेला या दोन देशांची मैत्री साजरी करण्यासाठी चेरीची ३००० झाडे भेट दिली.ही झाडे वॉशिंग्टन डी.सी.मध्ये लावण्यात आली. १९६५ मध्ये अजून ३८०० झाडे भेट देण्यात आली.[] ही चेरीची झाडे पर्यटकांचे खास आकर्षण आहेत.दरवर्षी वसंत ऋतूच्या सुरुवातीला या वृक्षांना बहर येतो तेव्हा येथे राष्ट्रीय चेरी बहर उत्सव साजरा केला जातो.[]

मेकन,जॉर्जिया येथे आंतरराष्ट्रीय चेरी बहर उत्सव साजरा केला जातो.मेकनला चेरीच्या बहराची जागतिक राजधानी असे म्हणतात. कारण येथे चेरीची ३,००,००० झाडे आहेत.[] ब्रुकलीन,न्यू यॉर्क येथे मे मध्ये ब्रुकलीन बोटॅनिकल गार्डनमध्ये दरवर्षी वार्षिक चेरी ब्लॉसम उत्सव साजरा केला जातो.१९८१ पासून हा उत्सव साजरा केला जातो. आणि या उद्यानाचे हे एका अतिशय लोकप्रिय आकर्षण आहे. नेवार्क, न्यू जर्सीच्या ब्रँच ब्रूक उद्यानात सुद्धा दरवर्षी हानामी साजरी केली जाते. या उद्यानात १८ जातींचे ५००० चेरी वृक्ष आहेत.उत्सवाच्या काळात दररोज सुमारे १०००० लोक या उद्यानाला भेट देतात.[]

अनेक युरोपियन देशांमध्ये सुद्धा हानामी साजरी केली जाते.फिनलंडमध्ये हेलसिंकी येथे हानामी साजरी केली जाते.स्थानिक जपानी लोक आणि कंपन्या यांनी भेट दिलेली २०० चेरीची झाडे कार्सिक्कापुईस्टो येथे लावण्यात आलेली आहेत.मे महिन्याच्या मध्यावर या झाडांना बहर येतो.

इटलीतील रोम येथे युर उद्यानात हानामी साजरी केली जाते.जपानने १९५९ मध्ये दिलेली चेरीची झाडे येथे लावण्यात आलेली आहेत.[] स्टॉकहोममध्ये कुंगस्ट्राडगार्डनमध्ये दरवर्षी हानामी साजरी केली जाते.[१०]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Sosnoski, Daniel (1996). Introduction to Japanese culture. Tuttle Publishing. p. 12. ISBN ISBN 0-8048-2056-2 Check |isbn= value: invalid character (सहाय्य).
  2. ^ "さくら開花予想2018". sakura.weathermap.jp (जपानी भाषेत). 2018-10-03 रोजी पाहिले.
  3. ^ "Photos: Cherry blossoms in full bloom in Japan". Wiscnews.com (इंग्रजी भाषेत). 2018-10-11 रोजी पाहिले.
  4. ^ "SEOUL METROPOLITAN GOVERNMENT". 2009-02-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-10-11 रोजी पाहिले.
  5. ^ "Cherry Blossom Festival (U.S. National Park Service)". www.nps.gov (इंग्रजी भाषेत). 2018-10-11 रोजी पाहिले.
  6. ^ "Homepage - National Cherry Blossom Festival". National Cherry Blossom Festival (इंग्रजी भाषेत). 2018-10-11 रोजी पाहिले.
  7. ^ "International Cherry Blossom Festival | Macon, GA". Macon, Georgia's International Cherry Blossom Festival (इंग्रजी भाषेत). 2018-10-11 रोजी पाहिले.
  8. ^ "The story behind Branch Brook Park's cherry blossom trees | Di Ionno". NJ.com (इंग्रजी भाषेत). 2018-10-11 रोजी पाहिले.
  9. ^ "Passeggiata del Giappone". www.rerumromanarum.com. 2018-10-11 रोजी पाहिले.
  10. ^ "Hanami – körsbärsblomningen i Kungsträdgården". Sivert Lindblom (स्वीडिश भाषेत). 2018-07-15. 2018-10-11 रोजी पाहिले.