Jump to content

हरी नरके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हरी रामचंद्र नरके (१ जून, १९६३ ते 0९ ऑगस्ट २०२३) हे एक मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर होते. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते.[१] ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते. हा आयोग महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग या गटात एखाद्या जातीचा समावेश करण्यासाठी किंवा त्या वर्ग-प्रवर्गातून एखादी जात वगळण्यासाठी आलेल्या मागण्या व तक्रारीची तपासणी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून उरलेल्या अन्य मागासवर्गीयांच्या यादीमध्ये, सामाजिक, आर्थिक निकषानुसार प्रगत व उन्नत गट किंवा व्यक्ती निर्धारित करून संबंधित जात वगळण्याकरिता किंवा जातीचा समावेश करण्यासाठी राज्य शासनास अभ्यासपूर्ण शिफारस आदी गोष्टी करतो.

हरी नरके हे पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर उपाध्यक्ष होते.[२] मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले आहे.[३]

लेखन[संपादन]

प्रा. हरी नरके यांनी विपुल लेखन केले आहे. महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. फेब्रुवारी २०११ पासून ते ऑगस्ट २०२३ पर्यंत त्यांनी ब्लॉग लिहिले. फेसबुकवही ते लिखाण केले. प्रा. हरी नरके यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गटाला आपल्या ब्लॉगमधून आधार दिला होता. हे लेख काही वर्तमानपत्रांतही प्रसिद्ध झाले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रा. हरी नरके यांचा अनिता पाटील यांच्याशी ब्लॉगवरून वादविवाद झाले. मराठा आणि कुणबी एकच आहेत की दोन या मुद्यावर प्रामुख्याने हा वाद होता.

हरी नरके यांनी फुले-आंबेडकर कोश लिहिला आहे. या कोशात

१. फुले-आंबेडकर यांच्या साहित्य ग्रंथांचा व अन्य लेखनाचा चिकित्सक परिचय दिलेला असेल.

२. त्यांच्या जीवनकार्यावर आणि साहित्यावर लिहिले गेलेले सर्व ग्रंथ, प्रामुख्यानं (मराठी, हिंदी, इंग्रजी) यांचा परिचय दिलेला असेल. केवळ ग्रंथसूची नव्हे तर त्या त्या पुस्तकात नेमके काय आहे, तो किती दर्जेदार ऐवज आहे याचा शोधपर धांडोळा या कोशात असेल.

३. फुले-आंबेडकर चळवळीच्या इतिहास साधनांची, दस्तावेजांची विस्तृत माहिती या कोशात असेल. हे दस्तावेज कुठल्या व्यक्ती, संस्था, वाचनालये, ग्रंथालये यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि तिथवर कसे पोहोचायचे याबाबत संपर्क-साधन व्यक्ती, संस्था यांचीही माहिती या कोशात असेल.

४. एम. फिल., पीएच.डी., किंवा पोस्ट डॉक्टरल रिसर्चसाठी देशात आणि देशाबाहेर फुले-आंबेडकर यांच्याविषयक झालेले सर्व काम कोशात नमूद असेल. या कामांचा नेमका धांडोळा या कोशात एकत्र मिळेल.

५. या विषयाच्या संदर्भात नवे कोणते काम करता येणे शक्य आहे, कोणते काम अजून बाकी आहे याचीही माहिती या कोशात असेल.

६. आणखी कितीतरी नवीन अन्य बाबी या कोशात समाविष्ट असतील.

हरी नरके यांच्या विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे विषय[संपादन]

 • अण्णा हजारे आणि आपण
 • अभिजात मराठी
 • आरक्षण चित्रपट
 • आरक्षणविषयक
 • ओबीसी जनगणना
 • ओबीसींमध्ये पेरली दुहीची बीजे
 • घरेलू कामगारांना न्यायासाठी प्रयत्न : छगन भुजबळ
 • चळवळीतल्या सर्वांची लाडकी लेक
 • फॅसिस्ट शक्तीमुळे बहुजनांचे विभाजन
 • मराठा आरक्षण
 • मराठी अभिजात कशी?
 • महात्मा फुले
 • महाराजा यशवंतराव होळकर चरित्राचे प्रकाशन
 • माझे विश्व
 • शिक्षण
 • संभाजी ब्रिगेड
 • समाजशोध

पुस्तके[संपादन]

 • महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन
 • महात्मा फुले - शोधाच्या नव्या वाटा

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ देवीदास देशपांडे. "नामदेव के निधन पर साहित्य जगत में शोक" (हिंदी भाषेत). २३ मार्च २०१४ रोजी पाहिले.
 2. ^ "'भांडारकर'च्या नियामक मंडळ अध्यक्षपदी अभय फिरोदिया". लोकसत्ता. ७ जुलै २०१७. ५ ऑगस्ट २०१९ रोजी पाहिले.
 3. ^ "अभिजात दर्जा दिल्यास मराठी जागतिक भाषा". महाराष्ट्र टाईम्स. २८ फेब्रुवारी २०१६. 2019-08-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ५ ऑगस्ट २०१९ रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]