Jump to content

स्त्रीवादी सिद्धांकन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्त्रीवादी सिद्धांकन हे स्त्रीवादामधील महत्त्वाच्या मांडणीचे सैद्धांतिक स्वरूप आहे. लिंगभाव आधारित केली जाणारी विषमता समजून घेऊन त्याचे विश्लेषण करणे हे त्याचे उद्दिष्ट असते. स्त्रीवाद हा ज्याप्रमाणे एकच एक नसतो तर स्त्रीवादाचे विविध प्रवाह असतात; त्याचप्रमाणे विभिन्न स्त्रीवादांमधून वेगवेगळे स्त्रीवादी सिद्धांकन निर्माण झालेले आहे. प्रमुखप्रवाही स्त्रीवाद हा परीघावर असणाऱ्या सामाजिक समूहांना सामावून घेणारा अथवा त्यातील स्त्रियांचे अनुभव समाविष्ट करणारा असेलच असे नाही उदा. भारतातील प्रमुखप्रवाही स्त्रीवादाने दलित स्त्रियांच्या प्रश्नांची अनेक काळापर्यंत दखल घेतली नव्हती. त्याचप्रमाणे पाश्चात्य जगातील प्रमुखप्रवाही स्त्रीवादामध्ये काळ्या समूहासारख्या परीघावर असणाऱ्या स्त्रियांच्या अनुभवांचा प्रारंभीच्या काळात समावेश करण्यात आला नव्हता. बेल हूक्स या अमेरिकेतील स्त्रीवादी लेखिका त्यांच्या फेमिनिस्ट थियरी : फ्रॉम मार्जिन टू सेंटर[१]या पुस्तकामधून वरील संदर्भात मांडणी करतात. स्त्रीवादी सिद्धांकन हे परिघावरील असणाऱ्या व्यक्ती कशाप्रकारे निर्माण करू शकतात याचा शक्यता नमूद करतात.

स्त्रीवादी सिद्धांकनातील महत्त्वाचे योगदान[संपादन]

बेल हूक्स [२]या अमेरिकेतील स्त्रीवादी लेखिका आणि सामाजिक कार्यकर्ती आहेत. त्यांचे लिखाण हे प्रामुख्याने वर्ण, भांडवलशाही आणि लिंगभाव यांच्यातील आंतरसंबंधांची चिकित्सा करणारे आहे कारण त्यामधूनच शोषणव्यवस्था निर्माण होते आणि टिकून राहते. शिक्षण, कला, इतिहास, लैंगिकता, प्रसारमाध्यमे आणि स्त्रीवाद या अनुषंगाने वर्ण, वर्ग आणि लिंगभाव या संकल्पनांची मांडणी केली आहे.

परीघापासून केंद्राकडे[संपादन]

या पुस्तकामधून लेखिकेने स्त्रीवादी सिद्धांकन आणि स्त्री चळवळ यामधील आंतरसंबंध विस्तृतपणे मांडले आहेत. स्त्रीवादी सिद्धांकनाचा उदय हा ७० च्या दशकात पहिल्या जगातील स्त्री चळवळ आणि त्यामधून मांडले गेलेले विषय यांच्या पार्श्वभूमीवर झाला उदा. वंशभेद, वर्णवाद, स्त्रियांवर होणारी हिंसा व अनेक. स्त्रियांची मुक्तिदायी चळवळ ही गो-या मध्यमवर्गीय स्त्रियांभोवती केंद्रित होती. वर्णभेदाच्या विरोधात व प्रमुखप्रवाही स्त्री चळवळीच्या मर्यादित भूमिकेला विरोध करणा-या काळ्या स्त्रियांच्या चळवळीमधून स्त्रीवादी क्षेत्रातून नवीन विचारधारा आणि धोरणे निर्माण करण्यासाठी लिंगभाव, वर्ण आणि वर्ग यासंदर्भात स्त्रीवादी भूमिदृष्टी सिद्धांकन मांडण्याची आवश्यकता असल्याचे मांडले गेले. काळ्या स्त्रीवाद्यांनी स्त्रीवादी सिद्धांकन निर्माण करण्याबद्दल त्यांची बांधिलकी ही या प्रकारच्या पुस्तकांची निर्मिती करण्यामधून दर्शविली. स्त्रीवादी चळवळीमध्ये बौद्धिक वातावरण निर्माण करण्यासाठी तसेच स्त्रीवादी सिद्धांकनावरील गो-या स्त्रीवाद्यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी काळ्या स्त्रीवाद्यांनी त्यांच्या जहाल विचारांमधून स्त्रीवादी सिद्धंकनाची नव्याने मांडणी केली. सुरुवातीचा काही काळ ही ज्ञाननिर्मिती प्रमुखप्रवाही स्त्रीवादी अभ्यास क्षेत्रामध्ये दुर्लक्षित राहिली. स्त्रीवादी ज्ञानक्षेत्राच्या कायम केंद्रस्थानी असणा-या (गो-या) स्त्रियांनी जी सिद्धांकने निर्माण केली; त्यामध्ये परीघावर असणार-या स्त्रिया व पुरुषांच्या जीवनाबद्दल ज्ञान तसेच जाणीवेचा मोठा अभाव होता. ज्यामुळे मानवी अनुभवांमध्ये जी वैविद्ध्यता तसेच विषमता होती त्यांची नोंद करून विश्लेषण करण्यात प्रारंभीचे स्त्रीवादी सिद्धांकन हे मर्यादित ठरले. समाजातील सर्व; विशेषतः वंचितांच्या अनुभवांना महत्त्व देणारे असे सर्वसमावेशक सिद्धांकन निर्माण करणे आवश्यक असल्याचे तत्कालीन स्त्रीवाद्यांना जरी वाटत असले तरी देखील त्याची निर्मितीची प्रक्रिया मात्र संथ होती. सरतेशेवटी केंद्र व परीघ य दोन्हींची भूमीदृष्टी आहे अशा व्यक्तीकडून वरीलप्रकारे अपेक्षित असलेले परिवर्तनवादी स्त्रीवादी सिद्धांकन निर्माण होण्याच्या शक्यता अधिक असतात. अशा शक्यतांमधूनच सदर पुस्तकाची देखील निर्मिती झाली आहे. प्रमुखप्रवाही स्त्रीवादी सिद्धांकनामधील मर्यादा या पुस्तकाच्या सुरुवातीलाच मांडल्या आहेत. यासोबतच नवीन सिद्धांकनाच्या दिशा देखील सुचविल्या आहेत.

स्त्रीवादी सिद्धांकनातील महत्त्वाचे विषय[संपादन]

पुढीलप्रमाणे अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांबद्दल चर्चा केलेली आहे ज्याद्वारे स्त्रीवादी सिद्धांकनामध्ये अधिक भर घातली गेली. स्त्रीवादी सिद्धांकनात काळ्या स्त्रियांचे योगदान, स्त्रीवादाच्या व स्त्रियांच्या एकजिनसीकरणाला विरोध, स्त्रीवादी चळवळीमधील महत्त्वाची वैशिष्ट्ये, भगिनीभावाची संकल्पना, स्त्रीवादी चळवळीमधील पुरुषांचा सहभाग, स्त्रियांचे शिक्षण, काम, स्त्रियांवर होणारा हिंसाचार व लैंगिक शोषण याविरोधात स्त्रीवादी चळवळी मधून झालेले प्रयत्न, परिवर्तनाच्या दिशेने स्त्रीवादी क्रांतीचा प्रवास इ. पहिल्या प्रकरणामध्ये स्त्रीवादी सिद्धांकन निर्मितीमध्ये काळ्या स्त्रियांचे योगदान हे कसे व किती महत्त्वाचे होते याबद्दल मांडणी केली आहे. स्त्रीवादी चळवळ आणि सिद्धांकन यांमध्ये काळ्या स्त्रिया परीघावर असल्या तरी देखील त्यांनी दोन्ही मध्ये दिलेले योगदान हे स्त्रीवादी सिद्धांकन मुक्तिदायी बनविण्यासाठी निकडीचे होते. दुसऱ्या प्रकरणामध्ये स्त्रियांचे विशेषतः काळ्या स्त्रियांचे जे लैंगिक शोषण होते त्याविरोधामध्ये अमेरिकेत स्त्रीवाद हा एक चळवळ म्हणून कशाप्रकारे प्रभावी ठरला याचा ऐतिहासिक आढावा घेतला आहे. तिसऱ्या प्रकरणामध्ये अमेरिकेतील तत्कालीन स्त्रीवादी चळवळीचे महत्त्व मांडले आहे. वर्णभेद, पितृसत्ताक समाजव्यवस्था यामध्ये स्त्रियांचे होणारे शोषण, कुटुंब व्यवस्थेतील त्यांचे कनिष्ठ स्थान, दडपणूक असे स्त्रियांच्या दडपणूकीचे वेगवेगळे विषय चळवळी मधून प्रकर्षाने पुढे आणले गेले. चौथ्या प्रकरणामध्ये स्त्रीवादी चळवळीतील विविध उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विभिन्न सामाजिक पार्श्वभूमी मधून येणाऱ्या स्त्रियांनी राजकीय युती स्थापन केली; ज्याला 'भगिनीभाव' असे म्हटले जाते. यासदर्भामध्ये टीकात्मक परीक्षणाद्वारे उहापोह केला आहे. पाचव्या प्रकरणामध्ये स्त्रीवादी चळवळी मध्ये पुरुषांचा कॉम्रेड म्हणून सहभाग कशाप्रकारे असतो यावर भाष्य केले आहे. स्त्रीवादी चळवळ ही पुरुष विरोधी म्हणून मांडली जाणे, तसेच समाजव्यवस्थेचा भाग असणाऱ्या पुरुषांच्या सहभागाचे कमी असणारे प्रमाण या सर्व मुद्द्यांची चर्चा केली आहे.

सहाव्या प्रकरणामध्ये सामाजिक संरचनांमध्ये ताकद/सत्ता आणि सत्तासंबंध हे स्त्रियांचे होणारे शोषण व वर्णभेद यांमध्ये कशाप्रकारे भूमिका पार पडतात याबाबत स्त्रीवाद्यांनी चिकित्सक परीक्षण केले आहे. तसेच सत्तेकडे बघण्याचा बदलत जाणारा दृष्टीकोन यामाध्यमातून मांडणी केली आहे. सातव्या प्रकरणामध्ये 'काम' (Work) या संकल्पनेची पुनर्मांडणी केली आहे. कामाच्या संकल्पनेकडे बघण्याचा प्रमुखप्रवाही स्त्रीवाद्यांच्या दृष्टिकोनावर टीका करीत स्त्रिया आणि काम यांच्यातील नाते हे विविध सामाजिक पार्श्वभूमी मधून येणाऱ्या स्त्रियांसाठी वेगवेगळे असते हे मांडले आहे. आठव्या प्रकरणामध्ये स्त्रीवाद्यांसाठी स्त्रियांनी शिक्षण घेणे ही किती महत्त्वपूर्ण असून शिक्षण हे स्त्रियांच्या सबलीकरणाचे माध्यम म्हणून कसे अत्यावश्यक आहे याची चर्चा केली आहे. यासोबतच स्त्रीवादी शिक्षण हे देखील कसे उपयुक्त ठरते हे मांडले आहे. हिंसाचार हा स्त्रीवादी चळवळ आणि अभ्यासक यांसाठी नेहमीच महत्त्वाचा विषय राहिला आहे. स्त्रियांविरुद्ध होणाऱ्या हिंसाचाराच्या विरोधात आंदोलन घडवून आणण्यास अमेरिकेतील स्त्रीवादी चळवळ महत्त्वपूर्ण ठरली. तसेच पुरुषांच्या स्त्रियांवरील वर्चस्वाला स्त्रीवाद्यांनी विरोध केला ही सर्व चर्चा नवव्या प्रकरणात केली आहे. मातृत्व आणि पालकत्व यावरील स्त्रीवाद्यांची मांडणी ही नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण ठरली. ज्यामध्ये वर्ण आणि वर्ग यांचा चळवळीवर असणारा प्रभाव देखील चिकित्सक पातळीवर आणला गेला. या दहाव्या प्रकरणामध्ये मुलांच्या पालनपोषणाची कुटुंबातील स्त्रियांवर पूर्णपणे लादली गेलेली जबाबदारी याची देखील चिकित्सा केली आहे. अकराव्या प्रकरणामध्ये समाजातील स्त्रियांची होणारी लैंगिक दडपणूक याविरोधात स्त्रीवादी चळवळी मधून जो संघर्ष केला गेला त्याचा ऐतिहासिक आढावा घेतला आहे. कारण स्त्रियांच्या मुक्तिदायी जीवनामध्ये लांगिक स्वात्यंत्र/ मुक्ती आवश्यक असल्याचे स्त्रीवाद्यांनी सतत मांडले आहे. शेवटच्या प्रकरणामध्ये स्त्रीवादी क्रांती घडवून आणण्यासाठी किंवा त्याचा विकास करण्यासाठी चळवळी मधून कशाप्रकारे संघर्ष केला गेला याचा आढावा घेतला आहे.

निष्कर्ष[संपादन]

अमेरिकेतील तत्कालीन स्त्रीवादी चळवळ ही समतेपेक्षा देखील मुक्तीसाठी केली गेलेली क्रांतिकारी चळवळ होती. सदर पुस्तकामधून हूक्स या स्त्रीवादी चळवळी समोरील उदिष्टे, स्त्रीवादी संघर्षात पुरुषांचा सहभाग आणि मुक्ती प्राप्त करण्याच्या हेतूने क्रांती अशा महत्त्वाच्या विषयांची चर्चा करताना त्या जहाल स्त्रीवादी भूमिकेतून बोलतात असे दिसते. हूक्स अधोरेखित करतात की, समाजातील प्रत्येक स्तरातील प्रत्येक व्यक्तीसोबत जोड घेऊ शकेल अशा स्त्रीवादी सिद्धांकनाची आपलयाला गरज आहे कारण त्यामधून शोषितांना हा विश्वास मिळेल की स्त्रीवादी चळवळ ही त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्नशील असते. हा विचार सर्व स्त्रीवादी प्रवाह आणि सिद्धंकने यांना लागू होतो म्हणूनच हे पुस्तक स्त्रीवादी साहित्याचे वाचन करणा-या नवीन पिढीसाठी स्त्रीवादी चळवळीचे राजकारण व ऐतिहासिक आढावा समजून घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ hooks, bell (2014-10-03). Feminist Theory: From Margin to Center (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 9781317588344.
  2. ^ "Bell hooks | American scholar". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2018-03-31 रोजी पाहिले.