सोनई हत्याकांड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासेजवळ सोनई गावात २०१३ साली घडलेले तिहेरी हत्याकांड हे सोनई हत्याकांड या नावाने ओळखले जाते. सवर्ण मराठा जातीच्या मुलीशी प्रेमप्रकरण केल्यामुळे सचिन घारू (वय २३), आणि त्याचे दोन मित्र संदीप राज थनवार (वय २४) व राहुल कंडारे (वय २६) या तीन दलित मेहतर तरुणांची सोनईजवळील गणेशवाडी शिवारातील विठ्ठलवाडी येथे १ जानेवारी २००३ रोजी अमानुषपणे हत्या करण्यात आली.[१][२]

हत्येचे कारण[संपादन]

सोनईच्या गणेशवाडी शिवारातील दोषींच्या कुटुंबातील एक मुलगी नेवासा फाट्यावरील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलमध्ये बीएडचे शिक्षण घेत होती. या संस्थेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या सचिन सोहनलाल घारू आणि तिच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याबाबत तिच्या कुटुंबाला समजल्यानंतर प्रेमप्रकरणाने गंभीर वळण घेतले. त्या कुटुंबाकडून सचिनला समज देण्यात आली आणि नंतर मुलीचे वडील, भाऊ आणि चुलत्यांनी सचिन आणि त्याच्या दोन मित्रांना घरी बोलवून त्यांची हत्या केली.[३]

अशी झाली तिघांची हत्या[संपादन]

संदीप राज धनवार, राहुल कंडारे, सचिन घारू हे तिघे तरुण नेवासे फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानमध्ये कामाला होते. त्यांना स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची आहे असे सांगून विठ्ठलवाडी येथे बोलावून घेण्यात आले. संदीप थनवार यास सेफ्टी टँकच्या पाण्यामध्ये बुडवून ठार केले. त्यानंतर पळून जाणाऱ्या राहुल कंडारे याचा कोयत्याने, तर सचिन घारूचा वैरण कापण्याच्या अडकित्त्यामध्ये अडकवून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले. धनवार व कंडारे यांचा खून करून त्यांचे मृतदेह पोपट दरंदले यांच्या कोरड्या विहिरीत पुरण्यात आले, तर घारू याचे मुंडके व अडकित्त्याने तोडलेले हातपाय एका कूपनलिकेत टाकून देण्यात आले होते.

आरोपींनी निर्दयपणे व थंड डोक्याने परंतु अतिशय नियोजनबद्धपणे हे हत्याकांड केले. प्रारंभी संदीप राजू थनवार याला पकडण्यात आले. संदीप हा शरीरयष्टीने धडधाकड असल्याने त्याला संपविणे इतके सोपे नसल्याचे पाहून सर्व आरोपींनी एकत्र येत संदीपला ज्या सेफ्टी टँकमध्ये तो काम करीत होता त्याच टँकच्या पाण्यामध्ये त्याचे डोके खाली व पाय वर करून पाण्यात बुडवून ठार मारले.

हा प्रकार पाहून राहूल उर्फ तिलक राजू कंडारे हा जीवाच्या भीतीने शेतातून जिकडे वाट मिळेल तिकडे पळत असताना त्याचा पाठलाग करण्यात आला व ऊस तोडीच्या कोयत्याने डोक्याच्या मागील बाजूस वार करून जखमी केले. वर्मी घाव बसलेल्या राहूल कंडारे याने अवघ्या काही क्षणातच प्राण सोडला. संदीप व राहुल यांच्यापेक्षा आरोपींच्या मनात सचिन धारू याच्या विषयी अधिक राग होता त्यामुळे सचिनने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, त्याचाही पाठलाग करून पकडण्यात आले. ज्या ठिकाणी सचिनला पकडले त्या ठिकाणाजवळील शेत गट नंबर २९८/२ मधील शेतातील खड्डयात नेऊन वैरण कापण्याच्या आडकित्यामध्ये सचिनला जिवंत टाकून प्रथम त्याचे दोन्ही पाय गुडघ्यापासून व दोन्ही हात खांद्यापासून कापून वेगळे केले. नंतर जिवंतपणे त्याची मान आडकित्त्यामध्ये घालून ती धडापासून वेगळी करून क्रूरपणे त्यास ठार मारले.[२]

पुरावे नष्ट करण्यासाठी विविध कॢप्त्या[संपादन]

आरोपींनी या हत्याकांडाचा सुगावा लागू नये म्हणून व कोणताही पुरावा आपल्या विरुद्ध सापडू नये याची काळजी घेतांना घटनेतील अनेक पुरावे नष्ट केली. त्यात त्यांनी सचिन धारू याचे कापलेले दोन्ही हात व पायाचे तुकडे करून शेतातील उघड्या बोअरवेलमध्ये टाकून पुरावा नष्ट केला. तसेच त्याचे धड व मुंडके आणि राहुल कंडारे याचे प्रेत तेथून जवळच असलेल्या बाळू रामदास दरंदले याच्या मालकीच्या परंतु आरोपी पोपट ऊर्फ रघुनाथ दरंदले वाट्याने करीत असलेल्या शेत गट नंबर २९३ मधील शेतातील कोरड्या ४० फूट खोलीच्या विहिरीमध्ये नेऊन खड्डा करून पुरले. तिहेरी हत्याकांड घडवून आणतांना सर्व आरोपींच्या अंगावर मयतांचे रक्त डाडले होते. त्याचा पुरावा मिळू नये म्हणून सर्वच आरोपींनी स्वतःच्या अंगावरील रक्ताने भरलेले कपडे शेतातच जाळून टाकून पुरावा नष्ट केला. संदीप थनवार याचा मृतदेह मात्र त्यांनी तसाच सेफ्टी टँकमध्ये ठेवला व त्याचा गुदमरून मृत्यू झाल्याची खबर सोनई पोलिसांना दिली.[२][४]

शोध व अटक[संपादन]

दरंदले परिवारातले प्रकाश, रमेश, पोपट आणि गणेश दरंदले, आणि अशोक नवगिरे, संदीप कुऱ्हे यांना या हत्याकांडाप्रकरणी अटक करण्यात आली होती. हत्याकांडात घरातील महिलांचा समावेश असूनही त्यांना अटक करण्यात आली नाही. या प्रकरणाच्या तपासात राजकीय हस्तक्षेपामुळे सुरुवातीपासून पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली. प्रथम अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविला. घटना घडल्यानंतर दोन दिवसांनी खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. तब्बल पाच दिवसांनंतर दलित अत्याचार प्रतिबंधक कलम लावण्यात आले. पोलिसांनी मुकेश चांगरे या तरुणाची फिर्याद घेण्यात आली. हत्येचा हेतू काय होता याचा उल्लेख फिर्यादीत जाणीवपूर्वक टाळण्यात आला. ते कारण टाळण्यामागे राजकीय दबाव असल्याचा आरोप झालेला आहे. हत्याकांडाच्या तपासाचा पुरता खेळखंडोबा करण्यात आला. सचिन घारू याच्या छातीवर मुलीचे नाव कोरलेले होते. त्याच्या मृतदेहाचा पंचनामा करताना तो उल्लेख करण्यात आला नाही. मृत तरुणांच्या कुटुंबीयांचे जबाब वेळेवर घेण्यात आलेले नाहीत. तसेच कूपनलिकेत टाकलेल्या घारू याच्या हातापायांचा शोधही घेण्यात आला नाही. सोनई भागातील एका प्रभावशाली नेत्याच्या पुतण्याने एका पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीने हत्याकांडाच्या तपासात हस्तक्षेप केल्याचा आरोप दलित संघटनांनी केला होता. तपास करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या पुतण्याची चौकशी करण्याचे जाहीर केले होते. पण, नंतर चौकशी टाळण्यात आली. हत्याकांडानंतर आरोपींनी या पुतण्याशी संपर्क केला होता. त्याने पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करून मांडवली केली, असा आरोप केला जातो. पोलीस उपअधीक्षक अंबादास गांगुर्डे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला होता. त्यांना तपासात प्रगती करता आली नाही. त्यानंतर सीआयडीकडे तपास सोपवला गेला. सीआयडीने गांगुर्डे यांनी अर्धवट केलेल्या तपासाच्या आधारेच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दलित संघटनांनी आवाज उठवूनही काहीही झाले नाही. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही सीआयडीकडून तपास काढून तो पोलिसांकडे सोपवण्याची घोषणा केली. पण तसे घडले नाही. हत्याकांडात मारला गेलेला सचिन घारू या तरुणाची आई कलाबाई घारू हिने ‘पोरीसंगं प्रेम करून माझ्या पोरानं कोणता गुन्हा केला, ते दोघं लगीन करणार होते, पण सचिनला मारून टाकलं.’ अशी तक्रार केली होती. पोलिसांनी तसा जबाब नोंदवला नाही. हत्याकांडातील दुसरा तरुण संदीप धनवार याचा भाऊ पंकज धनवार हा सैन्य दलात जवान आहे. त्याने तपास सीआयडीकडे सोपविण्याची मागणी केली होती. त्याची कैफियत सरकारने ऐकून तपास सीआयडीकडे सोपविला होता.

हत्याकांड उघडकीस आल्यावर मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे खून केल्याचा जबाब दिला होता. शिवाय जे केले त्याची खंत नसून शिक्षा भोगायला तयार आहे, असे त्यांनी जबाबात म्हटले होते. ही घटना घडल्यानंतर २० दिवसानंतर हे हत्याकांड माध्यमाने उचलून धरले. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी हा तपास योग्य रीतीने होण्यासाठी आदेश दिले होते.

साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो, त्यामुळे हा खटला नाशिक किंवा जळगाव कोर्टात चालवावा, अशी मागणी पीडितांचे भाऊ पंकज राजू थनवार यांनी औरंगाबाद खंडपीठात केली होती. ही मागणी मान्य झाली आणि त्यानंतर हा खटला नेवासा सत्र न्यायालयातून नाशिक सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. राज्य सरकारने या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक केली होती.

पुराव्यातील मुद्दे[संपादन]

परिस्थितीजन्य पुराव्यातील महत्त्वाचे मुद्दे युक्तिवादावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा का द्यावी याविषयी खटल्यातील परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे १३ मुद्दे न्यायालयासमोर स्पष्ट केले होते. त्यांत-
१) मयत सचिन धारू हा अनुसूचित जातीचा होता व तो त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात कामाला होता व त्याच महाविद्यालयातील सवर्ण जातीच्या विद्यार्थिनीशी त्याचे प्रेम होते व दोघांनीही लग्न करण्याचा निश्चय केला होता.
२) सदरची घटना १ जानेवारी २०१३ रोजी दुपारी साडेतीन ते रात्री आठ वाजायच्या दरम्यान घडली होती. सचिन धारू जेथे काम करीत होता व राहत होता तेथून २५ किलोमीटर अंतरावर दरंदल वस्तीत हे घटनास्थळ आहे.
३)घटनेच्या आधी पंधरा ते वीस दिवसांपूर्वी सचिनला आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली होती.
४) मयत सचिन धारू हा सवर्ण जातीच्या मुलीशी विवाह करणार आहे याची पुरेपूर खात्री आरोपींना होती हे हेरूनच त्यांनी कट केला व अशोक नवगिरे याला त्यासाठी पुढे करून सचिनचा मित्र संदीप धनवार याला खोटे कारण दाखवून बोलवून घ्यायचे, संदीपबरोबर सचिन धारू हादेखील येईल हे सर्व आरोपींना ज्ञात होते.
५) अशोक नवघरेच्या निमंत्रणावरून संदीप व सचिन हे दुचाकीने सकाळी १० वाजता त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलातून दरंदले वस्तीकडे गेले होते.
६) १ जानेवारी २०१३ रोजी सकाळी दहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत संदीप व सचिन हे दरंदले वस्तीवर काम करीत होते.
७) रात्री १ वाजता आरोपी पोपट दरंदले व अशोक नवघरे यांनी सोनई पोलीस स्टेशनला तोंडी तक्रार दिली त्यात म्हटले की, संडासाच्या सफाईचे काम सुरू असताना सफाई कामगाराचे प्रेत सापडले आहे, अशी खोटी माहिती देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
८) सर्व आरोपींनी योग्य नियोजन करून थंड डोक्याने क्रूरपणे हे तिहेरी हत्याकांड केले आहे.
९) या खटल्यात सवर्ण जातीची मुलगी फितूर झाली असली तरी, ही घटना १ जानेवारी २०१३ रोजी घडली तोपर्यंत मुलगी त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात कॉलेजमध्ये शिकत होती. परंतु घटनेनंतर तिने कॉलेजला जाणे बंद केले. याबाबत तिला तिच्या शिक्षकांनी विचारले असता, ‘तिने आमच्या घरी प्रॉब्लेम झाला आहे’ असे सांगितले.
१०) सर्व आरोपींचा सचिनवर इतका राग व द्वेष होता की त्यांनी जात व्यवस्थेला महत्त्व दिले ही शोकांतिका आहे.
११) हत्याकांड करताना आरोपींचा राग इतका टोकाला होता की त्यांनी सचिनच्या हात व पायाचे ८ तुकडे केले व ते पाणी असलेल्या खोल विहिरीत टाकले तसेच त्याचे शीर कापून धड कोरड्या विहिरीत बुजवले. सचिनचा मित्र राहुल याचाही निर्घृणपणे खून करताना त्याच्या डोक्यावर घाव घातले.
१२) आरोपींनी अतिशय नियोजनपर्ण कट केला. सचिन व राहुल यांचा कोणताही पुरावा ठेवला नाही.
१३) सचिनचा मित्र संदीप याला संडासात उलटे टांगून त्याला गुदमरून ठार मारले.[५]

शिक्षा[संपादन]

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. 'आरोपींचे कृत्य हे राक्षसांप्रमाणे क्रूर आहे. थंड डोक्याने त्यांनी पीडितांची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले. नियोजन आणि कट रचून हे हत्याकांड करण्यात आले. प्रत्यक्षदर्शींचा पुरावा राहू नये म्हणून सचिनच्या मित्रांचाही खून करण्यात आला. हे कृत्य खूपच निर्घृण आहे, असा युक्तिवाद निकम यांनी केला होता.

तिहेरी हत्याकांडातील दोषी, रमेश विश्वनाथ दरंदले (वय ३९), प्रकाश विश्वनाथ दरंदले (३४), पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले (४८), गणेश उर्फ प्रवीण पोपट दरंदले (१९) सर्व राहणार गणेशवाडी (विठ्ठलवाडी) सोनई, तालुका नेवासा, अशोक सुधाकर नवगिरे (२८) व संदीप माधव कुऱ्हे (वय ३३) राहणार खरवंडी, ता. नेवासा या सात आरोपींपैकी सहा आरोपीना १८ जानेवारी २०१८ रोजी नाशिक सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी फाशीची शिक्षा सुनावली. ‘तुमचे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे तर आहेच, परंतु तुम्ही ज्या निर्दयतेने हे हत्याकांड घडविले ते पाहता तुम्ही सैतानही आहात, तुम्ही जिवंत राहणे हे समाजासाठी धोकादायक आहे’ अशा शब्दात न्यायालयाने निकालपत्रात म्हणून, अवघ्या दहा मिनिटांत न्यायालयाचे कामकाज स्थगित केले. सातवा आरोपी अशोक रोहिदास फलके याला पुराव्यांअभावी निर्दोष ठरवण्यात आले[६][७]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "सोनई तिहेरी हत्याकांड : एकाच कुटुंबातले 6 दोषी". BBC News मराठी (इंग्रजी भाषेत). 2018. 2018-03-20 रोजी पाहिले.
  2. ^ a b c "सोनई हत्याकांड : सीआयडीकडूनही तपासाचा खेळखंडोबा". Loksatta. 2013-07-03. 2018-03-20 रोजी पाहिले.
  3. ^ "काय आहे सोनई हत्‍याकांड प्रकरण? | पुढारी". www.pudhari.news. 2018-03-20 रोजी पाहिले.[permanent dead link]
  4. ^ Gaikwad, Rahi. "With Marathas targeting the caste crime law, Maharashtra Dalits fear the return of the 'old days'". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2018-03-20 रोजी पाहिले.
  5. ^ "Ahmednagar Massacre of Dalits: Fact-Finding Report – India Resists". www.indiaresists.com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2017-08-14. 2018-03-20 रोजी पाहिले.
  6. ^ "Sonai convicts deserve capital punishment | Latest News & Updates at Daily News & Analysis". dna (इंग्रजी भाषेत). 2018-01-19. 2018-03-20 रोजी पाहिले.
  7. ^ "Sonai Murder: सोनई हत्याकांड: सहा दोषींना फाशीची शिक्षा - sonai triple murder: all six convicts get death sentence - Maharashtra Times". Maharashtra Times. 2018-03-20 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]