सुशीलादेवी बापूराव पवार
सुशीलादेवी बापूराव पवार | |
---|---|
जन्म |
सुशीलादेवी बापूराव पवार मे २२, इ.स. १९१५ |
मृत्यू |
मे २९, इ.स. २००७ ग्वाल्हेर; मध्य प्रदेश, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट | श्यामची आई, पायाची दासी |
पुरस्कार | चित्रपटासाठी राष्ट्रपती पदक विजेता पहिला मराठी चित्रपट |
सुशीलादेवी बापूराव पवार ऊर्फ वनमाला (मे २२, इ.स. १९१५ - मे २९, इ.स. २००७; ग्वाल्हेर; मध्य प्रदेश, भारत) या मराठी आणि हिंदी चित्रपटांतील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री होत्या. श्यामची आई चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना इ.स. १९५३ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा भारतातील राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.
जीवन
[संपादन]सुशीलादेवी पवार यांचा जन्म मे २२, इ.स. १९१५ रोजी झाला. त्यांचे वडील बापूराव पवार ग्वाल्हेराचे संस्थानिक शिंदे यांच्या दरबारी सरदार होते [१]. सुशीलादेवींनी बी.ए. पदवी मिळवली. तसेच त्यांनी बी.टी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला होता. पुण्यातील आगरकर हायस्कुलात त्यांनी काही काळ शिक्षिकेची नोकरी केली [१]. सुशीलाबाईंचे लग्न पी.के.सावंत नावाच्या एका वकिलाशी झाले होते. ते मुंबई राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्यांच्याशी घटस्फोट घेऊन सुशीलाबाई पुण्यात आल्या आणि त्यांनी नाटकां-चित्रपटांत भूमिका करायला सुरुवात केली.
अभिनयक्षेत्रातील कारकीर्द
[संपादन]नागभूषण नवकुमार आणि लच्छूमहाराज यांच्याकडून नृत्य, तर पं. सदाशिवराव अमृतफुले, चम्मनखाँ आणि गणपतराव देवासकर यांच्याकडून सुशीलादेवी हिंदुस्तानी गायकी शिकल्या होत्या[१]. कलेच्या आवडीमुळे त्यांनी कुटुंबीयांचा विरोध पत्करून चित्रपटक्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आणि इ.स. १९४० सालातल्या लपंडाव चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. इ.स. १९४१ सालच्या "सिकंदर" या चित्रपटाने त्यां हिंदी चित्रपटात आल्या. पुढील काळात त्यांनी वसंतसेना, बाईलवेडा, पायाची दासी इत्यादी मराठी चित्रपटांतून, तसेच आँखमिचौली, महाकवी कालिदास, हातिमताई, शरबती आँखे, परबत पे अपना डेरा इत्यादी हिंदी चित्रपटांतून अभिनय केला.
पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेल्या "श्यामची आई"वर प्र.के. अत्र्यांनी श्यामची आई चित्रपट बनवला. त्यात श्यामच्या आईची मुख्य व्यक्तिरेखा वनमालाबाईंनी साकारली. हा चित्रपट आणि त्यातील त्यांनी रंगवलेली आईची व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरली. या भूमिकेसाठी त्यांना इ.स. १९५३ सालचा भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रपती पुरस्कार लाभला.
चित्रपटांशिवाय वनमालाबाईंनी मराठी नाटकांतूनही पात्रे रंगवली. त्यांनी रंगवलेल्या संगीत संशयकल्लोळ नाटकातील कृत्तिका, तसेच लग्नाची बेडी नाटकातील रश्मी या भूमिका विशेष गाजल्या.
निधन
[संपादन]आयुष्याच्या अखेरची काही वर्षे वनमालाबाईंना कर्करोगाने ग्रासले[२]. मे २९, इ.स. २००७ रोजी भारतातील मध्य प्रदेश राज्यात ग्वाल्हेरमुक्कामी त्यांचे निधन झाले.
पुरस्कार व मानसन्मान
[संपादन]वनमालाबाईंना श्यामची आई चित्रपटातील भूमिकेसाठी इ.स. १९५३ सालच्या भारतातील राष्ट्रपती पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र राज्य शासनानेही त्यांना व्ही. शांताराम पुरस्कार देऊन गौरवले.
आत्मचरित्र
[संपादन]वनमालाबाईंनी ’परतीचा प्रवास' या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.
हे सुद्धा वाचा
[संपादन]विनायक लिमये :अजरामर 'आई' Archived 2016-03-06 at the Wayback Machine.
संदर्भ
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |