Jump to content

श्यामची आई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्यामची आई[१] हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकथा आहे. नाशिकच्या कारागृहात असताना फेब्रुवारी ९, इ.स. १९३३ रोजी त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला. या पुस्तकाच्या ३ लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. इ.स. १९५३ साली या पुस्तकावर आधारित असलेला 'श्यामची आई' याच नावाचा चित्रपटदेखील पडद्यांवर झळकला. प्रल्हाद केशव अत्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

मातेबद्दल असणारे प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना ’श्यामची आई’ या पुस्तकात मांडलेल्या आहेत. नाशिकच्या तुरुंगात साने गुरुजींनी ही कथा ९ फेब्रुवारी, इ.स. १९३३ रोजी लिहावयास सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी, इ.स. १९३३ रोजी पहाटे त्या संपविल्या..

पुस्तकाचा आकृतिबंध[संपादन]

पुस्तकाच्या सुरुवातीस 'प्रस्तावना' व 'प्रारंभ' ही प्रकरणे आहेत आणि नंतर 'रात्र पहिली'पासून 'रात्र बेचाळिसावी'पर्यंत ४२ प्रकरणे आहेत

पहिली आवृत्ती[संपादन]

पुस्तकाची पहिली आवृत्ती १६ फेब्रुवरी १९३६ (दासनवमी शके १८५७) या दिवशी प्रसिद्ध झाली.


प्रताधिकारमुक्त आवृत्त्या[संपादन]

लेखकाच्या निधनानंतर साठ वर्षे पूर्ण झाली, की ते पुस्तक ‘कॉपी राईट’ कायद्यातून मुक्त होते. म्हणजे त्या पुस्तकाचे प्रकाशन करणे वा त्या पुस्तकातील मजकूर वापरण्यास कोणालाही परवानगी मिळते. या नियमाचा आधार घेऊन आज साने गुरुजींची श्यामची आई अनेक प्रकाशक प्रसिद्ध करत आहेत.

साने गुरुजी यांनी ‘श्यामची आई’ हे पुस्तक ‘अनाथ विद्यार्थी गृह’ या संस्थेस १९३५मध्ये प्रकाशनार्थ दिले. या संस्थेस या पुस्तकातून काही पैसे मिळावेत, हाही उद्देश होता. पूज्य साने गुरुजी हे अतिशय मृदू, संयमी व्यक्तिमत्त्वाचे होते. आपल्या एका लेखामुळे ‘अनाथ विद्यार्थी गृहा’चे काही नुकसान झाले, याचे शल्य गुरुजींना होते. त्या नुकसानीची भरपाई व्हावी अशा हेतूने ‘श्यामची आई’ हे पुस्तक गुरुजींनी ‘अनाथ विद्यार्थी गृहा’ला दिले.

दत्ता पुराणिक (निधन फेब्रुवारी २०१२) यांनी घरोघर जाऊन ‘श्यामची आई’ या पुस्तकाच्या वीस हजारांहून अधिक प्रती विकल्या. ते प्रकाशक नव्हते, विक्रेतेही नव्हते. केवळ साने गुरुजींवरील अपार श्रद्धेपोटी व समाजात सुसंस्काराची पेरणी व्हावी, या हेतूने पुराणिक आयुष्यभर पुस्तके घेऊन फिरत राहिले.

आजचा श्याम घडताना (पुस्तक)[संपादन]

सानेगुरुजींचा श्याम आणि त्याची आई हे घराघरांत आदर्श मानले गेले. हा श्याम आता पडद्याआड गेला असला, तरी त्याची जागा आता नव्या श्यामने घेतली आहे. आजचा श्याम कसा आहे आणि त्याची जडणघडण कशी झाली, हे या संपादित पुस्तकातून समजते.

आजचा श्याम पूर्वीच्या श्यामसारखा भाबडा किंवा संवेदनशील नाही. तो तंत्रज्ञान युगातील आहे आणि त्याची आईही कमविणारी, नोकरदार किंवा व्यावसायिक आहे. डॉ. मुरलीधर गोडे आणि श्री.वा. नेर्लेकर यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. मूळ श्यामची आई या पुस्तकातील संपादित भाग या पुस्तकात समाविष्ट केला आहे. अच्युत गोडबोले, रेणू दांडेकर, डॉ. विकास आमटे आदींचे लेखनही ह्या पुस्तकात समाविष्ट आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

विकिस्रोत
विकिस्रोत
श्यामची आई हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.

संदर्भ[संपादन]

  1. ^ साने. "श्यामची आई".