Jump to content

सिराज उद-दौला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मिर्झा मुहम्मद सिराज-उद-दौला तथा सिराज-उद-दौला (१७३३ - २ जुलै, १७५७) [१] हा बंगालचा शेवटचा स्वतंत्र नवाब होता. त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी बंगालवर आणि नंतर जवळजवळ संपूर्ण भारतीय उपखंडावर ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनाची सुरुवात झाली.

सिराज वयाच्या २३ व्या वर्षी एप्रिल १७५६ मध्ये त्याचे आजोबा अलीवर्दी खान यांच्यानंतर बंगालचा नवाब झाला. २३ जून १७५७ रोजी झालेल्या पलाशीच्या लढाईत रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखालील ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याविरुद्ध हरला व परिणामी बंगालचा कारभार कंपनीच्या हातात गेला.

पश्चिम बंगालमधील नदिया येथील पलाशी स्मारकातील सिराज उद-दौलाचा पुतळा.

पलाशीची लढाई[संपादन]

पलाशीच्या लढाईनंतर रॉबर्ट क्लाइव्ह आणि मीर जाफरची भेट. फ्रान्सिस हेमनने काढलेले काल्पनिक चित्र

पलाशीची लढाई ही भारतातील ब्रिटीश राजवटीची सुरुवात म्हणून उपखंडाच्या इतिहासातील महत्त्वाची घटना मानली जाते. सिराज-उद-दौलाने कलकत्ता जिंकल्यानंतर, किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी आणि हल्ल्याचा बदला घेण्यासाठी इंग्रजांनी मद्रासमधून नवीन सैन्य पाठवले. कोलकात्याहून परत निघालेल्या सिराज-उद-दौलाच्या सैन्याला पलाशी येथे इंग्रजांनी गाठले. बंगाली सैन्याला मुर्शिदाबादपासून २७ मैल दूर छावणी उभी करावी लागली. २३ जून १७५७ रोजी सिराज-उद-दौलाने मीर जाफरला भेटण्यास बोलावले. नवाबाने मीर जाफरकडे मदत मागितली. मीर जाफरने सिराजला माघार घेण्याचा सल्ला दिला. हे ऐकून सिराजने युद्ध थांबविण्याचा आदेश दिला.

नवाबाचे सैनिक आपापल्या छावण्यांमध्ये परत जात असताना रॉबर्ट क्लाइव्हने आपल्या सैन्यासह बंगाली सैन्यावर हल्ला केला. अशा अचानक झालेल्या हल्ल्याने सिराजचे सैन्य गडबडले आणि त्यांच्यातील बऱ्याचशा सैन्याने माघार घेतली व नंतर पळ काढला. सिराज उद दौलानेही तेथून पलायन केले वतो प्रथम मुर्शिदाबादला मन्सूरगंज येथील हीराझील आणि मोतीझील या त्याच्या राजवाड्यांमध्ये गेला. त्याने आपल्या सेनापतीला आपल्या सुरक्षेसाठी सैन्य लावण्याचा आदेश दिला परंतु हरलेल्या नवाबाचे ऐकण्यास त्याचे सैन्य तयार नव्हदे. काहींनी त्याला इंग्रजांच्या स्वाधीन होण्याचा सल्ला दिला तर इतरांनी सैन्याला अधिक बक्षिसे देऊन लढण्यास प्रोत्साहित करण्याचा सल्ला दिला.

नवाबाने आपल्या हरममधील बव्हंश स्त्रियांना सोने-नाणे आणि हत्तींसह मोहनलालच्या संरक्षणाखाली पूर्णिया येथे पाठवले आणि नंतर त्याची मुख्य पत्नी लुत्फ-उन-निसा आणि काही मोजक्या सेवकांसह सिराजने जहाजातूनने पाटण्याकडे पळ काढला परंतु मीर जाफरच्या सैनिकांनी त्याला अटक केली. [२]

मृत्यू[संपादन]

सिराज उद-दौलाची कबर

मीर जाफर आणि ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील कराराचा एक भाग म्हणून नमक हरम देवरी येथे मीर जाफरचा मुलगा मीर मिरान याच्या आदेशानुसार मोहम्मद अली बेग याने २ जुलै १७५७ रोजी सिराज-उद-दौलाचा वध केला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Dalrymple, W. (2019),The Anarchy p78, London: Bloombsbury
  2. ^ "We all know Siraj-ud-Daulah lost the Battle of Plassey. How did he escape afterwards?". Scroll.in. 19 August 2020 रोजी पाहिले.