समुद्र प्रदूषण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्राला समुद्र किनाला लाभलेला आहे. महाराष्ट्राचा समुद्रकिनारा देशात सर्वाधिक प्रदूषित आहे, असा निष्कर्ष गोव्याच्या राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेने आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संयुक्त अहवालात नुकताच काढला आहे. पश्‍चिम किनारपट्टीवरील सागरजलाचे अकराशे नमुने घेऊन त्यांच्या अभ्यासानंतर हे अनुमान काढल्याचे या संस्थांनी म्हटले आहे. या अहवालानुसार संपूर्ण पश्‍चिम किनाऱ्यापैकी महाराष्ट्राची ७२० किमी लांबीची किनारपट्टी सर्वांत जास्त प्रदूषित आहे. त्यातही मुंबई, गुजरातच्या किनाऱ्यावर हे प्रमाण लक्षणीय आहे. नदीमुखे आणि खाड्या हे किनाऱ्यावरील प्रदेश प्रदूषणामुळे जास्त बाधित आहेत.

या संदर्भात प्रस्तुत लेखकाने अलीकडेच केलेल्या संशोधनात या प्रदूषणाची समस्या खूपच तीव्र असल्याचे लक्षात आले. रत्‍नागिरी, सिंधुदुर्गचा किनारा तुलनेने कमी प्रदूषित असल्याचे या संस्थांनी म्हटले असले, तरी प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. बोर्डी, एलिफंटा, रेवदंडा, मुरुड, देवबाग अशा अनेक ठिकाणी सागरी प्रदूषणाचे दुष्परिणाम प्रकर्षाने दिसत आहेत. केवळ लहान मासेच नाहीत, तर डॉल्फिनसारखे मोठे मासे मरून पडल्याच्या घटना समोर येत आहेत. दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी, प्लॅस्टिक पदार्थ यामुळे कोकणातील खाड्या प्रदूषित झाल्या आहेत. या समस्येची वेळीच दखल घेतली नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल यात शंका नाही.

निवासी सांडपाणी, शेतजमिनीतून होणारे पाण्याचे निर्गमन, औद्योगिक संकुलांतून रसायनांचे व दूषित पदार्थांचे उत्सर्जन यामुळे सागरी प्रदूषण होते. किनारी प्रदूषकांचे सर्वांत जास्त प्रमाण हे मुंबईसारख्या नागरी वस्त्यांच्या जवळून वाहणाऱ्या नदीमुखातून म्हणजे खाड्यांतून होते आहे. किनारी शहरांजवळील वाळूच्या पुळणीवर (बीच) प्रदूषण इतके वाढले आहे, की या पुळणी पर्यटक व स्थानिकांसाठी बंद कराव्यात अशी परिस्थिती आहे. लाटांबरोबर व प्रवाहांबरोबर पुळण प्रदेशात खाड्यांतून वाहत येणारे दूषित, धोकादायक पाणी, पदार्थ आणि त्यामुळे वाढणारी रोगनिर्माणकारी अतिसूक्ष्म जीवजंतूंची पातळी भविष्यात मोठीच समस्या ठरू शकेल. रासायनिक प्रदूषके, तेलगळती, घरगुती सांडपाणी व मैलापाणी आणि इतर अनेक प्रकारच्या त्याज्य पदार्थांचे तरंगणारे गोळे, सिगारेटची थोटके, प्लॅस्टिक वस्तू यांचे प्रमाण वाढताना दिसते.

शहराजवळचे स्थानीय स्रोत जुने झाले असतील किंवा त्यावर ताण असेल, तर किनाऱ्यावरील प्रदूषण वेगाने वाढते. पाण्यातील बॅक्‍टेरियांची पातळी धोकादायक बनते. किनारी प्रदेशात शहरांचे सांडपाणी व कचरा टाकल्यामुळे पाणी तर दूषित होतेच; पण त्याचबरोबर पाण्यातील प्राणवायू कमी होतो, विषारी द्रव्ये वाढतात. ही सगळी प्रदूषके किनारी प्रदेशात दूरवर पसरल्यामुळे जवळपासची वेळणेश्वर, कुणकेश्वर, रेडी यासारखी अनेक खेडीही प्रदूषित होऊ लागली आहेत. अशा दूषित पाण्यात मासेमारी करणे, पोहणे शक्‍य होत नाही. जलजीवावर मोठे दुष्परिणाम होतात, रोगराई पसरते. जिथे पाणी साचून राहते अशा भागात प्राणवायू न मिळाल्यामुळे मासे मरतात. सांडपाणी व मैला यातील विषारी रसायने सूक्ष्म जलचर व मासे यांच्या अन्नात जातात. माशातून ही विषारी द्रव्ये शेवटी मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतात.

तेलगळती हा सागरी प्रदूषणाचा आणखी एक धोकादायक प्रकार आहे. २०१० च्या समुद्रातील तेलगळतीचा व तेलतवंगाचा महाराष्ट्राच्या किनारी पर्यावरणावर दूरगामी परिणाम झाला आहे. किनारी व सागरी प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन, औद्योगिक, रासायनिक, दूषित पदार्थांवर व तेलगळतीवर नियंत्रण अशा अनेक उपायांची गरज पश्‍चिम किनारपट्टीवरील गावांना जाणवते आहे.

अनिर्बंध उद्योगीकरण, रासायनिक आणि तेल कंपन्यांकडून समुद्रात जाणारे दूषित पाणी, नाल्यातील सांडपाणी या सगळ्यांचा परिणाम जैववैविध्यावर होतो आहे. मुंबईपासून ३० ते ५० किमी दूर समुद्रात प्राणवायूच नसल्यामुळे तिथे मासेही आढळत नाहीत. मुंबईपासून दीवपर्यंतच्या समुद्रात अतिघातक विषाणू असल्यामुळे तिथे जीवसृष्टी शिल्लक राहणेच अशक्‍य असल्याचे निरीक्षण संयुक्त अहवालात मांडलेले आहे. मुंबई आणि उपनगरे, तारापूर, वसई, मनोरी, वर्सोवा, वांद्रे, माहीम, वरळी, ठाणे, पाताळगंगा आणि अलिबाग या सर्व ठिकाणी प्रामुख्याने घरगुती सांडपाणी, उद्योगीकरण, ऊर्जा प्रकल्प यामुळेच प्रदूषणात वाढ झाल्याचे लक्षात आले आहे. उर्वरित किनाऱ्यांवर मात्र पर्यटनामुळे, सांडपाण्यामुळे आणि सरकारी व स्थानिक पातळीवर असलेल्या असंवेदनशीलपणामुळे ही समस्या उग्र रूप धारण करीत असल्याचे दिसून येत आहे.

स्वच्छ भारत अभियानाचे फलक कोकण किनाऱ्यावर आज हमखास दिसतात. मात्र किनाऱ्यांची स्वच्छता आणि प्रदूषणापासून त्यांची मुक्ती कोणी आणि कशी करायची आणि कदाचित का करायची, या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत अस्वच्छ किनाऱ्यांचे हे वास्तव बदलेल असे वाटत नाही.