सदस्य:रेखा एकनाथ कुलकर्णी/धूळपाटी २

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पद्मा मुकुंद सहस्त्रबुद्धे'

पद्मा सहस्रबुद्धे यांचे पूर्वाश्रमीचे नाव पद्मा विनायक गोरे असे होते, त्या मुखपृष्ठ चित्रकार होत्या.[१] त्यांचा जन्म एप्रिल २८ इ.स. १९३४[२] मध्ये झाला होता.

बालपण आणि शैक्षणिक आयुष्पद्मा सहस्रबुद्धे या मूळच्या गोरे. आई सरस्वती व वडील विनायक गोरे यांच्याकडून त्यांना संस्काराचे उत्तम बाळकडू मिळाले. त्यांचे शालेय शिक्षण दादर भागातील राजा शिवाजी विद्यालयात (किंग जॉर्ज) झाले. तेथून त्या १९४९ साली एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण झाल्या. घरातील सुसंस्कृत वातावरणामुळे त्यांना चित्रकलेचे उच्च शिक्षण घेण्यास विरोध झाला नाही; परंतु दादर ते सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट असा त्या काळी लांब वाटणारा प्रवास करण्यास संमती नसल्याकारणाने १९५० साली त्यांनी दादर येथील मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांना चित्रकार एम.एस. जोशी, नाना ठोसर, आर.पी. जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. पुढे मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूटमधून त्या डिप्लोमाची परीक्षा उत्तीर्ण झाल्या.[संपादन]

चित्रकेलेची सुरुवात आणि कारकीर्द[संपादन]

या काळात मुली चित्रकला शिक्षण घेत; पण त्यामागे चित्रकला शिक्षक होऊन नोकरी मिळवण्याचा मुख्य हेतू असे. पद्मा गोरे या नेहेमीच्या मार्गाने गेल्या नाहीत.[३] अॅडव्हान्सला शिकत असतानाच त्यांनी लेखाच्या शेवटी टाकायची संकल्पने ‘टेल पिसेस’ करण्यास सुरुवात केली. ‘मौज’ या प्रकाशन संस्थेमध्ये काम करणारे ‘सत्यकथे’चे संपादक राम पटवर्धन व गोरे कुटुंबीय यांचे घरोब्याचे संबंध होते. राम पटवर्धन यांच्या प्रोत्साहनामुळे पद्मा गोरे यांनी १९५३ पासून ‘सत्यकथा’ मासिकासाठी कथाचित्रे काढण्यास सुरुवात केली. १९५४ मध्ये पद्मा गोरे यांचा विवाह मुकुंद गणेश सहस्रबुद्धे यांच्याशी झाला. सहस्रबुद्धे कुटुंबीय कला, साहित्य, संगीत यांची अभिरुची असणारे असल्याने पद्मा यांना कला शिक्षण घेण्यास व कला क्षेत्रात काम करण्यास उत्तेजन मिळाले. या काळातील जनमानसावरच नव्हे, तर चित्रकारांवरही दलाल — मुळगावकर यांच्या चित्रशैलीचा प्रभाव होता. त्यांच्या चित्रांतील स्वप्निल वातावरण पद्मा सहस्रबुद्धे यांना तितकेसे भावले नाही; पण दलाल - मुळगावकर यांच्या रेषा, रचना व रंगसंगतीचा त्यांनी अभ्यास केला. त्या काळी या प्रकारच्या कलाक्षेत्रामध्ये स्त्री-चित्रकार दिसत नसत. प्रापंचिक जबाबदार्या आणि कलानिर्मिती ही तारेवरची कसरत करत पद्मा सहस्रबुद्धे यांना या कामातील बारकावे शिकावे लागले. या दरम्यान त्यांचे विविध प्रकाशन संस्था, श्री.पु. भागवत, रामदास भटकळ यांच्यासारखे प्रकाशक व अनेक लेखक-कवींशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. या मैत्रपरिवाराशी होणार्या संवादांतून त्यांना मुखपृष्ठ, तसेच कलानिर्मितीच्या शक्यता व छपाईतील मर्यादा कळत गेल्या. त्या काळी अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. रेखाटने, ट्रेसिंग व मर्यादित रंगांचा वापर करून मुखपृष्ठांची निर्मिती करावी लागे. या तंत्रातील बारकावे, त्यांनी स्वत:च स्वत:चे समीक्षण करत आत्मसात केले. त्याच वेळी लेखनातील भावार्थाला महत्त्व देण्याचे वैशिष्ट्यही त्यांनी त्यांच्या कलानिर्मितीत राखलेले दिसते. या अभ्यासातून स्वत:ची शैली विकसित करताना आकारांमधले अतिअलंकरण टाळून सहज आकार आणि साहित्याचा भाव व्यक्त करणारे चित्रण याला त्यांनी प्राधान्य दिले. १९५३-५४ च्या काळात काम करताना तंत्रज्ञानाच्या मर्यादा ओळखून त्यांनी काळ्या-पांढर्या रंगांचा समर्पक उपयोग केला. श्री.ना. पेंडसे यांची कादंबरी ‘यशोदा’ हे त्यांचे पहिले मुखपृष्ठ. त्या काळातील त्यांच्या चित्रात क्रेयॉन वापरून केलेला काळ्या रंगाचा ठसठशीत वापर आढळतो. ‘पैस’ या दुर्गा भागवतांच्या लेखसंग्रहाला केलेल्या मुखपृष्ठासाठी काळया रंगाचा असाच वापर केलेला आहे. निसर्गचित्रातील कमीतकमी घटकांचा वापर करून त्यांनी जो अवकाशाचा परिणाम साधला आहेे, तो दुर्गा भागवतांच्या भाविक अवकाशाशी आणि ‘पैस’ या शीर्षकाशी संवाद साधतो. प्रचलित गोड, आखीव-रेखीव किंवा अलंकृत मुखपृष्ठ रचनेत हा वेगळेपणा नक्कीच लक्षवेधक होता. १९५७ साली माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या कविश्रेष्ठ ग.दि. माडगुळकर यांच्या ‘गीतरामायण’ या पुस्तकामधील रेखाटने हे त्यांच्या चित्रशैलीचे महत्त्वाचे उदाहरण म्हणता येईल. सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘वाङ्मय शोभा’[४], ‘मौज’, ‘सत्यकथा’ या अंकांची आतील सजावट व ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पहिल्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ केले. नंतरच्या काळात श्री.ना. पेंडसे, गो.नि. दांडेकर, इंदिरा संत, दुर्गा भागवत, चिं.त्र्यं. खानोलकर, बा.भ. बोरकर, प्रकाश नारायण संत, पु.शि. रेगे, विंदा करंदीकर, ना.धों. महानोर ग्रेस, सुनीता देशपांडे, मंगेश पाडगावकर, शंकर वैद्य, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर, सानिया, गौरी देशपांडे, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष अशा अनेक प्रथितयश; पण भिन्न लेखनप्रकृती असलेल्या कवि-लेखकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे करण्याची त्यांना संधी मिळाली. बालवाङ्मयात त्यांनी विंदा करंदीकर, सरिता पदकी, शिरीष पै अशा कवि-कवयित्रींची पुस्तके, ‘किशोर’ मासिकासाठी चित्रे इत्यादी कामे केली. गजानन जहागीरदार यांचे चरित्र, लता मंगेशकर व श्रीनिवास खळे गौरवग्रंथ हे त्यांच्या चित्रनिर्मितीतून साकारले गेले.

महत्वाची कारकीर्द[संपादन]

श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे ‘डोह’, महाराष्ट्र राज्य गांधी शताब्दी समितीचे ‘युगात्मा’, हेमा लेले यांचे ‘आत्मनेपदी’ अशा पुस्तकांची मुखपृष्ठे तंत्र व शैली यांच्या वापरातून पद्मा सहस्रबुद्धे यांनी उल्लेखनीय केली आहेत.[५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Bose, Mandakranta (2004-09-30). The R-am-aya.na Revisited (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 978-0-19-803763-7.
  2. ^ बागुल, देविदास (२०१३). पद्मा सहस्त्रबुद्धे. पुणे: हिंदुस्थान publishers. pp. ७२४.
  3. ^ बागुल, देविदास (२०१३). पद्मा सहस्रबुद्धे. पुणे: हिंदुस्थान publishers. pp. ७२४.
  4. ^ Kulkarni, Aniruddha G. Looking at Cartoons, Getting Along http://searchingforlaugh.blogspot.com/2013/08/mukhprushtha-shobha-vangmay-shobha.html. 2020-03-06 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ बागुल, देविदास (२०१३). पद्मा सहस्त्रबुद्धे. पुणे: हिंदुस्थान publishers. pp. ७२४.