संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्य मानले जाते.[१] श्री क्षेत्र आळंदी येथून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आषाढी एकादशीचा आदल्या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचते. या वारीचा मार्ग निश्चित ठरलेला असतो. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका रथात ठेवल्या जातात. या रथाच्या पुढे आणि मागे वारकरी मंडळीं आपापल्या दिंडीतून पायी चालत जातात.[२]

इतिहास[संपादन]

पालखी सोहळा वारकरी भजन

ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे पायी वारी करीत असत असे संदर्भ मिळतात.[३] त्यांच्यानंतर ज्ञानेश्वर इत्यादी भावंडे यांनी वारीची परंपरा सुरू ठेवली.[४] श्री हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी-समारंभांसह, थाटाने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली.[५] तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे. श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब (औंध) यांच्याकडून येत असे. या खर्चास साहाय्य त्या त्या वेळचे राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे. पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे. सरकारने इ.स. १८५२ मध्ये पंचकमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली.

पालखी मार्ग[संपादन]

भजन गाणाऱ्या वारकरी महिला

संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पुढील मार्गाने मार्गक्रमण करते.[६]

आळंदी

पुणे

सासवड

जेजुरी

वाल्हे

लोणंद

तरडगाव

फलटण

बरड

माळशिरस

वेळापूर

भंडी शेगाव

वाखरी

पंढरपूर

रिंगण[संपादन]

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये सोहळ्यातले एक महत्वाचे आकर्षण म्हणजे रिंगण. हा कार्यक्रम पालखीत सहभागी वारकऱ्यांबरोबरच स्थानिक लोकांचा व माध्यमांच्या आकर्षणाचा विषय असतो. रिंगण म्हणजे एक प्रकारचा खेळ म्हणता येईल. रिंगण चा शब्दशः अर्थ म्हणजे वर्तुळ. रिंगण म्हणजे म्हणजे पालखी भोवती गोल फिरणे

रिंगणचे ठिकाण म्हणजे मोठे मैदान. प्रत्येक पालखी सोहळ्याची रिंगणाची ठिकाणे ठरलेली आहेत. रिंगणासाठी पालखी सोहळ्यातील भाविकांच्या संख्येनुसार मोकळी जागा लागते. काही सोहळ्यांमध्ये सहभागी वारकऱ्यांच्या वाढत्या संख्येनुसार रिंगणाची जागा बदलण्यात आली आहे. पालखी सोहळा वाटचाल करत रिंगणाच्या ठिकाणी पोचतो तेव्हा आधी चोपदार रिंगण लावतात. यामध्ये मध्यभागी पालखी, पालखीच्या सभोवती पताकाधारी वारकरी व दिंड्या, त्याभोवती रिंगणासाठी मोकळी जागा व पुन्हा त्याभोवती दिंड्या व रिंगण बघायला आलेले भाविक उभे रहातात. रिंगण लावणे हे कौशल्याचे काम आहे. चोपदारांचे कौशल्य व वारकऱ्यांची शिस्त याठिकाणी दिसून येते. रिंगण हे २ प्रकारचे होते.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी वेळापत्रक २०२३

दिनांक पालखीचा मुक्काम
11 जून 2023 आळंदीहून प्रस्थान
12,13 जून 2023 पुणे मुक्कामी
14,15 जून 2023 सासवड
16 जून 2023 जेजूरी
17 जून 2023 वाल्हे
18,19 जून 2023 लोणंद
20 जून 2023 तरडगाव
21 जून 2023 फलटण
22 जून 2023 बरड
23 जून 2023 नातेपुते
24 जून 2023 माळशिरस
25 जून 2023 वेळापूर
26 जून 2023 भंडीशेगांव
27 जून 2023 वाखरी
28 जून 2023 पंढरपुर मुक्कामी
29 जून 2023 आषाढी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रिंगण खालील प्रमाणे होणार आहे.

उभे रिंगण
25 जून 2023 माळीनगर
27 जून 2023 बाजीराव विहीर
28 जून 2023 पादुका आरती
गोल रिंगण
19 जून 2023 काटेवाडी (मेंढ्यांचे गोल रिंगण)
20 जून 2023 बेलवंडी
22 जून 2023 इंदापूर
24 जून 2023 अकलुज माने विद्यालय

अश्व आणि बैलजोडी[संपादन]

संत ज्ञानेश्वर महाराज यांचा रथ ओढण्यासाठी दरवर्षी नवी बैलजोडी त्यांना अर्पण केली जाते.यासाठी विविध कुटुंबातील बैल जोडीचे परीक्षण करून उत्तम असे बैल निवडले जातात. या जोडीने ज्ञानेश्वर माऊली हे स्वतः त्यांच्या आश्र्वावर आरूढ होऊन रिंगण करतात अशी वारकरी संप्रदायाची श्रद्धा आहे. यासाठी रथाच्या पुढे माऊलींचा अश्व म्हणजे घोडा असतो. या अश्वाला विशेष आदराचे स्थान वारीमध्ये दिले जाते.[७]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Mokashi, D. B. (1987-07-01). Palkhi: An Indian Pilgrimage (इंग्रजी भाषेत). SUNY Press. ISBN 978-0-88706-462-3.
  2. ^ "Ashadhi Wari : अलंकापुरीकडे वारकऱ्यांची रीघ; असा असेल पालखी मार्ग". सकाळ. 2022-06-28 रोजी पाहिले.
  3. ^ मोरे, धनंजय महाराज. संत चरित्र: SANT CHARITR. Dhananajay Maharaj More.
  4. ^ Joshi, Dinkar (2005). Glimpses of Indian Culture (इंग्रजी भाषेत). Star Publications. ISBN 978-81-7650-190-3.
  5. ^ श्रीविठ्ठलदर्शन. सुदर्शन प्रकाशन. 2005.
  6. ^ "Pandharpur Wari : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा; जाणून घ्या कार्यक्रम". साम टीव्ही. 2022-06-28 रोजी पाहिले.
  7. ^ "Ashadhi Wari 2022 : माऊलींच्या मानाच्या अश्वांचे आळंदीकडे प्रस्थान, 20 जूनला पोहोचणार". एबीपी माझा. 2022-06-10. 2022-06-28 रोजी पाहिले.