Jump to content

शेकरू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शेकरु या पानावरून पुनर्निर्देशित)
शेकरू

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: कृंतक
कुळ: शायिकाद्य
जातकुळी: रॅटुफा
जीव: रॅ. इंडिका
शास्त्रीय नाव
रॅटुफा इंडिका
(एर्क्सलेबन, इ.स. १७७७)

रॅटुफा इंडिका

शेकरू (उडती खार; शास्त्रीय नाव: Ratufa indica, रॅटुफा इंडिका ; इंग्लिश: Indian giant squirrel, इंडियन जायंट स्क्विरल) ही खारींची एक प्रजाती आहे. शेकरू महाराष्ट्र राज्याचा राज्यपशू आहे. शेकरू हा पशु भीमाशंकर या भागात जास्त प्रमाणात आढळून येतो.

आढळ[संपादन]

महाराष्ट्रातील आढळ[संपादन]

राज्य प्राणी म्हणून ओळखला जाणारा शेकरू, एकेकाळी गोव्यातला बऱ्याच सधन जंगलांचे वैशिष्ट्य होता. इंडियन जायंट स्क्विरल या नावाने इंग्रजीत प्रचलित असलेली ही मोठी खार पानगळीच्या जंगलात माडत {?), किंदळ (?), उंबर सारख्या झाडांवर हमखास आढळायची. परंतु आज त्यांचा नैसर्गिक अधिवास जंगल तोडीमुळे संकटात सापडलेला आहे.

महाराष्ट्रात भीमाशंकर, फणसाड, आंबा घाटाजवळील जंगलात, आजोबा डोंगररांगात, माहुलीवासोटा परिसरात शेकरू आढळतो. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा वनपरिक्षेत्रात रायपूर जंगलात शेकरू पार्क 30 हेक्टर जागेत संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात आले असून त्या ठिकाणी शेकरू आहेत. मेळघाट अभयारण्य, ताडोबा राष्ट्रीय उद्यान येथेही तो दिसतो.

शरीररचना[संपादन]

शेकरूचे वजन दोन ते अडीच किलो व लांबी अडीच ते तीन फूट असते. त्याला गुंजेसारखे लालभडक डोळे, मिशा, अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांबलचक शेपूट असते.[ संदर्भ हवा ]

जीवनकाल[संपादन]

शेकरूची मादी वर्षातून एकदाच डिसेंबर-जानेवारीमध्ये पिलाला जन्म देते. एक शेकरु सहा ते आठ घरे तयार करतो. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर सहज झेप घेणारा शेकरू १५ ते २० फुटांची लांब उडी मारू शकतो. शेकरू डहाळ्या व पाने वापरून गोलाकार आकाराचे घरटे बनवते. सुरक्षेसाठी हे घरटे बारीक फांद्यांवर बांधले जाते, जेथे अवजड परभक्षी पोहोचू शकत नाहीत.[२]

वर्णन आणि उपप्रजाती[संपादन]

शेकरू हा अतिशय देखणा आणि झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दाट जंगलात याचे वास्तव्य असते. अलीकडे मात्र तळकोकणात वस्त्यालगत त्याची संख्या नजरेला भरण्याइतकी वाढली आहे. विशेषतः सह्याद्रीलगत असलेल्या नारळ, पोफळींच्या बागांमध्ये हा प्राणी हमखास दर्शन देऊ लागला आहे. दाट लाल रंगाचा, आकर्षक शेपटी असलेल्या शेकरूच्या जोड्या नारळाच्या बागांमधून लीलया उड्या मारताना दिसतात. पूर्वी इतक्‍या सहज वस्त्यांलगत त्याचे दर्शन होत नसे. या प्राण्याकडून विशेषतः नारळाचे मोठे नुकसानही होत आहे.[ संदर्भ हवा ]

खारीच्या वर्गात येणारा हा प्राणी आकाराने मोठा असतो. भारतात जायंट स्क्विरल प्रजातीच्याच्या एकूण ७ उपप्रजाती आढळतात. त्यापैकी 'राटूफा इंडिका' (RATUFA INDICA) ही उपप्रजाती फक्त महाराष्ट्रात आढळते.[ संदर्भ हवा ]

भीमाशंकरी जात[संपादन]

महाराष्ट्रातील भीमाशंकरी जात

शेकरूची भीमाशंकरच्या जंगलात आढळणारी भीमाशंकरी ही राज्यातील इतर शेकरूपेक्षा वेगळी जात आहे. भीमाशंकर, मध्य प्रदेश या भागात आढळणारे शेकरू आणि सह्याद्रीतील शेकरू यात थोडाफार फरक असतो. आतापर्यंत याचे तळकोकणात दाट जंगलात अगदी विरळ दर्शन होत असे. तो थोडा लाजरा आणि उंच झाडावर वास्तव्य करून राहणारा प्राणी आहे. त्याची घरटे बांधण्याची पद्धत वेगळी असते. एका झाडावर अनेक ठिकाणी तो घरटी बांधतो. यातील एखाद्या घरट्यातच शेकरूची मादी पिले देतो. या फसव्या घरट्यामुळे पिल्लांचे शत्रूपासून रक्षण होते. आता तो तळकोकणात वस्त्यालगत इतक्‍या मोठ्या प्रमाणात का दिसतो, याबाबत प्राणी अभ्यासकांत एकमत नाही. काहींच्या मते याची संख्या वाढली असावी; पण दुर्मिळ असल्याने संख्या वाढायलाही मर्यादा आहेत. दाट जंगलातील खाद्य कमी झाल्यामुळे तो वस्तीकडे येण्याची शक्‍यताही काही अभ्यासकांनी वर्तविली.

भीमाशंकरी शेकरूसंबंधी विशे़ष संशोधन[संपादन]

१९८५ च्या आसपास रेने बोर्जेस (Renee Borges) यांनी आपल्या संशोधनाची सुरुवातीची पाच वर्षे भीमाशंकरच्या अभयारण्यात व्यतीत केली होती. रेने यांनी मुंबईतल्या झेवियर्स कॉलेजमधून शिकून पुढे प्राणिशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्रातील पदवी आणि प्राण्याचे शरीरशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्या पीएच्‌.डी.साठी फ्लोरिडा-अमॆरिकेतील मायामी विद्यापीठात दाखल झाल्या.[ संदर्भ हवा ] पीएच्‌डीसाठी निवडलेला त्यांचा प्रकल्प हा शेकरू (जायंट स्क्विरल) होता. त्यासाठी त्यांनी भारतात गोव्यातील नागोड आणि महाराष्ट्रातील भीमाशंकर या दोन ठिकाणांची निवड केली. या दोन्ही जंगलांमध्ये त्या एक एक वर्ष तळ ठोकून होत्या. त्यांच्या पीएच्.डी.च्या अभ्यासाच्या काळातच भीमाशंकर अभयारण्य घोषित होण्याच्या हालचाली सुरू होत्या. ज्या शेकरूमुळे या अभयारण्याचे नाव गाजत होते, त्या शेकरूच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना असणे गरजेचे होते. त्याची महाराष्ट्र वनखात्याकडे उणीव होती. त्या वेळी रेने बोर्जेस यांनी पुढील पाच वर्षे भीमाशंकरचे जंगल पिंजून काढले.[ संदर्भ हवा ] शेकरूचे अधिवास, त्याला लागणारं खाद्य पुरवणाऱ्या वनस्पती आणि त्या अनुषंगाने एकूणच भीमाशंकरची जैवविविधता याच्या सर्वंकष नोंदी त्यांच्या अभ्यासातून झाल्या. आजही त्यांच्या अभ्यासाचा आधार भीमाशंकरच्या संवर्धनासाठी महत्त्वाचा मानला जातो.

खाद्य[संपादन]

विविध प्रकारची फळे व फुलांतील मधुरसाचे भक्षण हे त्याचे खाद्य असते.

संकीर्ण[संपादन]

इ.स. १९९५ साली पुणे व पिंपरी-चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धांंचा शुभंकर (Mascot-बोधचिन्ह) शेकरू होता.[ संदर्भ हवा ] १२ जानेवारी २०२४ रोजी नाशिक येथे आयोजित २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचा शुभंकर शेकरू होता.

चित्रदालन[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ Rajamani, N., Molur, S. & Nameer, P. O. "Ratufa indica". असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आवृत्ती 2008. 6 January 2009 रोजी पाहिले.CS1 maint: ref=harv (link)
  2. ^ प्रेटर, एस.एच. The Book of Indian Animals (इंग्रजी भाषेत). १ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.