जास्वंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जास्वंद
जास्वंद
जास्वंद
शास्त्रीय वर्गीकरण
जातकुळी: हिबिसकस
जीव: रोजा-सायनांसिस

जास्वंद ही एक फुले देणारी बहुवार्षिक वनस्पती आहे.

  • इतर नावे: हरिवल्लभ, जयपुष्पी, रक्तपुष्पी, रुद्रपुष्पी, जपा(संस्कृत), अरुणा, जासुम, जवाकुसुम, रोझेला, जमेका सॉरेल, शू-फ्लॉवर, चायना ही नावे आहे.

भारतातील जास्वंदी ही बहुधा झुडुप स्वरूपात असते. जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसला, तरीही ती वनस्पती बरीच लोकप्रिय आहे. साहजिकच हे फुलझाड अनेक घरांच्या सभोवताली दिसून येते. जास्वंदीची श्वेत, लालबुंद, पीतरंगी, भगवी, गुलाबी किंवा जांभळी फुले सार्वजनिक उद्यानांत उठून दिसतात. जास्वंदीच्या फुलाचे बाह्यस्वरूप आकर्षक असते. मधमाश्‍या, फुलपाखरे आणि काही पक्षी या फुलाकडे आकर्षित होतात. पण हे फूल फार काळ टिकत नाही. सकाळी टवटवीत सौंदर्य उधळणारे हे फूल संध्याकाळी मलूल दिसते. असे म्हटले जाते की श्री गणेशाला इतर फुलांपेक्षा जास्वंदीचे फुल प्रिय आहे.

उपयोग[संपादन]

जास्वंदीच्या फुलांचा उपयोग केस धुण्यासाठी होतो. जास्वंदीच अर्क घातलेले केशतेल जबाकुसुम म्हणून प्रसिद्ध आहे. शाम्पूमध्ये एक घटक म्हणून जास्वंदीच्या पाना-फुलांच्या अर्काचा समावेश होतो. इजिप्तमध्ये ते लघवी साफ होण्यासाठी डाययुरेटिक (मूत्रल) म्हणून वापरतात. इराणमधील वैद्य रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी एक घटक म्हणून त्याचा वापर करतात. ही वनस्पती एक सौम्य रेचक म्हणूनही उपयोगात आहे.पोट साफ करण्यासाठी, तर काही देशांमध्ये चक्क भाजी करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. अनेक महिला फुलांमधील नानाविध रंग सरबतांसाठी किंवा जाम-जेलीसारख्या उपयोगातनायजेरियात खाद्यपदार्थांमध्येही वापरतात. काही फुलांचा रंग उकळत्या पाण्यात बाहेर पडतो. मेक्‍सिकोमध्ये तर जास्वंदीच्या वाळलेल्या फुलांपासून एक चविष्ट खाद्यपदार्थ तयार केला जातो.

जास्वंदाचा समावेश असलेल्या चहाच्या डिप-डिप पुड्या हा एक फार मोठी जागतिक बाजारपेठ लाभलेला व्यवसाय आहे. चहाला लालसर किंवा पिवळसर रंग प्राप्त व्हावा म्हणून वेगवेगळ्या रंगांच्या फुलांचा वापर केला जातो. याचे रंगीत पेय हे शीत किंवा गरम पेय म्हणून वापरता येतं. या गरम पेयामार्फत सूक्ष्म प्रमाणात लोह, ताम्र, जस्त (झिंक), ब-१, ब-२ आणि क ही जीवनसत्त्त्वे शरीराला मिळू शकतात. या पेयाच्या सेवनामुळे अपायकारक लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल कमी होते आणि हितकारक हाय डेन्सिटी कोलेस्टेरॉल वाढते. तसेच रक्तशर्करा, रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. हे पेय पाचक आहे. ज्याला तीव्र उदासीनतेची बाधा झाली आहे, त्यांच्यासाठी जास्वंदयुक्त चहा गुणकारी असल्याचे निष्कर्ष प्राप्त झालेले आहेत. जास्वंदीच्या फुलांचे असे काही गुणधर्म आधीपासूनच माहिती झालेले असले, तरी त्यासंबंधीचे सखोल संशोधन चालूच असते. जास्वंदीमुळे चहाला लाल किंवा पिवळसर रंग येण्याचे कारण म्हणजे फुलात असलेली फ्ल्याओनाईड, डेल्फिनिडिन, सायनिडिन, अन्थोसायनिंस ही सेंद्रिय द्रव्ये.. शरीरातच तयार होणारी फ्री-रॅडिकलवर्गीय रसायने निष्प्रभ करणे गरजेचे असते. त्याकरिता हिबिस्कसच्या चहात जे प्रोटोकॅटेचुइक आम्ल असते, ते ॲन्टि-ऑक्‍सिडन्ट म्हणून उत्तम कार्य करते. फिटनेस तज्ञांचा असा विश्वास आहे की या विशेष प्रकारचा चहा ऊर्जा, ताजेपणा आणि वजन कमी करण्यास मदत करु शकतो. यामध्ये पॉलिफेनोल्स कंपाऊंड असते आणि शरीरात ॲंटीऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. हा चहा अल्झायमरची शक्यता सुद्धा कमी करतो, पण ह्या चहाचा अतिरेक होऊ नये

जास्वंदवर्गीय वनस्पतींचे सुमारे सव्वादोनशे प्रकार आहेत. त्यातील काही पाच-सहा मीटर उंच वाढतात. उंच वाढणाऱ्यांत "हिबिस्कस कॅनाबिनस' ही जात असून, ती त्याच्या लाकडासाठी प्रसिद्ध आहे. भरपूर सेल्युलोजयुक्त कर्बोदके असलेल्या या वनस्पतीला "केनाफ' म्हणतात आणि कागदनिर्मितीच्या उद्योगात तो एक महत्त्वाचा कच्चा माल आहे. काही प्रकारांमधील फुलांना मंद सुगंध असतो. तागाच्या वनस्पतीचे जसे तंतू निघतात, त्याप्रमाणे "हिबिस्क्‍स सब्दारिफा' या वाणाचेही शोभिवंत धागे निघतात. काही देशांमध्ये त्याचा स्कर्ट बनवतात. तसेच धाग्यांचा उपयोग केसांचा टोप बनविण्याकरितादेखील केला जातो.

भौतिक शास्त्रात उपयोग[संपादन]

भौतिकीशास्त्रामध्ये फोटॉनिक्‍स, ऑप्टो-इलेक्‍टॉनिक्‍स किंवा ऑप्टिक्‍स (प्रकाशकी) या शाखांचे महत्त्व वाढत आहे. ऑप्टिकल फायबरमार्फत टेलिकम्युनिकेशन, माहिती-तंत्रज्ञान संकलन, होलोग्राफी, रोबोटिक्‍स, शस्त्रक्रिया (उदाहरणार्थ डोळ्यांचा नंबर कमी करणे) अशा अनेक उपयोगांसाठी त्याचा थेट संबंध आहे. त्यासाठी लागणाऱ्या अनेक उपकरणांमध्ये प्रकाशाचा विशिष्ट वक्रीभवनांक (नॉन-लिनिअर रिफ्रॅक्‍टिव्ह इंडेक्‍स) असलेले रंगद्रव्य आवश्‍यक असते. सध्या त्यासाठी बहुधा कृत्रिम असेंद्रिय रसायने वापरली जातात.. पण ती यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यासाठी उच्च क्षमतेच्या महागड्या लेसर किरणांची आवश्‍यकता असते. हा अडथळा दूर करण्यासाठी योग्य अशाच वक्रीभवनांकाचे स्वस्त, पण मस्त असे "मटेरियल' जास्वंदीच्या पानांनी क्‍लोरोफिल आणि कॅरोटेनॉईडच्या स्वरूपात रंगद्रव्ये प्राप्त करून दिले आहे.

जास्वंदीचे फूल एखाद्या कागदाच्या कपट्यावर चिरडले की लिटमस पेपरचा गुणधर्म असलेला निळा पेपर तयार होतो. आम्लधर्मी पदार्थात बुडवला की तो लाल होतो.

चित्रदालन(वेगवेगळ्या रंगाचे जास्वंद)[संपादन]

  1. Flower of Hibiscus rosa-sinensis--in Kerala