Jump to content

आपटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आपटा

आपटा हे एक झाड आहे. आपट्यास संस्कृत मध्ये अश्मंतक असे म्हणतात. आपटयाला शास्त्रीय नाव बौहिनिया रेसीमोसा Bouhinia racemosa आहे. या कुलातील झाडांना दोन दले असलेली पाने असल्यामुळे बौहिनिया हे नाव सोळाव्या शतकातील वनस्पतीशास्त्रज्ञ जॉन व कॅस्पर बौहिन या दोन भावांच्या स्मरणार्थ देण्यात आले आहे.[]

आपटा पानझडी वनांत आढळणारे झाड आहे. प्रामुख्याने भारत, श्रीलंकाचीन या देशांतील जंगलात आपट्याची झाडे आढळून येतात. हे झाड भारतभरात सर्वत्र आढळते.[]

रचना

[संपादन]

आपट्याचे झाड सरळ न वाढता वेडेवाकडे वाढत असते. याला भरपूर फांद्या असतात. याची पाने जुळी असतात, ती काळसर हिरव्या रंगाची असतात. याच्या शेंगा या लंबगोल व चपट्या आकाराच्या असतात. पाने साधी, दोन भागात विभागलेली असून वरून हिरवी तर खालून पांढऱ्या रंगाची असतात. फेब्रुवारी ते मे या काळात या झाडाला लहान, पांढरी, पिवळसर फुले येतात. फुलाला पाच पाकळ्या आणि दहा पुकेसर असतात. शेंगा चपट्या आणि वाकड्या असून १५ ते २५ सेमी लांबीच्या आणि १.८ ते २.५ सेमी रुंदीच्या असतात. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये शेंगा पिकतात आणि उन्हाळ्यात गळून पडतात.

बौहीनिया जातीतील झाडांची पाने एकाच आकाराची असतात. कांचन हे झाडसुद्धा याच प्रजातीतील आहे.

उपयोग

[संपादन]

आपटा (बाउहिनिया रेसिमोसा) हे झाड बहुगुणी औषधी वनस्पती आहे. याची पाने, शेंगांच्या बिया, फुले व झाडाची साल औषध म्हणून वापर केला जातो. सालीपासून दोरखंड बनवतात. झाडापासून डिंकही मिळवला जातो. या झाडापासून टॅनिन मिळते. गुजरातमध्ये पानांचा उपयोग विडी बनविण्याकरिता केला जातो. जुन्या काळात तोटयाच्या बंदुका वापरत, त्यासाठी लागणाऱ्या वाती या झाडाच्या आंतरसालीपासुन तयार होत असत .

आपट्याचे अश्‍मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्‍मंतक म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात, अक्षरशः फुटतात. त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्‍या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. अश्‍मंतक याचा दुसरा अर्थ "मूतखडा (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.[]' धन्वन्तरी निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत.

अश्‍मनंतकः कषायस्तु हिमः पित्तकफापहः।
मधुरः शीतसंग्राही दाहतृष्णाप्रमेहजित्‌ ।।

पित्त आणि कफदोषांवर गुणकारी; दाह, तृष्णा आणि प्रमेह यांवर विजय मिळवणारा.

तेंदू पत्त्याप्रमाणेच आपट्याच्या पानांपासूनसुद्धा बिड्या वळल्या जातात.

धार्मिक महत्त्व

[संपादन]

आपट्याच्या झाडाची पाने सोने म्हणून दसरा या सणाला एकमेकांना वाटली जातात.[]

अश्मन्तक महावृक्ष महादोष निवारण |
इष्टानां दर्शनं देही कुरु शत्रुविनाशनम् ||

अर्थ: आपट्याचा वृक्ष हा महावृक्ष असून तो महादोषांचे निवारण करतो.इष्ट(देवतेचे) दर्शन घडवितो व शत्रूंचा विनाश करतो.[]

हा वृक्ष शततारका नक्षत्राचा आणि कुंभ राशीचा आराध्यवृक्ष मानला गेला आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

आपट्या बद्दल माहिती इथे उपलब्ध आहे

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Curtis, William (1840). The Botanical Magazine: Or, Flower Garden Displayed Etc (इंग्रजी भाषेत). Couchman.
  2. ^ Balfour, Edward Green (1857). Cyclopaedia of India and of Eastern and Southern Asia, commercial, industrial and scientific... (इंग्रजी भाषेत). Printed at the Scottish Press.
  3. ^ "आपटा आणि त्याचे उपयोग - Dainik Prabhat". Dailyhunt (इंग्रजी भाषेत). 2020-10-23 रोजी पाहिले.
  4. ^ "जाणून घ्या दसऱ्याचे महत्त्व…". Loksatta. 2019-10-08. 2020-10-23 रोजी पाहिले.
  5. ^ Ānandāśramasaṃskr̥tagranthāvaliḥ (हिंदी भाषेत). Printed at the Ánandás'rama Press.